पुणे

शैक्षणिक पानासाठी (बुधवार ता. १२ ऑगस्टसाठी)

CD

शैक्षणिक पानासाठी (बुधवार ता. १२ ऑगस्टसाठी)

लोगो ः शिक्षण चिंतन
डॉ. मिलिंद नाईक

भाषाशास्त्र
‘भाषाशास्त्र’ हे भारतीय ज्ञानपरंपरेचे वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र आहे. पाणिनींचे ‘अष्टाध्यायी’ हे जगातील सर्वश्रेष्ठ व्याकरण ग्रंथांपैकी एक मानले जाते. विविध भाषांतील शब्दरूपे, ध्वनीबदल आणि व्याकरणरचनेचा अभ्यास करण्यासाठी पाणिनींची प्रणाली आजही उपयुक्त मानली जाते. आधुनिक भाषाविज्ञान आणि संगणकीय भाषाविज्ञानातही त्याच्या नियमाधारित रचनेचा अभ्यास केला जातो. भर्तृहरींनी वाक्यपदीय या ग्रंथातून ‘शब्द’, ‘अर्थ’ आणि ‘संज्ञा’ यांतील संबंध स्पष्ट करून भाषा अर्थनिर्मिती कशी करते याचे सखोल विवेचन केले. भारत प्राचीन काळापासून आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि व्यापारीदृष्ट्या सक्षम देश होता. उत्तरपथ आणि दक्षिणपथ या व्यापारी मार्गांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणावर विकसित झाला होता. व्यापाऱ्यांमध्ये विश्वासार्ह वित्तीय व्यवहार, हुंडी आणि पतव्यवस्थेसारख्या संकल्पनांचा वापर होत असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. सद्यःकालीन इतिहासकार संजीव संन्याल यांनी त्यांच्या ‘द ओशन ऑफ चर्न’ या पुस्तकात भारतीय व्यापाऱ्यांच्या समुद्री परंपरेचा आणि कौंडिण्यांसारख्यांनी भारतीयांच्या आग्नेय आशियाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. नालासोपारा, भडोच, मुजिरिस, दाभोळ आणि ताम्रलिप्ती यांसारखी बंदरे जागतिक व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. भारतीय कारागिरांनी तयार केलेले वूट्झ, पोलाद, ढाक्याची तलम मलमल, तसेच जस्त, पितळ आणि धातुशास्त्रातील प्रगत कौशल्य जगभर प्रसिद्ध होते. दमास्कसच्या तलवारींसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे पोलाद भारतातून निर्यात होत असे. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिक उत्पादनाचा विस्तार आणि वसाहतवादी आर्थिक धोरणांमुळे भारतीय पारंपरिक उद्योगांना मोठा फटका बसला.
आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवनशास्त्र आहे. शरीर, मन आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यावर त्याचा भर आहे. वनस्पतिजन्य औषधे, आहार-विहार, ऋतुचक्रानुसार जीवनशैली आणि रोगप्रतिबंधक उपाय यांचा त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय कृषी परंपरेत उत्पादनवाढीइतकेच मातीचे आरोग्य, जैवविविधतेचे संवर्धन आणि निसर्गाशी सुसंवाद यांना महत्त्व दिले गेले. आंतरपीक पद्धती, स्थानिक बियाण्यांचा वापर, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यांमुळे शाश्वत शेतीची संकल्पना विकसित झाली. शाश्वत विकासाच्या जागतिक चर्चेत या तत्त्वांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेची अनेक तत्त्वे आजच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहेत. विकेंद्रीकरण, स्थानिकतेचा सन्मान, विविधतेचा आदर, समन्वय, सृजनशीलतेला प्रोत्साहन, कर्तव्यभाव, कृतज्ञता, अपरिग्रह, सामूहिकता, स्वावलंबन आणि परस्परावलंबन ही मूल्ये केवळ भारतीय संस्कृतीची ओळख नसून भविष्यातील विकासाचीही दिशा ठरू शकतात.
असे असले तरी भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करताना आंधळा गौरव किंवा अंधश्रद्धा या दोन्ही टोकांचा त्याग करणे आवश्यक आहे. आपल्या परंपरेचे वस्तुनिष्ठ, चिकित्सक आणि संशोधनाधिष्ठित मूल्यमापन करणे हीच भारतीय विचारपरंपरेची खरी ओळख आहे. प्रश्न विचारणे, तर्क करणे, चर्चा करणे आणि सत्याचा शोध घेणे ही भारतीय ज्ञानसंस्कृतीची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत.
समर्थ रामदास म्हणतात, ‘सांगे पूर्वजांची कीर्ती तो एक मूर्ख.’ या वचनाचा अर्थ पूर्वजांच्या कार्याचा अभिमान बाळगू नये असा नाही. त्याचा खरा आशय असा आहे की केवळ भूतकाळातील वैभवाची गाथा गाण्यात रमून न जाता त्या परंपरेतील ज्ञान समजून घेऊन त्याचे आधुनिक संदर्भात पुनर्वाचन करावे, संशोधन करावे आणि त्यातून नवे ज्ञान निर्माण करावे. भारतीय ज्ञानपरंपरा ही भूतकाळात अडकलेली नाही; ती भविष्य घडविण्याची प्रेरणा आहे. विज्ञान, गणित, भाषा, वैद्यक, कृषी, व्यापार, तत्त्वज्ञान आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत भारताने दिलेले योगदान समजून घेणे म्हणजे केवळ इतिहासाचा अभिमान बाळगणे नव्हे, तर नव्या संशोधनासाठी प्रेरणा घेणे होय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने या ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. आता गरज आहे ती या परंपरेकडे चिकित्सक, संशोधनाधिष्ठित आणि भविष्याभिमुख दृष्टिकोनातून पाहण्याची, तिचे आधुनिक संदर्भात पुनर्मूल्यांकन करण्याची आणि भारताला पुन्हा ज्ञाननिर्मितीचे जागतिक केंद्र बनविण्याची.
-------------
लोगो ः मानसवेध
डॉ. विद्याधर बापट

