नवनिर्माण अन् आपण
सखोलपणे शोधायला गेलं, तर ‘इनोव्हेशन’ हे आज चलनी नाणं बनलं आहे. ‘नवनिर्माण’ हे एकाएकी चलनी नाणं कसं झालं? नवनिर्माणाधारित विकास, नवनिर्माणावर आधारित उद्यमशीलता, नवनिर्माणावर आधारित स्पर्धा या काही पोकळ घोषणा नाहीत. तर ही आजची सत्य परिस्थिती आहे. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्याची ताकद नवनिर्माणामध्ये आहे, हे आता सगळ्यांना कळून चुकलंय. नवनिर्माण म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून सृजनशील, नावीन्यपूर्ण कल्पनांना नवीन उत्पादनं, अधिक सुधारित उत्पादनं आणि प्रक्रिया, सेवा यांच्यामध्ये परावर्तित करणं होय.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
नवनिर्मितीसाठी प्रभावी पर्यावरणाचे संस्कृती, बुद्धिमत्ता आणि शारीरिक सामर्थ्य हे घटक आहेतच. संशोधन प्रयोगशाळांच्या पलीकडे जाऊन टेक्नॉलॉजी पार्क, आयडिया इन्क्युबेटर, बौद्धिक संपदा अधिकारांची जपणूक करणारी, त्याविषयी जागृती आणि संवर्धन करणारी संस्था, तसं वातावरण, नियंत्रण ठेवणारी जागरूक कार्यप्रणाली, शैक्षणिक वातावरण जिथे ‘प्रकाशित करा नाहीतर नष्ट व्हा’ म्हणजे ‘तुम्ही सातत्याने नवनवीन संशोधन करा, नाहीतर तुम्ही या शैक्षणिक प्रवाहातून बाहेर फेकले जाल.’ इतकंच वातावरण नाही तर ‘नवीन संशोधन करा, प्रसिद्ध करा, पेटंट मिळवा आणि समृद्ध व्हा.’ असं शैक्षणिक वातावरण, सृजनशील कल्पनांवर संशोधन करणारा संशोधक आणि त्यांचा योग्य रीतीने वापर करणारं उद्योगक्षेत्र, जोखीम घेणारे भांडवलदार आणि सतत उंचावत जाणारे नवनिर्माणाचे आलेख जिथे आहेत असं उद्योगक्षेत्र, असं सगळं वातावरण समाजात, संशोधन क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात असेल तरच ते नवनिर्मितीसाठी प्रभावी पर्यावरण ठरेल.
उद्योग-शिक्षण क्षेत्रातील ‘नॉलेज पार्टनरशिप’ :
मला अपेक्षित असणाऱ्या प्रभावी नवनिर्माण पर्यावरणासाठी उद्योगक्षेत्र आणि शिक्षणक्षेत्र यामध्ये ‘नॉलेज पार्टनरशिप’ असायला हवी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या दोन क्षेत्रांमधील ज्ञानाच्या देवाणघेवाणीवरून जी यादी केली आहे, ती लक्षात घेता भारताला अजून प्रगती करायला खूप मोठा वाव आहे.
भारतात सर्वदूर दारिद्र्य पसरलेलं आहे. कोट्यवधी गरीब भारतीयांना जीवनाच्या मूलभूत गरजाही पूर्ण करता येत नाहीत. अशा गरीब भारतीयांना या विकासात सामील करून घेणं ही आपली साधना व्हायला हवी. म्हणूनच नवनिर्माणाच्या सहाय्याने केलेला सर्वसमावेशक विकास आपल्याला घडवायचा आहे. म्हणजेच आपल्याला सर्वसमावेशक नवनिर्माण करायचं आहे. सर्वसमावेशक नवनिर्माण म्हणजे अधिकाधिक लोकसंख्येसाठी कमीत कमी साधनसंपत्ती वापरून अधिकाधिक उत्पादन निर्माण करणं. म्हणजेच कमीत कमी कच्चा माल वापरून कमीत कमी खर्चात, कमी वेळेत, पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास करून अधिकाधिक सुविधा देणारी उत्पादनं तयार करणं, जी एकावेळी अनेक लोकांना उपयोगी पडतील. गरिबातील गरिबालाही ती परवडू शकतील, अशी उत्पादनं शोधून काढायला हवीत.
