पुणे, ता. २३ : शहरी भागांतील पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प अनेकदा वेळेचा अपव्यय आणि वाढीव खर्च यांच्या दुष्टचक्रात अडकतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता निकमार खासगी विद्यापीठ पुढे सरसावले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सरकारी, तसेच खासगी क्षेत्रातील रखडलेले किंवा नवीन प्रकल्प वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी या विद्यापीठाने दर्शविली आहे.
विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय गुपचुप, महासंचालक डॉ. तपश कुमार गांगुली आणि कुलसचिव डॉ. आदिनाथ दमाले यांनी ही माहिती दिली. विद्यापीठात एकूण १२ अभ्यासक्रम राबविले जातात. तर विद्यापीठाने बी. टेक (सिव्हिल), बी. आर्च आणि बीबीए हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. बी. टेक अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, अर्बन मॅनेजमेंट असे पर्याय देण्यात येतात. प्रत्येक सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. याशिवाय बांधकाम आणि पायाभूत सुविधांशी संबंधित नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी शिकावे, यासाठी अभ्यासक्रमात दरवर्षी आवश्यक ते बदल करण्यात येतात, असेही डॉ. दमाले यांनी अधोरेखित केले.
कोणत्याही बांधकामाशी, पायाभूत सुविधेशी संबंधित प्रकल्प उभारताना तो कमी खर्चात, उपलब्ध जागेत आणि उपलब्ध निधीत वेळेत पूर्ण करणे, हे सर्वात मोठे आव्हान असते. या आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याबरोबरच कमी खर्चात आणि लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम राबविले जात असल्याचे डॉ. गुपचूप यांनी सांगितले.
हे विद्यापीठ बांधकाम, पायाभूत सुविधा क्षेत्रातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संबंधित क्षेत्रांत योगदान देऊ शकतील असे विषयज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता असलेले पदवीधर घडवीत आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा क्षेत्र, शाश्वत विकास, तसेच राष्ट्राच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देणारे भावी व्यावसायिक आणि नेतृत्व घडविण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे.
- डॉ. विजय गुपचुप, अध्यक्ष, निकमार खासगी विद्यापीठ
----------------
एक हजार ३६९
विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
‘‘विद्यार्थ्यांनी समर्पण, प्रामाणिकपणा, नवोन्मेष आणि व्यावसायिक जबाबदारी याचे महत्त्व जाणले पाहिजे. वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करावा. शाश्वत शहरी विकासात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी,’’ असा सल्ला ‘एल अँड टी’चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सी. जयकुमार यांनी दिला.
निकमार खासगी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सी. जयकुमार बोलत होते. कार्यक्रमात १२ अभ्यासक्रमांतील एकूण एक हजार ३६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तर, १३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. या वेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय गुपचुप, विद्यापीठाचे महासंचालक डॉ. तपश कुमार गांगुली, कुलगुरू डॉ. अनिल अग्रवाल, कुलसचिव डॉ. आदिनाथ दमाले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.