ताणाचे व्यवस्थापन
ताणतणावाचे खरे स्रोत शोधून तणावाचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचे असते. अनेकदा ताण का येतो याची खरी कारणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कळत नकळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो. उदा. आपण म्हणतो मला डेड लाइन्स पाळण्याचा ताण येतो. डेड लाइन्स पाळायच्या असतात ही गोष्ट खरी परंतु ताण आपल्याला त्यामुळे नसतो तर आपल्या स्वभावातील काही दोषांमुळे असतो उदा. काम पुढे ढकलण्याची सवय, कामातील शिस्तीचा अभाव, स्वतःच्या कामावर शंभर टक्के लक्ष केंद्रित न करू शकणे वगैरे. उपाय आपल्याला खऱ्या कारणांवर करायला हवा. तरच मुळासकट ताण नाहीसा होऊ शकेल. स्पर्धेच्या युगात डेड लाइन्स असणारच. उलट कामाचं वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन करून, आपण त्या डेड लाइन्स पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला हवा.
काही ताण सहजासहजी आपल्या लक्षात येत नाहीत. दबलेल्या भावना, अपराध गंड, न्यूनगंड, दुर्बल आत्मप्रतिमा इत्यादी गोष्टी या ताणांच्या मुळाशी असू शकतात. ते तज्ज्ञांच्या साहाय्यानेच दूर करायला हवेत अन्यथा हे ताणतणाव आपल्याला नैराश्याच्या गर्तेत ढकलतात. तसेच त्यांचा आपल्या शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होत रहातो. आणि त्यातून अनेक मनोकायिक आजार आणि व्याधी जडू शकतात. यात पचनाचे, त्वचेचे विकार, उच्च रक्तदाब, हृदयरोग, तीव्र मायग्रेन इत्यादी आजार असू शकतात. निचरा न झालेल्या नकारात्मक भावना, विचार या गोष्टी यामागे असू शकतात. आणि म्हणूनच तणावाचं व्यवस्थापन लहानपणापासून शिकणं महत्त्वाचं आहे.

