पुणे

-

CD

आज मंगळवार पेस्टिंग

(छायाचित्रे ः विकास जाधव)

मजूरटंचाईतून शोधली काढणीपश्‍चात उद्योगातील संधी
एकाच छताखाली विविध यांत्रिकीकरण व प्रक्रिया

विकास जाधव

शेतीतील आजची गंभीर समस्या म्हणजे मजूरटंचाई. त्यादृष्टीने मूल्यवर्धन-प्रक्रियेत यांत्रिकीकरण करून त्याचे उद्योगात रूपांतर करण्यात हणमंत व हेमलता हे चव्हाण दांपत्य (कोपर्डे हवेली, जि. सातारा) यशस्वी झाले आहे. आज एकाच छताखाली डाळमिल, शेंगाफोडणी, धान्य स्वच्छता-प्रतवारी, मिरची कांडप यंत्र आदी विविध सहा यंत्रांआधारे
आपला ‘शेतकरी लघू उद्योग’ विस्तारला आहे. त्यातून उत्पन्नाचे विविध मार्ग तयार होऊन शेतीतून कुटुंबाला शाश्‍वती मिळाली आहे.
................................................................................
सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) या गावास कृष्णाकाठ लाभल्याने परिसर बागायती झाला आहे. ऊस व भात ही इथली प्रमुख पिके आहेत. गावातील हणमंत नथुराम चव्हाण हे युवा शेतकरी असून ते बीए पदवीधर आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शेती हाच प्रामुख्याने व्यवसाय निवडला. कुटुंबाची चार एकर शेती असून, त्यात ऊस व भात हीच पिके असतात. केवळ शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा उत्पन्नाचे विविध मार्ग शोधले पाहिजेत असे हणमंत यांना वाटत होते.
त्यातूनच शेती व कौटुंबिक जीवन शाश्‍वत होणार होते. सोशल मीडियावरही त्यांनी विविध संधी शोधल्या. त्यातून प्रक्रिया उद्योगामध्ये आवड निर्माण झाली. सध्याच्या मजूरटंचाईच्या काळात काढणी पश्‍चात तंत्रज्ञान व त्यासंबंधीचे यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांना जाणवले. आणि निश्‍चय झाला प्रक्रिया उद्योग उभारण्याचा. कुटुंबीयांनी देखील या संकल्पनेस पाठिंबा दिला.

यांत्रिकीकरणाचा श्रीगणेशा

चव्हाण यांनी घराशेजारी ४५ बाय २० फूट लांबी- रुंदीचे शेड उभे केले. यू-ट्यूब वरून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. परिसरातील डाळ प्रक्रिया उद्योगांना भेटी देऊन त्यातील बारकावे, अडी-अ़़डचणी समजून घेतल्या. सन २०१९ मध्ये धाडसाने डाळ मिल यंत्र खरेदी करून उद्योगाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. तरीही हार न मानता, चिकाटी ठेवून प्रयत्न सुरू ठेवले. सुरुवातीचे सहा महिने संघर्षमय ठरले. परिसरात असे डाळ मिल उद्योग नसल्याने शेजारील गावांतील शेतकरी ग्राहकांनाही या स्थानिक उद्योगाचा पर्याय मिळाला. त्यांची संख्या वाढू लागली. अडचणींवर उपाय मिळू लागले. गावकऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. त्यातून शेतकरी लघू उद्योग नावाने प्रक्रिया उद्योग सुरळीत सुरू झाला. सध्या तूर, हरभरा व अन्य कडधान्यांच्या डाळी तयार करून दिल्या जातात. सरासरी दर महिना ६० क्विंटलच्या आसपास डाळप्रक्रिया होते.

शेंगा फोडणी यंत्राचा समावेश

डाळ प्रक्रियेपासून उद्योग भरभराटीला आल्यावर चव्हाण यांनी तो वाढविण्यावर भर दिला. शेतकऱ्यांची गरज ओळखून २०२० मध्ये भुईमूग शेंगा फोडण्याचे यंत्र खरेदी केले. त्यासही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या यंत्रात शेंगदाणे व फोलपटे स्वंतत्र होतात. शेंगदाण्याच्या आकारानुसार प्रतवारी होते. हा शेंगदाणा बियाणे म्हणून प्रत्यक्ष पेरणीस वापरणेही शक्य झाले आहे. स्वतःच्या शेतात प्रयोग करून चांगली उगवण व उत्पादनाची खात्री झाल्यानंतर बियाण्यासाठी यंत्राद्वारे शेंगा फोडून दिल्या जात आहेत. अशी दोन प्रकारची यंत्रे घेतली आहेत.

