जळगाव महापालिका विश्लेषण
--------------------------
फोटो - NSK26H10067
महायुतीच्या नियोजनाचा अपेक्षित परिणाम
सचिन जोशी : सकाळ वृत्तसेवा
साडेसात वर्षांनी होत असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल अजिबात अनपेक्षित नाही. उलट तो धक्कादायक यासाठी आहे की, ७५ पैकी तब्बल ६९ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी ठरलेत. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ‘क्लीन स्वीप’ मिळाल्यानंतरही विरोधी पक्षांनी धडा घेतलेला नाही, हेच या निकालातूनही दिसून येते. उलटपक्षी महायुतीने अंतिम टप्प्यातील प्रचारापर्यंत नियोजन, मतदारांना बाहेर काढण्यापर्यंतचे व्यवस्थापन उत्तम केले. प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांची आघाडी निवडणूक लढतेय असे वाटलेच नाही.
या वेळी झालेली निवडणूक दोन किंवा तीन सक्षम प्रतिस्पर्ध्यांमधील सामना, लढत म्हणून गाजलीच नाही. सुरवातीला भाजप- शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महायुती करण्यासंदर्भात आणि महायुती झाल्यावर उमेदवारी वाटपातील घोळामुळे या तीनही पक्षांमध्ये गोंधळ झाला. महायुतीच्या तीनही पक्षांमधील हा गोंधळ विरोधी शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या आघाडीला ‘कॅश’ करता आला नाही. उलट या दोघा पक्षांच्या आघाडीपासून कॉंग्रेसने वेगळी चूल मांडली, मनसे व ‘एमआयएम’सारखे पक्षही स्वतंत्र लढले. भाजप- शिवसेनेने प्रत्येकी ६ असे महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आणत निवडणुकीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. महायुतीच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सभा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ झाला. एकनाथ शिंदेंचा ‘रोड शो’ ऐनवेळी रद्द झाला. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी या ‘रोड शो’ केला.
विरोधी नेते फिरकलेच नाहीत
विरोधी पक्षांकडून राज्य पातळीवरून एकही नेता जळगावकडे फिरकला नाही. शिवसेना (उबाठा)चे ना उद्धव ठाकरे आले, ना संजय राऊत.. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडूनही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील अथवा सर्वेसर्वा शरद पवारांनी साधे ढुंकूनही पाहिले नाही. मनसे, कॉंग्रेसची स्थिती तर आणखीच वाईट. प्रभाग १७ मधील चारही जागांसह प्रभाग ६ मधील एक जागा अशा ५ ठिकाणी विजय मिळवून ठाकरेंची शिवसेनेने आघाडीची अब्रू राखली. पण, त्याचे श्रेय पक्षापेक्षाही मतदार व उमेदवारांना द्यायला हवे.
------
धुळे महापालिका निवडणूक विश्लेषण
-------------------------------
फोटो क्रमांक : 10066
हिंदुत्व अन् विकासाला जनमत
निखिल सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
धुळे महापालिकेच्या रणांगणात भारतीय जनता पक्षाने आपल्या जादुई रणनीतीच्या जोरावर पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकावला आहे. महापालिकेत पुन्हा एकदा ५० जागांसह निर्विवाद बहुमत मिळवत ‘कमळ’ फुलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीनेही ताकद लावली होती. मात्र, निवडणूक जिंकण्याच्या तंत्रात पटाईत असलेल्या भाजपच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’पुढे सर्वच विरोधक निष्प्रभ ठरले. समाजवादी पक्ष, बसप, जनता दल (सेक्युलर) आणि ७८ अपक्षांनाही मतदारांनी सपशेल नाकारले आहे.
स्वबळावर लढणाऱ्या भाजपची मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युतीसह भाजपच्याच दोन- चार नाराजांनी हवा खराब करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भाजपचे नेते आणि उमेदवार काहीसे धास्तावले. मात्र, भाजपने १९ पैकी १५ प्रभागांमध्ये जातीय समीकरणांची जुळवाजुळव करत प्रचार सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने ‘हिंदुत्व’ आणि ‘शाश्वत विकास’ हा प्रचाराचा मुख्य अजेंडा ठेवला. विरोधकांनी भाजपच्या सत्ता काळातील वाढीव घरपट्टी, रस्त्यांचे निकृष्ट काम व खड्डे, भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि पाणीपुरवठ्यातील अनियमितता यांसारख्या नागरी प्रश्नांवर रान उठवले. परंतु, केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर होणाऱ्या विकासाला धुळेकरांनी पसंती दिली. भाजपने ‘५५ प्लस’चा नारा दिला होता. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे भाजपने ७४ पैकी पुन्हा एकदा ५० जागा मिळविल्या. या निकालाने धुळे शहरात भाजपची पकड किती घट्ट आहे, हे अधोरेखित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.