कमी किमतीत सकस उत्पादनांचे आव्हान :
उद्योगक्षेत्राने आजपर्यंत कमीत कमी खर्चात आर्थिक गुंतवणूक करून अधिकाधिक उत्पादकता मिळवून स्वत:चा नफा, पत वाढवण्यासाठी झटून प्रयत्न केले. पण, आता त्यांनी सर्वसमावेशक नवनिर्माण करण्यावर भर द्यायला हवा. आजपर्यंत सेवा आणि वस्तू यांच्यामध्ये ‘अधिक किंमत आणि अधिक सुविधा’ हे श्रीमंतांसाठी राखीव असंच गृहीत धरलं जायचं. कमी किमतीची सुमार उत्पादनं मात्र गरिबांसाठी हे जणू गृहीतच धरलेलं होतं. हे चित्र आपण उलट नाही का करू शकणार? आपण ‘कमी किमतीत-सकस उत्पादनं’ देऊ नाही शकणार का? यासाठी आपल्याला खर्चावर मर्यादा घालून कमी किंमत ठेवत उत्पादन अधिकाधिक उत्तम कसं देता येईल, यावर संशोधन करायला हवं. हे ठरवलं तर का करता येणार नाही? नक्कीच करता येईल.
याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘नॅनो कार.’ टाटांनी बनवलेली ‘लोकां’ची कार, नॅनो कार हे सर्वसमावेशक नवनिर्माणाचं सर्वोत्तम उदाहरण ठरलं.
आपल्यापुढे राष्ट्रीय नवनिर्माण पर्यावरण (नॅशनल इनोव्हेशन इकोसिस्टिम) उभारण्याचं आव्हान तर आहेच. पण खरं आव्हान पुढे जाऊन हे पर्यावरण सर्वसमावेशक कसं होईल हे बघण्याचं आहे. यासाठी गरज आहे, ती आपला प्राधान्यक्रम बदलण्याची. आपल्याकडील सर्वोत्तम बुद्धिमत्ता गरिबांचे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यांना परवडेल अशा किमतीत कसं उत्पादन करता येईल, यासाठी खर्ची व्हावी असं वाटतं.
भारतीय बुद्धिमत्ता :
भारतीयांकडे अशी बुद्धिमत्ता आहेच. छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातही अशिक्षित लोक अनेक शोध लावत असतात. मी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आणि मेरिको इनोव्हेशन फाउंडेशनचा संचालक असताना अशी बुद्धिमत्ता मला अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. अनिल गुप्ता यांनी खेडोपाडी काढलेल्या ‘शोधयात्रां’मधूनही असे अनेक लोक अगदी सामान्य असून, सामान्य परिस्थितीत राहूनसुद्धा भन्नाट, अफलातून संशोधन करताना दिसतात. मेरिको इनोव्हेशन फाउंडेशनने असे अफलातून प्रयोग करणारे, अशक्य ते शक्य करून दाखवणारे अनेक सामान्य भारतीय चेहरे जगापुढे आणले आहेत. ‘अरविंद आय केअर’ हे सर्वसमावेशक नावीन्यपूर्ण शोधाचं अजून एक उदाहरण. त्यांनीही अतिशय कमी किमतीत अधिकाधिक लोकांसाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरवलेल्या आहेत.
शिक्षणाचा योग्य दृष्टिकोन :
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘स्वातंत्र्य’ हा प्रत्येक भारतीयासाठी परवलीचा शब्द झाला होता. त्या ध्यासाने प्रत्येकाला पछाडलेलं होतं. तशी आपण राष्ट्रीय स्तरावर सर्जनशील नवनिर्मितीसाठी चळवळ उभी करायला पाहिजे. सतत नावीन्यपूर्ण संशोधन करणं हा प्रत्येक भारतीयाचा ध्यास बनला पाहिजे, तरच एकविसावं शतक हे भारताचं शतक होईल. तरच खऱ्या अर्थाने नवनिर्मितीक्षम भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलेला असेल. आज माणूस घडविणारे शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ (शिक्षणाचा हक्क) याची चर्चा व्हायला हवीच. पण ‘राईट टू एज्युकेशन’, ‘राईट एज्युकेशन’ (योग्य शिक्षण), ‘राईट वे ऑफ एज्युकेशन’ (शिक्षणाचा योग्य मार्ग) या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘राईट एज्युकेशन’ म्हणजे माणूस घडविणारे शिक्षण. ‘राईट एज्युकेशन’ म्हणजे ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, विचार संवर्धन, व्यक्ती संवर्धन. पण सर्वांत महत्त्वाचे आहे मूल्य संवर्धन. मुले घडवायची असतील तर तीन गोष्टींची आवश्यकता आहे, ती म्हणजे ॲबिलीटी (क्षमता), ॲटिट्यूड (दृष्टिकोन) आणि ॲप्टिट्यूड (योग्यता).
