इन्स्टाग्रामवरील मेसेजच्या रागातून अपहरण
नागठाण्यातील गोदामात युवकास अमानुष मारहाण; १३ जणांविरुद्ध गुन्हा
काशीळ, ता. ४ : इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याच्या कारणावरून एका २२ वर्षीय तरुणाचे मोटारीतून अपहरण करून त्याला गोदामात डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर लोखंडी रॉड, केबल वायरने बेदम मारहाण करत विजेचे झटके देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिग्विजय दिनकर थोरात (वय २२, रा. नडशी, ता. कऱ्हाड) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गणेश जयसिंग शिंदे, गणेश संतोष हादगे, बंटी ऊर्फ तेजस नीलेश साळुंखे, सनी ऊर्फ नीलेश रमेश नलवडे, गणेश नलवडे (सर्व रा. नागठाणे), जय पवार, महेश (पूर्ण नाव नाही) (सर्व रा. तारळे), शिवानी गणेश हादगे, श्रुती आणि इतर चार अनोळखी अशा एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिग्विजय याने एका संशयिताच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला होता. याचा राग मनात धरून संशयितांनी कट रचला. नुणे-चिंचणी रस्त्यावरून दिग्विजयचे हातपाय बांधून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. त्यानंतर नागठाणे येथील एका गोदामात डांबून ठेवून त्याला रॉड, काठी, पाइप आणि केबल वायरने अमानुष मारहाण करण्यात आली, तसेच बॅटरीद्वारे विजेचे झटके देऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवत बंटी ऊर्फ तेजस साळुंखेला ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम. ई. पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, फरारी संशयितांचा शोध सुरू आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.