तणाव व्यवस्थापनाचे फायदे
मुख्य तीन फायदे आपल्याला निश्चित होतात. शारीरिक तब्येत सुधारते. त्यामुळे उत्साह, जोम प्रतिकार शक्ती वाढते. भावना स्थिर होऊन नियंत्रणात राहतात. त्यामुळे सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन रुजायला मदत होते. मन फोकस करण्याची क्षमता वाढते. परिणामी आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कामगिरी उत्तम व्हायला मदत होते. नवीन गोष्टी शिकण्याची उमेद व क्षमता वाढते. या सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत.

ध्यानधारणा आणि साक्षीभाव
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्राणायाम व ध्यानधारणा यांचा उत्तम उपयोग होतो. साक्षीभावाने सर्व घटना पाहण्याची सवय मन शांत ठेवते. मन शांत झाल्याखेरीज तणाव नियोजन अशक्य आहे. त्यामुळे या गोष्टी आवश्यक ठरतात. मन विचारात व्यग्र असते तेव्हा मेंदूमध्ये बीटा विद्युत लहरी साधारण प्रती सेकंद १३ ते ३० किंवा कधी त्याहून जास्त वेगात प्रसारित होत असतात. ध्यानाने व स्वस्थतेच्या व्यायामाने त्यांची गती शांत होत जाते. मग अल्फा लहरी प्रती सेकंद ७ ते १४ आवर्तने गतीने येत रहातात. मन शांत होऊ लागतं. मनःशांतीच्या दृष्टीने ही स्थिती खूप महत्त्वाची ठरते. सातत्य राहिले तर हळू हळू मनाचं कंडिशनिंग तसं बनत जाते. मन शांत होत जाते. पुढे ध्यानात थिटा, डेल्टा अशा पायऱ्या येऊ लागतात.
स्पर्धात्मक युगात आपण कुठल्याही क्षेत्रात असू, ताणतणावाचं व्यवस्थापन आणि विवेकी दृष्टिकोनाची जोपासना गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. लहानपणापासून या विषयांची ओळख व तयारी, स्पर्धात्मक काळात यशस्वी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
-----------
लोगो ः भविष्यवेध
प्रा. विजय नवले

अभियांत्रिकीनंतर एमटेक की एमबीए?

