‘होर्मुझ’साठी इराणच्या नव्या अटी
‘यूएई’च्या जहाजावर हल्ला; येमेनच्या सैन्याचे हौथींवर हल्ले
दुबई, ता. ९ (पीटीआय) : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत नवीन अटी घातल्या आहेत. अमेरिकेने इराणला पुन्हा कधीही धमकी देऊ नये, इराण आणि त्याच्या मित्रराष्ट्रांसोबतचे युद्ध कायमचे थांबवावे, इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी उठवून या भागातून आपले सैन्य मागे घ्यावे, अशा मागण्या इराणने केल्या आहेत.
दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीने आपल्या एका जहाजावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे; तसेच येमेनच्या सैन्याने इराणचा पाठिंबा असलेल्या हौथी बंडखोरांवर हल्ला केला, तर तुर्कियेच्या संसदेत कुर्द शांतता विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिका आपले वर्तन सुधारत नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही. परिषदेचे सचिव आणि ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे कमांडर मोहम्मद बाघेर झोलघाद्र यांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे; तसेच युद्धातील नुकसानीची पूर्ण भरपाई देऊन इराणची गोठवलेली मालमत्ता बिनशर्त मुक्त करावी, असेही यात म्हटले आहे. यावर अमेरिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इराण आणि ओमान यांच्यात सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनाबाबत स्वतंत्र करार होण्याची शक्यता आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी जलवाहतुकीबाबत कराराच्या जवळ असल्याचे सांगितले. मात्र, सामुद्रधुनी उघडणे इतर अटींवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.
जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराण आणि ओमानमध्ये तात्पुरता करार होऊ शकतो. या करारानुसार, जहाजे इराणच्या जवळच्या मार्गाने प्रवेश करतील आणि ओमानच्या जवळच्या मार्गाने बाहेर पडतील. या काळात जहाजांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हा करार झाल्यास इराणला तेलविक्री करणे शक्य होईल.
इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र
अबुधाबीच्या ‘ॲडनॉक’ कंपनीचे जहाज सामुद्रधुनीतून जात असताना इराणने त्यावर क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप ‘यूएई’च्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. फेब्रुवारीपासून आतापर्यंत कंपनीच्या डझनभर जहाजांवर हल्ले झाले असून, त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
येमेनच्या सैन्याचे हल्ले
हौथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून येमेनच्या सैन्याने त्यांच्या तळांवर हल्ले केले. लष्कराचे प्रवक्ते कर्नल माजेद अल-नाझिली यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. यामुळे येमेनमध्ये पुन्हा यादवी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
विधेयकाला मंजुरी
कुर्द बंडखोरांसोबत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विधेयकाला तुर्कियेच्या संसदीय समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात यावर अंतिम मोहोर उमटण्याची शक्यता आहे. ‘पीकेके’ या संघटनेने शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.