शुक्रवारी पेस्टिंग
प्रयोगशील शेतीत रमलेला पवार परिवार
छायाताईंचा जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने गौरव
पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील तानाजी व छाया या पवार दांपत्याने प्रगतिशील व प्रयोगशील शेतीचा आदर्श नव्या पिढीपुढे ठेवला आहे. पिकांची तसेच पूरक व्यवसायांची विविधता त्यांनी जपली. कुटुंबाचा एकोपा जपला. शेतीबरोबर सामाजिक कार्यातही बापू आघाडीवर असतात. तर उतरत्या वयातही छायाताईंचा शेतीतील उत्साह जराही कमी झालेला नाही. त्यांच्या शेतीतील योगदानाबद्दल नुकताच २०२४ चा राज्य शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
...............................................................
मनोज कापडे
........................................................................................
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पणदरे भागातील कुरणेवाडी- पवार वस्तीतील तानाजी बाळकृष्ण पवार (बापू) आणि छाया तानाजी पवार हे प्रगतिशील शेती करणारे दांपत्य आहे. केवळ प्रयोगशील शेतीत नव्हे, तर सामाजिक कार्यातील धडपडीसाठीही बापू पंचक्रोशीत परिचित आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासह अडीअडचणीला धावून जाण्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. पवार दांपत्य आज उतरत्या वयातही शेतीत तरुणांच्या उत्साहाने कार्यरत असतात. त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. तीन मुले असून ३५ एकर शेती आहे. मुलगा प्रवीण, त्याची पत्नी मनीषा, मुलगा चंद्रशेखर, त्याची पत्नी स्मिता हे पूर्णवेळ शेतीत राबतात. पदवीधर मुलगा युवराज भोसरी भागात वर्कशॉपची जबाबदारी सांभाळतो. त्यास पत्नी मीनल यांची मदत आहे. बापू सांगतात, की आमचे मोठे कुटुंब आहे. त्यामुळे आर्थिक शाश्वती सांभाळण्याला प्राधान्य दिले. म्हणूनच तिसऱ्या मुलाला अन्य व्यवसायाकडे वळवले. जेणे करून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार होईल. प्रत्येक मुलाची आवड, त्याला कशात रस आहे हे पाहून त्यानुसार कामांची विभागणी करून दिली आहे. मुलगा प्रवीण पशुपालन चांगल्या प्रकारे करतो. सुमारे १५ गाई आणि १२ शेळ्या आहेत. मुक्त गोठा पद्धतीने संगोपन होते. दररोज १२५ ते १५० लिटरच्या आसपास दूध मिळते. श्रीहरी दूध उत्पादन संस्थेला दुधाचा पुरवठा होतो.
शेतीचे व्यवस्थापन
पंधरा एकरांत ऊस, दहा एकरांत ग्रॅंड नैन केळी बाग, २७ माड, ५० आंबा, चिकू ६, सीताफळ ६ व आवळा अशी विविधता जपली आहे. बापूंनी २० वर्षांपूर्वी ३५ फूट व्यासाची सहा परस खोलीची विहीर तयार करीत बागायती शेतीला सुरुवात केली. मजूर समस्येवर उपाय म्हणून कर्ज काढून २०११ मध्ये ट्रॅक्टर घेतला. यांत्रिकीकरणातून मजुरांवरील खर्चात बचत केली आहे. सहा लाखांची आधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली व विहिरीवर तीन अश्वशक्तीचा सौरपंप आहे. उसात कांद्याचे आंतरपीक
असते. उसाचे एकरी ६५ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. सन २०२२-२३ मध्ये दोन एकरांवर दिग्विजय वाणाच्या हरभऱ्याचे उत्पादन घेतले होते. त्या वेळी हेक्टरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊन पुणे जिल्ह्यात कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत पवार यांनी पहिला क्रमांक मिळवला होता. दरवर्षी हरभऱ्याची घरीच डाळ तयार करून विक्री करण्यात येते. शेताभोवती शेवरी, तुती लागवड करून पक्षिथांबे तयार केले आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्रातून एकवेळ मित्रकीटकांची अंडी मागवली होती. लेडी बर्ड, ड्रॅगन फ्लाय, मधमाशी आदी मित्रकीटकांना अपाय होऊ नये म्हणून जैविक कीडनाशकांवर भर तर भाजीपाला पिकांमध्ये कामगंध सापळ्यांचा वापर असतो.