अभियांत्रिकीची पदवी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध अनेक पर्यायांपैकी नोकरी करणे हा थेट आणि स्वाभाविक पर्याय आहे. परंतु काही विद्यार्थी उच्चशिक्षण घ्यावे असा विचार करतात. तिथेही अनेक पर्याय आहेत. त्यापैकी महत्त्वाचे शिक्षण पर्याय आहेत एमटेक किंवा एमबीए. यापैकी काय करावे? हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. दोन्ही अभ्यासक्रम उत्कृष्ट असून त्यातून उत्तम करिअर घडू शकते. मात्र सुयोग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःची शैक्षणिक वाटचाल, आवड, क्षमता व्यक्तिमत्त्व, स्वभाव, सवयी आणि भविष्यातील करिअरचे ध्येय यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकीमधील शैक्षणिक वाटचाल
अभियांत्रिकीच्या चार वर्षांतील गुण, तांत्रिक विषयांवरील समज, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष कामातील कामगिरी यावरून विद्यार्थ्याची शैक्षणिक दिशा स्पष्ट होते. आपला कल स्पष्टपणे लक्षात येतो. तांत्रिक विषयांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम.टेक हा नैसर्गिक पुढचा टप्पा ठरू शकतो. तर गॅदरिंग, इव्हेंट्स, कार्यक्रम, स्पर्धा आदी ठिकाणी व्यवस्थापन, संघटन आणि अचूक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत यशस्वी झालेले ‘एमबीए’चा विचार करू शकतात.
व्यक्तिमत्त्व
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व करिअर निवडीत महत्त्वाची भूमिका बजावते. शांत, संयमी, विश्लेषणात्मक आणि संशोधनाभिमुख व्यक्तिमत्त्व असलेले विद्यार्थी एम.टेकच्या माध्यमातून अधिक यशस्वी होऊ शकतात. याऐवजी प्रभावी संवाद, नेतृत्व, लोकांशी संबंध निर्माण करणे, टीमला प्रेरित करणे आणि जबाबदाऱ्या स्वीकारणे ही वैशिष्ट्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘एमबीए’ अधिक अनुकूल ठरतो.
स्वभाव
जिज्ञासू, तांत्रिक समस्यांची उत्तरे शोधण्याची वृत्ती आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी असलेल्यांनी एम.टेकचा विचार करावा. दुसरीकडे, बदल स्वीकारणारा, निर्णयक्षम, व्यावसायिक दृष्टिकोन असलेला आणि संधी शोधणारा स्वभाव ‘एमबीए’मध्ये अधिक उपयोगी पडतो.
सवयी
सतत वाचन, तांत्रिक कौशल्ये विकसित करणे, प्रयोग करणे आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्याच्या सवयी एम.टेकमध्ये फायदेशीर ठरतात. वर्तमान घडामोडींचा अभ्यास, नेटवर्किंग, सादरीकरण, वेळेचे नियोजन आणि टीममध्ये काम करण्याच्या सवयी ‘एमबीए’साठी उपयुक्त असतात.
आवड व क्षमता
करिअरमध्ये दीर्घकालीन यशासाठी आवड आणि क्षमता यांचा मेळ आवश्यक असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डेटा सायन्स, व्हीएलएसआय, कोअर इंजिनिअरिंग अर्थातच त्यांच्या शाखांमधील तांत्रिकी विषयांमध्ये रस आणि विश्लेषणात्मक क्षमता असल्यास एम.टेक योग्य ठरतो. मार्केटिंग, फायनान्स, मानव संसाधन, ऑपरेशन्स, उद्योजकता किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आवड, संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण असल्यास ‘एमबीए’ अधिक योग्य पर्याय आहे.
करिअरच्या संधी
एम.टेकनंतर संशोधन, पीएच.डी., अध्यापन, डीआरडीओ, इस्रो, बार्क, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच एआय, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी सेमीकंडक्टर, एनर्जी सेक्टर यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत.
‘एमबीए’नंतर मार्केटिंग, फायनान्स, मानव संसाधन, ऑपरेशन्स, सप्लाय चेन, बिझनेस डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बँकिंग, कन्सल्टिंग, कॉर्पोरेट लीडरशिप तसेच स्वतःचा उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तांत्रिकी क्षेत्राशिवाय विविध आस्थापनांच्या अन्य आघाड्यांवर काम करण्याची इच्छा असल्यास ‘एमबीए’ उजवे ठरू शकते.
एम.टेक आणि ‘एमबीए’ या दोन्ही पदव्या महत्त्वाच्या आहेत. एम.टेकसाठी ‘गेट’ तर ‘एमबीए’साठी ‘कॅट’ किंवा ‘सीईटी’ ही परीक्षा देणे अपेक्षित असते. आपल्याला सुयोग्य अशी अचूक निवड केल्यास केवळ चांगली नोकरीच नव्हे, तर समाधानकारक, प्रगतिशील आणि यशस्वी करिअर घडविणे शक्य होते.
-----------
लोगो ः करिअर वेध
विनायक द्रविड

प्राधान्यक्रम

विद्यार्थी अवस्थेपासून वय वाढेपर्यंत प्रत्येक जण आयुष्यातील चढ-उतारांचा अनुभव घेतो. या प्रवासामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक निर्णय घ्यावे लागतात. काही बरोबर ठरतात तर काही चुकीचे. परंतु या प्रक्रियेत आपण आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व देतोय आणि कधी देत नाही, हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच ‘प्राधान्य’ या घटकाला फार महत्त्व आहे. आपण आयुष्यात कशाला, कधी आणि किती प्राधान्य देतो यावर आपले यशापयश अवलंबून असते.