धान्य क्लिनिंग- ग्रेडिंग यंत्र

मजूरसमस्येमुळे परिसरात ‘हार्वेस्टर’च्या साह्याने काढणीपश्‍चात कामे करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्या अनुषंगाने धान्य स्वच्छ करण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी ओळखून धान्य क्लिनिंग- ग्रेडिंग यंत्र घेतले आहे. त्यातून परिसरातील शेतकरी गहू, ज्वारी, सोयाबीन, हरभरा तसेच व्यापारीही उदीड, मूग, चवळी आदींचे ‘क्लिनिंग- ग्रेडिंग’ करून घेतात. सर्व शेतीमालासाठी किलोला एक रुपया याप्रमाणे दर घेण्यात येतो.

अन्य यंत्रांमधून झाला विस्तार

उद्योग बारमाही होण्याच्या दृष्टीने चव्हाण यांनी कामांची व्याप्ती वाढविली आहे. आता मिरची कांडप यंत्र, पिठाची चक्की घेतली आहे. त्यामुळे पीठ, मिरची पावडर, चटणीसाठी ग्राहक वाढले आहेत.शेतकऱ्यांकडून तेलघाण्याचीही मागणी होत होती. ती ओळखून तेलघाणाही सुरू केला आहे. सोयाबीन वगळून भुईमूग, खोबरे, सूर्यफूल, तीळ यांचे तेल काढून दिले जाते. त्यासाठी सरासरी दहा रुपये प्रति किलो शुल्क घेण्यात येते. ग्राहक तेलामधील भेसळीबाबत तसेच आरोग्याप्रति जागरूक झाल्याने या तेलाला मागणी वाढत असल्याचे चव्हाण सांगतात. वर्षाकाठी उद्योगातून दहा लाखांपर्यंत उलाढाल होत असून, २५ टक्क्यांच्या आसपास निव्वळ उत्पन्न मिळते. विविध यंत्रांसाठी ३५ लाखांची गुंतवणूक झाली असून, विविध योजनांच्या माध्यमातून ३५ टक्के शासकीय अनुदान मिळाले आहे. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमधून दहा लाखांच्या कर्जाची मदत झाली. या संस्थेच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून चव्हाण यांचा पुरस्काराने सन्मान झाला आहे. हणमंत प्रक्रिया उद्योगाबरोबर आपली शेती तर सांभाळतातच. शिवाय स्थानिक संस्थेत अकाउंटन्सीचेही काम करतात. अशा रीतीने शेती व कुटुंबांचे अर्थकारण व जीवनमान स्थैर्य व शाश्‍वत करण्यात चव्हाण दांपत्य यशस्वी झाले आहे.
...............................................
चव्हाण यांच्या उद्योगातील ठळक बाबी (इन्फो)

-हणमंत व हेमलता या दोघांच्या एकत्रित कष्टांमुळे व समन्वयामुळे उद्योग लागला वाढीस.
-एकाच छताखाली सुमारे सहा प्रकारची यंत्रे असल्याने ग्राहकांना एकाच जागेवर सर्व सेवा उपलब्ध होतात.
-डाळी स्वच्छ करून अर्धा किलोपासून ते २५ किलोपर्यंत पॅकिंग करून दिल्या जातात.
- परस्पर पूरक यंत्रे असल्याने व्यवसाय करताना अडचणी कमी होतात.
- शेतकरी संपर्क करून येत असल्याने वेळेत बचत होते.
-उद्योगात दोन मजुरांना कायमचा तर एका मजुराला हंगामी रोजगार उपलब्ध.
.........................................................


हणमंत चव्हाण, ९८८१२८२९८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! नीट २०२६ परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होणार

Kolhapur Ajra 2 Drowning Death : सासऱ्यांचा निवृत्ती कार्यक्रम करून घरी जाताना मामा भाच्याचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू, कोल्हापुरातील आजऱ्यातील घटना

Gold Crisis Explainer: मोदींच्या ‘सोनं खरेदी टाळा’ आवाहनामागे मोठं संकट? तेल, सोनं, डॉलर आणि रुपयामागचं आर्थिक गणित समोर

Shubhendu Adhikari PA: कोण आहे ठाकूर राज सिंह? शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणी अयोध्येत शूटरला अटक; जाणून घ्या राजकीय कनेक्शन

वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल? देशाचे किती लाख कोटी वाचतील? आकडा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT