सकाळ न्यूज नेटवर्क-वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ता.२३ ः ‘चीनच्या सैन्याकडून पूर्वनिश्चित गस्तीच्या पद्धतींचे उल्लंघन होत असल्याने सीमावर्ती भागांतील परिस्थिती वेळोवेळी बिघडते,’ असे आज परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देश विद्यमान राजनैतिक व लष्करी यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. तसेच, सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य राखणे हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावले.
अरुणाचल प्रदेशात सीमावर्ती भागामध्ये भारत आणि चीन यांच्यात पुन्हा संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये दोन्ही देशांचे लष्कर अनेकदा आमनेसामने आल्याचे उघड झाले. अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून ती अद्याप कायम असल्याची माहिती भारत- तिबेट पोलिस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजित कपूर यांनी नुकतीच दिली. राजस्थानातील अल्वर जिल्ह्यातील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयातील सोहळ्यामध्ये ते बोलत होते. राजकीय वर्तुळामध्येही कपूर यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले असून विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. कपूर म्हणाले, की अरुणचालमधील डोंगराळ भागातील सुबनसिरी जिल्ह्यामध्ये असाफिला आणि माजा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. भारतानेही यामुळे सावधगिरीची भूमिका घेत सीमेवरील लष्कराची तैनाती वाढविली आहे. ड्रोन तंत्रज्ञान आल्याने पारंपरिक युद्ध तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. सध्या ‘आयटीबीपी’ ड्रोनची निर्मिती आणि अँटी ड्रोन सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ ‘आयटीबीपी’ भूमिगत बंकर आणि निवास व्यवस्था उभारत आहे.
----------
प्रतिक्रिया
राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक निर्भरता आणि राजकीय उत्तरदायित्व या मुद्द्यांच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी बोलले पाहिजे. चीनच्या सैनिकांची आगळीक सुरूच असून ‘आयटीबीपी’च्या महासंचालकांचे वक्तव्य चिंताजनक आहे. डोकलाम आणि गलवाननंतर पुन्हा गंभीर स्थितीची सुरुवात झाली आहे का? हे केंद्र सरकारने स्पष्ट केले पाहिजे.
- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष
चीनसमोर गुडघे टेकणाऱ्या पंतप्रधानांकडून त्यांना सातत्याने सवलती दिल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला ‘अरुणाचल’मध्ये आपला चीनशी संघर्ष सुरू आहे. पंतप्रधान मोदी या मुद्यावर गप्प आहेत.
- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस
भारताकडे चीनवर नाराज होण्यासाठी अनेक ठोस कारणे आहेत, चीनने याआधी सीमेवर एकतर्फी कारवाई करत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सामंजस्याला नख लावले होते. गलवान व्यतिरिक्त देखील अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे भारताच्या चिंता वाढू शकतात.
- शशी थरूर, काँग्रेसचे नेते
---------
जयस्वाल म्हणाले
- भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान राजनैतिक आणि लष्करी यंत्रणांचा वापर सुरू आहे. सीमावर्ती भागात गैरसमज किंवा परिस्थितीचे चुकीचे आकलन होऊन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.
- सीमा व्यवस्थापन अधिक चोख करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतची परस्पर समज वाढविण्यासाठी योग्य ठिकाणी चर्चा करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवणे हा भारत-चीन संबंधांच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे.
- इराणला जीवनरक्षक औषधांची वाहतूक सुलभ करण्यासाठी यापूर्वीही भारताने प्रयत्न केले आहेत आणि आताही प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारत आणि इराण यांच्यातील हवाई वाहतुकीसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.