मशागत
...................
मुलांचं बालपण हरवलं...
- तान्हाजी बोऱ्हाडे
थोर शिक्षणतज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, ‘प्रत्येक मूल असा संदेश घेऊन जन्माला येते, की अजूनही देवाचा माणसावरील विश्वास कायम आहे.’ पण आपण मोठी माणसं मात्र त्या मुलाशी असं वागत आहोत, की देवाचाच नाही, तर त्या मुलाचाही माणसावरील विश्वास उडेल. बालपण म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद आणि निरागस हसू. बालपण म्हणजे आईच्या कुशीतली ऊब आणि बाबांच्या खांद्यावरून पाहिलेलं जग. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकलेली गोष्ट आणि आजोबांचे बोट धरून गावात मारलेली चक्कर, मामाच्या गावात हिंडून वेचलेली आंबट गोड चिंचा, बोरं... पण आता हे सगळं लहानग्यांच्या नशिबात कुठं उरलंय? ते तर केव्हाच हरवलं. होय, मुलांचं बालपण हरवलंय! आजकाल मुलांना सकाळी झोपेतून अक्षरशः गदागदा हलवून जागं केलं जातं. कोवळी सूर्यकिरणे अंगावर येण्याआधीच युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलं जातं आणि ते दप्तराचं ओझ तर इतकं मोठं की त्या मुलांची पाठ वाकून जाईल. या ओझ्याने फुलासारखं नाजूक मन जणू कोमेजून जात आहे. समईतील वात पेटण्याआधीच विझून चालली आहे. शाळा, शिक्षक, आणि पालक त्या एवढ्याशा जिवाला किती परीक्षा द्यायला लावतात? द्या परीक्षा मिळवा मार्कस. परीक्षेत मार्क्स मिळतील हो... पण व्यक्तिमत्त्वातील गुण कसे विकसित करणार?
आज मुलांच्या हातात खेळणी कमी आणि मोबाइल जास्त दिसतो, ऑनलाइन स्टडी, ऑनलाइन क्लास, ऑनलाइन परीक्षा. इतकंच नाही तर मुलं आता खेळही मैदानात जाऊन खेळण्याऐवजी मोबाइलमध्येच खेळू लागलीत. मैदाने रिकामी आहेत आणि मोबाइलची मेमरी मात्र फुल आहे. वडील लॅपटॉपमध्ये, आई व्हॉट्स ॲपवर, तर दीदी रिल्स बघतेय. घरातल्या मुलांनी बोलायचं कोणाशी? आणि लाडाने जवळ घेणारे आजी-आजोबाही आता घरात नाहीत. पालक सांगतात इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हे करू नको, ते करू नको... जंगलात उगवणारे रोपटे संघर्ष करत वाढते आणि एक दिवस त्याचा महावृक्ष होते. आजच्या आई-वडिलांना आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाना महावृक्ष बनवायचं आहे की बोन्साय?
खरं तर भरवा ना एक दिवस बिनदप्तराची शाळा. माखूद्या त्यांच्या हातांना चित्रकलेचे रंग, लागूद्या त्या चिमुकल्या पायांना मैदानावरची चिखल माती. पाहूद्या त्यांना रानातली झाडं, वेली, फुले आणि फळे. ऐकूद्या थोडा वेळ पाखरांची गाणी. भिजूद्या पावसात चिंब होऊन, मग बघा कशी कळ्यांची फुलं होतील आणि सुरवंटांची फुलपाखरे होतील!
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, आजची मुले उद्याचा भारत घडवतील. आज आपण त्यांना जसे घडवू तसाच उद्याचा भारत घडेल! मग पालकांनी विचार करायला हवा. आपल्याला उद्याचा भारत कसा हवा आहे? उमलण्याआधीच कोमेजून गेलेला रुक्ष भारत की मन, मेंदू आणि मनगट यांचा विकास घडलेला सशक्त भारत?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.