माणूस अन् यंत्रांची सहनिर्मिती :
सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्याने काम करायला हवे. लिहायला शिकणे व लिहिता लिहिता शिकणे होते. पण कृती करीत शिकणे आणि त्यापेक्षाही काही सर्जनात्मक काम करताना शिकणे व्हायला हवे. लर्निंग बाय क्रिएटिंगमध्ये स्वतः काहीतरी सर्जन करणे अपेक्षित आहे. त्यापुढे जाऊन लर्निंग बाय को-क्रिएशन म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन निर्मिती करत शिकणे व्हायला हवे. सहनिर्मिती ही दोन माणसांनीच एकत्र येऊन केली पाहिजे असे नाही, तर माणूस व यंत्र यांनीही एकत्रित निर्मिती केली तरी चालेल. मला रोबोज नव्हे, तर कोबोज (कोऑपरेटिव्ह रोबोज) अपेक्षित आहेत. दोघांनी मिळून एकत्र काम कसे करायचे, हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. समजा खेड्यातील एखाद्या वृद्ध स्त्रीचा ईसीजी काढण्याची गरज निर्माण झाली, तर त्या वृद्धेला छातीत दुखत असताना बैलगाडीतून पाच-पंधरा किलोमीटर न्यावे लागते. पण मोबाइलच्या मदतीने ईसीजी काढून शहरातील डॉक्टरांकडे पाठवता आला तर? थर्मामीटर वापरण्याइतके हे सहज व्हायला हवे. गटारे साफ करणारे कामगार आतल्या दुर्गंधीयुक्त घाणीत काम करण्याआधी दारू पितात. त्यात त्यांचे यकृत खराब होऊन आयुष्य संपते. काही वेळा विषारी वायूने ते मृत्युमुखी पडतात. केरळमध्ये एकाने हे काम करण्यासाठी रोबोज तयार केले आणि या मंडळींना ते कसे वापरायचे ते शिकवले. या मंडळींना प्रतिष्ठा मिळाली. आयुष्य मिळाले आणि त्यांच्या पुढच्या पिढ्याही वाचल्या. हे सामाजिक परिवर्तन माणूस व यंत्र यांच्या सहनिर्मितीने होऊ शकते. अंजनी माशेलकर फाउंडेशनतर्फे अशा नवसर्जनशील प्रकल्पांना आम्ही सन्मानित करत असतो. पण आता फाउंडेशनचे काम हे केवळ पुरस्कारापुरते मर्यादित राहिले नसून ती एक लोकचळवळ होऊ लागली आहे. तरुण संशोधक, अभियंते, उद्योजक, धोरणकर्ते आणि नवनिर्मितीची इच्छा असलेल्या अनेकांनी या चळवळीत सहभागी व्हायला हवे असे मला वाटते.
थोडक्यात...
१. नवनिर्माण हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे.
२. प्रभावी संशोधनासाठी दोन्ही क्षेत्रांत ‘नॉलेज पार्टनरशिप’ असणे आवश्यक आहे.
३. कमी खर्चात गरिबांना परवडणारी दर्जेदार उत्पादने तयार केली पाहिजेत.
४. शिक्षणातून क्षमता, दृष्टिकोन आणि मूल्य संवर्धन घडणे गरजेचे आहे.
५. माणूस आणि तंत्रज्ञानाने एकत्र काम करून नवनिर्मितीची राष्ट्रीय चळवळ उभी केली पाहिजे.
(शब्दांकन : डॉ. सागर देशपांडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.