कार्याचा सन्मान
शेतीतील योगदानाबद्दल नुकताच २०२४ चा राज्य शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार छायाताईंना जाहीर झाला आहे. त्याचा कुटुंबाला विशेष आनंद आहे. छायाताई ‘ॲग्रोवन’च्या नियमित वाचक आहेत. त्यातील यशकथा वाचून त्या संबंधित शेतकऱ्यांना कायम संपर्क करतात. घरातील सर्वांना शेतीत सतत प्रेरणा देण्याचे काम त्या करतात. अडचणी सोडविण्यासाठी ॲग्रोवन आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राची कायम मदत होते.
जमीन सुपीकतेला महत्त्व
पवार कुटुंबाने केवळ पीक उत्पादनालाच नव्हे तर जमीन सुपीकतेला तितकेच महत्त्व दिले आहे. दरवर्षी घरचे शेणखत. गांडूळ खत, गोमूत्र, हिरवळीची खते, जिवाणू संवर्धके यांचा शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने वापर होतो. जमिनीचा पोत राखण्यासाठी पिकाची फेरपालट केली जाते. उसानंतर लगेच ऊस न घेता आले, हळद, कारले, कलिंगड, रताळी, हरभरा, भुईमूग अशी पिके घेण्याकडे कल आहे. कृषी सेवा केंद्रातून विकत घेतल्यानंतर पावत्या सांभाळून ठेवण्याची सवय बापूंना आहे. पाण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनाची सोय आहे. उसाचे पाचट न जाळता सरीत त्याचा वापर होतो. संरक्षित पाण्यासाठी विहीर व बोअरवेल असली तरी बापूंनी श्रमदानातून शेताला लागून वनराई बंधारा बांधला आहे.
पूरक व्यवसायांची जोड
चाऱ्यात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी दोन एकर मका, अर्धा एकरात हत्ती गवताची लागवड तसेच मुरघासाची तजवीज केली आहे. दुग्ध व्यवसायातील उत्पन्नातूनच मुलगी परिमलला संगणक अभियंता करणे व मुलगा धनराजला दहावीचे उत्तम शिक्षण देणे शक्य झाल्याचे समाधान वडील प्रवीण यांना आहे. दुग्ध व्यवसायाच्या जोडीला साडेतीन हजार पक्ष्यांचे कुक्कुटपालन, रोहू व कटला जातीचे मत्स्यपालन आणि ५० हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळून देणारे शेळीपालन सुरू ठेवले आहे........................................................
बापूंच्या शिवारातील घंटेचा नाद (इन्फो)
बापू दररोज पहाटे चार वाजता उठतात. गोठ्यातील कामे सुरू होतात. अनेक वर्षांपासून त्यांनी एक दिनचर्या कायम ठेवली आहे. ती म्हणजे शिवारात लोखंडी खांबसदृश घंटा आहे. ती पहाटेच्या पाचच्या ठोक्याला बापू वाजवतात. ती ऐकून परिसरातील शेतकरी जागे होतात. परिसरातील काही ठिकाणे, रस्ते साफ ठेवण्याबाबतही बापू कायम आग्रही असतात. चिंतामणी जोशी, शेखर गायकवाड हे निवृत्त सनदी अधिकारी, जलसंपदा विभागाचे माजी सचिव एच. टी. मेंढेगरी, कृषी सहसंचालक बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. सतत काळ्या आईच्या कुशीत काम करा. कष्टाच्या पैशांवरच गुण्यागोविंदाने संसार करा अशी शिकवण बापूंनी आपल्या मुलांना दिली आहे. त्यांच्या कुटुंबातील आनंदाचे व यशाचे तेच रहस्य आहे.
तानाजी (बापू) पवार, ९०११२४९७४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.