वार्ध्यक्याला मागे सारत जगण्याचा संघर्ष कायम
ऐंशीच्या घरातील दगडी काकींची धडपड चर्चेत; रानटी औषधी चिचुरटी विकून स्वतःची गुजराण
कास, ता. २७ : काही हट्टीकट्टी माणसंही कष्ट न करता, कोणी भीक मागून तर कोणी दुसऱ्याच्या जिवावर ऐतखाऊ होऊन आपले दिवस ढकलत असतात; पण वयाची ऐंशी गाठल्यानंतरही दुर्गम डोंगराळ भागातून औषधी गुणधर्म असलेली चिचुरटी वनस्पतीची फळे विकून गुजराण करणाऱ्या मांटी (ता. जावळी) येथील दगडी काकी आत्मनिर्भरतेचा संदेशच देत आहेत.
दगडी काकींचे नाव लक्ष्मीबाई कोंडिबा शिंदे असून, त्या सह्याद्रीच्या उंच डोंगर माथ्यावरील मांटी गावात राहतात. लक्ष्मीबाई शिंदे यांनी आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्याने गावातील लोक त्यांना दगडी काकी म्हणूनच हाक मारतात. या दगडी काकींना एक मुलगा असून, तो मुंबई शहरात हमालीचे काम करतो. त्याची पत्नी इतरांची धुणीभांडी करत संसाराचा गाडा ओढत आहेत, तर त्यांचा मुलगा नुकताच बारावी झाला असून, तोही काम करत शिकला आहे. मुंबईसारख्या शहरात या कुटुंबाचे स्वतःचेच भागत नाही तर माझं कस भागवणार असं दगडी काकी सांगतात; पण हे सांगताना त्या स्वतः कष्ट करत जगण्याचा प्रयत्न करतात. जावळीचे मुख्यालय असलेल्या मेढ्यात तहसील कचेरीच्या गेटवरच दगडी काकी राणावनात फिरून काटेरी चिचुरटी गोळा करून, छोटे छोटे ढीग लावून विकत असल्याचे कायम दिसते. बरं हा चिचुरटीचा वाटा फक्त दहा रुपयांत विकतात. असे दहा- पंधरा वाटे विकून आजींना पैसे मिळणार तरी किती? त्यात अत्यंत कडवट असणारी ही भाजी सर्वच घेतात असेही नाही. त्यामुळे कधी कधी विकले न गेल्यामुळे काट्याकुट्यात हात रक्तबंबाळ करून आणलेले ही फळे माघारी न्यावी लागतात, तरीही आजी या सतत हसतमुख असतात.
मांटी गावातून मेढ्याला यायचे तर वडापचे वाहन सकाळी ठराविक वेळीच असते. तेही दुपारी लवकर परतते. त्यानंतर आजींना चार-पाच वाजेपर्यंत आपली फळ विकल्यानंतर माघारी जाण्यासाठी गाडीही नसते. त्यानंतर मेढ्यात कुठेतरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळच्या एसटीने घर गाठतात. आठवड्यातून तीन- चार दिवस त्या आपला छोटेस दुकान मांडून तहसील कार्यालयाच्या गेटवरच बसलेल्या असतात.
दगडी आजी छपरातच राहात होत्या; पण गेल्या वर्षी त्यांना घरकुल मिळाल्याने हक्काचा निवारा उपलब्ध झाला आहे, तरीही पोटापाण्यासाठी या वयातही जिद्दीने कष्ट करत मिळणाऱ्या पाच-पन्नास, शंभर रुपयात आपलं जीवन आनंदाने व्यतीत करत आहेत. ज्या तहसील कार्यालयातून अनेकांना अनेक योजनांचा लाभ मिळतो त्याच तहसील कार्यालयाच्या गेटवर पन्नास, शंभर रुपयांसाठी औषधी वनस्पती विकणाऱ्या या आजींसाठी एखादी योजना शासन देईल का? दारातून रोज आत बाहेर करणारे अधिकारी या म्हातारीकडे लक्ष देतील का? असे प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहेत.
शिक्षणाची आवड आणि दातृत्व..
दगडी आजी या जुन्या काळातही तिसरी चौथी शिकल्या असून, शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहीत आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला शाळेच्या कार्यक्रमात पन्नास रुपयाची तरी देणगी त्या आवर्जून देतात, असे मांटी येथील शिक्षक नामदेव जुनघरे यांनी सांगितले. आपल्याकडे काही नसले तरी त्यांच्याकडे असलेले हे दातृत्व इतरांना आदर्शवत आहे. चिचुरटी ही अत्यंत कडू; पण आरोग्यासाठी वरदान असलेली फळं विकून दगडी काकी लोकांचे आरोग्य जपण्याचे काम नकळतपणे करत आहेत.
..................................................
चिचुरटी म्हणजे डोरली वांगी
चिचुरटीला डोरली वांगी किंवा रानवांगी ही म्हटले जाते. ही रानटी व काटेरी औषधी वनस्पती असून, याच्या फळाची सुकी भाजी केली जाते. पित्तावर अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे. सह्याद्रीच्या माथ्यावरील दुर्गम भागात याची छोटी काटेरी झुडपे असतात.
...................................................
फोटो :...........KSS26B04631
मेढा : येथील तहसील कार्यालयाच्या गेटपुढेच बसून चिचुरटी विकणाऱ्या दगडी काकी. (अर्चना पवार : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.