प्राधान्य करिअरचे
करिअर या शब्दाचा अर्थ ‘शैक्षणिक करिअर’ असाच घेतला जातो. प्रत्येक माणूस शिक्षणात करिअर करेल आणि यशस्वी होईल असे नक्कीच नाही. खेळातील करिअर, नाटक, चित्रपट, लेखन, कला, गायन, वाद्यवृंद, उद्योग धंदा, अशा अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत व पाल्यातील कौशल्य, आवड व प्राधान्य यावर अंतिम करिअर ठरले पाहिजे. पालकांनी एखाद्या ठराविक करिअरसाठी मुलांच्या मागे लागणे चुकीचे आहे. आज जग बदलले आहे, करिअर म्हणजे अभ्यास या मानसिकतेमधून पालकांनी बाहेर येऊन पाल्यासाठी नवीन वाटांचा स्वीकार केला पाहिजे. कोणतेही करिअर निवडा, परंतु त्यामध्ये उच्च पातळीचे यश मिळविणे हे ध्येय असणे महत्त्वाचे आहे. योग्य करिअरला प्राधान्य देणे तुमच्या आयुष्याच्या प्रवासात महत्त्वाचा निर्णय ठरतो.

खेळातील प्राधान्य
आवडीचा खेळ करिअर म्हणून निवडलात आणि त्यामध्ये देशाकडून खेळण्यापर्यंत प्रगती केलीत तरी खेळातील अपेक्षा पूर्ण होत नाहीत. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे विराट कोहली. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले व भारताला अनेकदा एक हाती यश मिळवून दिले आहे. तुम्ही निवडलेल्या खेळासाठी ज्या गोष्टींचे प्राधान्य जास्त आहे, त्यामध्ये तुम्ही जास्त काम करणे महत्त्वाचे ठरते. करिअरच्या सुरुवातीला खेळातील तांत्रिक बाबीत प्रगती करणे, आपला परफॉर्मन्स टिकविणे, नवीन गोष्टी शिकणे या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये त्याच्या वयाप्रमाणे प्राधान्य बदलत असते.

वैयक्तिक आयुष्यातील प्राधान्य
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या फेजमध्ये वेगळे प्राधान्य ठेवावे लागते. परंतु या प्रवासात प्राधान्य ठरविण्यामध्ये लवचिकता असणे महत्त्वाचे आहे. शिक्षण सुरू असेपर्यंत प्राधान्य अभ्यास व खेळ दोन्हीकडे असणे योग्य राहील. तुम्ही नोकरी करायला लागल्यावर प्राधान्य हे कॉर्पोरेट करिअर असावे. या काळात कुटुंबात कोणतीही अडचण आल्यास प्राधान्य कौटुंबिक स्तरावर दिले पाहिजे. थोडक्यात कधी, कोणत्या गोष्टीला आणि किती प्राधान्य द्यायचे हा निर्णय महत्त्वाचा असतो. आपले वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंब या दोन गोष्टींना कायमच प्राधान्य दिले पाहिजे. करिअर, पैसा, शिक्षण, यशाचे टप्पे तुमची समाजातील प्रतिष्ठा असे अनेक घटक तुमच्या आयुष्यात प्राधान्य ठरवत असतात.
-----------
लोगो ः विशेष
डॉ. रिता शेटीया,
सहाय्यक प्राध्यापिका

