सिंगापूरसोबत
भागीदारी दृढ
एस. जयशंकर यांचा विश्वास
सिंगापूर, ता. १९ (पीटीआय) : सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी केली. येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल, असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णनदेखील उपस्थित होते. उद्या, गुरुवारी (ता. २०) होणाऱ्या चौथ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेसाठी (आयएसएमआर) जयशंकर सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत.
जयशंकर सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले, ‘‘सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांच्या उपस्थितीत आज भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. हे संकुल भारत-सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचे दर्शन घडवेल आणि भारतीय समुदायासाठी सेवा अधिक बळकट करील, असा विश्वास वाटतो.’’
दरम्यान, सिंगापूरच्या २०२० च्या जनगणनेनुसार, येथील ४०.४ लाख निवासी लोकसंख्येपैकी नऊ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकांसह १६.४ लाख परदेशी नागरिक वास्तव्यास आहेत. सिंगापूरमधील भारतीयांमध्ये विद्यार्थी तसेच वित्तीय सेवा, आयटी, बांधकाम आणि सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
सीतारामन, गोयल राहणार उपस्थित
एस. जयशंकर आणि सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांनी दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत आणि सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी ‘आयएसएमआर’ हे एक महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. या गोलमेज परिषदेत जयशंकर यांच्यासह वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेन प्रसाददेखील सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.