आळंदी, ता. २८ : मरकळ (ता. खेड) येथील शेतकरी दाम्पत्य इन्स्टाग्रामवरील रीलच्या आमिषाला बळी पडल्याने १९ लाख ४ हजार ९०० रुपये गमवावे लागले. २० रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात ५१ लाखांचे आमिष आणि डिजिटल अटकेची धमकी देत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शेतकरी रवींद्र बाबाजी उंदरे (वय ३२, रा. मरकळ) यांनी मंगळवारी (ता. २७) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हा सायबर फसवणुकीचा प्रकार घडला. उंदरे यांना इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना २० रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात ५१ लाख रुपये मिळतील, अशी एक जाहिरात दिसली. या आमिषाला बळी पडून त्यांनी रीलमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
आरोपींनी त्यांना टप्प्याटप्प्याने विविध कारणे पुढे करत पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानुसार उंदरे यांनी शिवकृपा पतसंस्था, आळंदी येथून ८ लाख ६२ हजार ९०० रुपये, तर त्यांच्या पत्नी अक्षदा यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून तसेच फोन-पे द्वारे १० लाख ४२ हजार ७०० रुपये, असे एकूण १९ लाख ४ हजार ९०० रुपये आरोपींच्या विविध बँक खात्यांवर आणि मोबाईल क्रमांकांवर हस्तांतरित केले.
याप्रकरणी विकास पटेल, राणा प्रताप सिंग, झोरासिंग, सुरज रावत, प्रकाश किरार, कल्पना शाह आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेल्या सात मोबाईल क्रमांकांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील प्रकाश किरार (ॲक्सिस बँक), सिद्धी येथील सुरज रावत (बँक ऑफ महाराष्ट्र) आणि वडोदरा येथील कल्पना शाह (कोटक महिंद्रा बँक) यांच्या खात्यांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.
''डिजिटल अरेस्ट''ची धमकी
आरोपींनी सुरुवातीला केवळ ७५० रुपये प्रोसेसिंग शुल्क मागितले. त्यानंतर विविध कारणे सांगून मोठी रक्कम उकळली. पैसे देण्यास नकार दिल्यास किंवा शंका व्यक्त केल्यास सायबर पोलिसांची भीती घालून ''डिजिटल अरेस्ट'' करण्याची धमकी दिली जात होती. याच भीतीमुळे घाबरून उंदरे पती-पत्नी पैसे पाठवत राहिले आणि त्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.