अर्थशास्त्र ः भविष्यातील रोजगाराच्या अमर्याद संधी

अर्थशास्त्र हा विषय केवळ आकडेमोड किंवा शेअर बाजारापुरता मर्यादित नसून तो सरकारी धोरणे, सामाजिक विकास आणि जागतिक व्यापाराचा मुख्य कणा आहे. दैनंदिन व्यवहारातही या विषयाचा मोठा उपयोग होतो. अनेक विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र कठीण वाटते; परंतु योग्य संकल्पना आणि प्रात्यक्षिक उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेतल्यास हा विषय अत्यंत सोपा बनतो. या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास अनेक उच्च दर्जाच्या आणि प्रतिष्ठित करिअर संधी उपलब्ध होतात.
बँकिंग आणि वित्त क्षेत्र ः हे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मोठे कार्यक्षेत्र आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांमध्ये अधिकारी, बँक अर्थशास्त्रज्ञ, गुंतवणूक बँकिंग सल्लागार तसेच विमा क्षेत्रात जोखीम विश्लेषक म्हणून काम करता येते.
भारतीय आर्थिक सेवा ः केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी भारतीय आर्थिक सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये उच्चस्तरीय आर्थिक सल्लागार म्हणून देशपातळीवरील धोरणनिर्मितीत योगदान देता येते. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड यांसारख्या सर्वोच्च वित्तीय संस्थांमध्ये अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी मिळते.
व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्र ः मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या बाजाराचा कल ओळखण्यासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांची मदत घेतात. बाजार संशोधन, डेटा विश्लेषण आणि आर्थिक सल्लागार म्हणून मोठी मागणी असते. गणितावर चांगली पकड असल्यास एक्चुअरी किंवा सांख्यिकी सॉफ्टवेअरच्या मदतीने डेटा सायन्स आणि व्यावसायिक विश्लेषक म्हणून चांगली संधी आहे.
प्राध्यापक किंवा संशोधक ः अध्यापन आणि संशोधनाची आवड असणाऱ्यांसाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून करिअरचा मार्ग खुला असतो. नीती आयोग, रिझर्व्ह बँक, केंद्रीय मंत्रालये तसेच विविध संशोधन संस्थांमध्ये संशोधकांची मोठी गरज असते. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स किंवा मुंबईतील ‘आयजीआयडीआर’ यांसारख्या नामवंत संस्था शैक्षणिक संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय संधी ः जागतिक स्तरावर काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि संयुक्त राष्ट्रे यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये धोरण आणि प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. सध्याच्या काळात हवामान बदल आणि शाश्वत विकास यांमुळे पर्यावरण अर्थशास्त्र या नव्या क्षेत्राला मोठी मागणी आहे. यामध्ये पर्यावरणाचे रक्षण करून आर्थिक विकास साधणे आणि कार्बन क्रेडिट्सचे व्यवस्थापन करणे यावर काम केले जाते.
विकास अर्थशास्त्रज्ञ ः सामाजिक क्षेत्रात बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन किंवा टाटा ट्रस्ट यांसारख्या संस्थांमध्ये विकास अर्थशास्त्रज्ञ म्हणून गरिबी निर्मूलन, ग्रामीण विकास आणि कुपोषण यांसारख्या समस्यांवर उपाय शोधता येतात. भाषा आणि अर्थशास्त्राची उत्तम जाण असणाऱ्यांना आर्थिक वृत्तसंस्थांमध्ये पत्रकार म्हणून अर्थसंकल्प आणि बाजाराचे विश्लेषण करण्याची संधी मिळते. कॉर्पोरेट कायदेविषयक संस्थांमध्येही अर्थशास्त्र आणि कायदा यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
आर्थिक पत्रकारिता ः तुमची भाषेवर पकड असेल आणि अर्थशास्त्राची जाण असल्यास प्रतिष्ठित वृत्तसंस्थांमध्ये आर्थिक पत्रकार म्हणून करिअर करू शकता. बजेट विश्लेषण आणि शेअर मार्केटच्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम यात असते.
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विश्लेषणात्मक विचारसरणी, तार्किक बुद्धिमत्ता, गणिताची आवड आणि आधुनिक सांख्यिकी सॉफ्टवेअर्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नियमित वाचन, पदवीदरम्यान केलेली इंटर्नशिप आणि किमान पदव्युत्तर शिक्षण यांमुळे या क्षेत्रातील संधी अधिक सुलभ होतात. थोडक्यात, देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक प्रश्न यांची योग्य सांगड घालू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र हे क्षेत्र आर्थिक स्थैर्यासोबतच मोठी प्रतिष्ठा मिळवून देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, एक जण जखमी

MahaDBT Portal Down: महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्यांपासून ठप्प, सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्थाचालकांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT