आळंदी, ता. १६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून चिखली-कुदळवाडीतील सांडपाणी उघड्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीपात्रात बिनदिक्कतपणे सोडले जात आहे. यामुळे इंद्रायणीसह पात्रातील जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी सदोदित काळवंडलेली दिसून येते. हजारो लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता उघड्या नाल्यामार्फत नदीपात्रात सोडल्याने इंद्रायणीचे अस्तित्व आता धोक्याबाहेर गेले आहे. श्रीमंत समजली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मात्र नदी प्रदूषण हटवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने आळंदीकरांकडून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
इंद्रायणी नदी मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील उगमस्थानापासून ते आळंदी पंचक्रोशीजवळील तुळापूर येथील संगमस्थानापर्यंत ग्रामपंचायत, नगरपरिषद हद्दीत नागरीकरण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये शहरीकरण कमालीचे वाढल्याने सांडपाणी व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे असतील, दुकाने अथवा निवासी प्रकल्पांतील सर्व प्रकारचे सांडपाणी उघड्या नाल्यामार्फत थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडले जात आहे.
आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून १८ कोटी रुपये खर्च करून बंद जलवाहिनीद्वारे व्यवस्था तयार करण्यात आली. मात्र, तरीही शहराचे पाणी नदीपात्रातच मिसळण्याचे चित्र आहे. १८ कोटी रुपये पाण्यात घालवल्यासारखेच आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय कार्यालय पवित्र इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या गावांना प्रदूषित पाण्याचा फटका
मोई, चिम्बली, आळंदी आणि आळंदी पंचक्रोशीतील गावे
येथूनही सांडपाणी नदीपात्रात
देहू नगरपरिषद
तळेगाव औद्योगिक विभाग
कामशेत भाग
दृष्टिक्षेपात
- पाऊस गेल्यानंतर पुन्हा इंद्रायणीला गटाराचे स्वरूप
- आळंदी नगरपरिषदेचे सांडपाणी २४ तास प्रक्रियेशिवाय नदीपात्रात
- नगरपरिषद कार्यालयासमोरच सोडले जाते सांडपाणी नदीपात्रात
- पवित्र इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्याबाबत कोणीही गंभीर नसल्याचे चित्र
प्रदूषित पाण्यामुळे झालेली हानी...
- माशांसारख्या जलचर जिवांचा मृत्यू.
- मृत माशांमुळे नदीकाठच्या नागरिकांसह वारकरी संस्थांना दुर्गंधीचा त्रास
- शेतातील पिकांच्या वाढीवर परिणाम
- प्रदूषित पाण्यामुळे प्राण्यांचे आरोग्य धोक्यात
08551
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.