कुश्नर यांचे बेहिशेबी व्यवहार
गोपनीय खात्यांतून लाखो डॉलर वळविल्याचा अमेरिकी माध्यमांचा आरोप
वॉशिंग्टन, ता. २३ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेअर्ड कुश्नर यांची अनेक गोपनीय परदेशी बँक खाती असून, त्यातून लाखो डॉलर अन्य खात्यांवर वळविण्यात आली आहेत,. इस्रायल, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सौदी अरेबिया यांच्याशी संबंधित हे व्यवहार होते, असा आरोप अमेरिकेतील माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. कुश्नर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
‘वॅनिटी फेअर’ या अमेरिकी माध्यमामध्ये नेदरलँडच्या शोधपत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या शोधपत्रकाराला रशियन हॅकरच्या मदतीने रशियन लष्करी गुप्तचर संस्थेशी संबंधित सर्व्हरवरील माहिती मिळाली. त्यामध्ये कुश्नर यांच्या आयफोनचे स्क्रीनशॉट मिळाले आहेत. कुश्नर यांना ‘यूएई’च्या एका बँक खात्याचा वापर करण्यास परवानगी मिळाली होती. त्यामध्ये अझरबैजानहून ७५ कोटी डॉलर आले होते. हे बँक खाते अबुधाबी बँकेत असून, वतनी अल-एमरात फाउंडेशन या सरकारशी संबंधित धर्मादाय संस्थेचे हे खाते आहे. हे खाते तांत्रिकदृष्ट्या कुश्नेर यांचे नसले, तरी सह्यांचे अधिकार त्यांना होते, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. ‘कुश्नेर मुत्सद्देगिरीमध्ये सोप्या मार्गांचा वापर करत होते,’ असे त्यांच्याशी संबंधित एका व्यक्तीने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये ‘यूएई’चे अध्यक्ष महंमद बीन झायेद आणि सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बीन सलमान यांनी सुरुवातीला परराष्ट्र धोरण निधीविषयी चर्चा केली होती. ही कल्पना पुढे गेली नाही. मात्र, दोन ते तीन खात्यांमध्ये दोन अब्ज डॉलर ठेवण्यात आले होते, असा आरोप या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. या निधीमध्ये सहभागी झाल्यास ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्याचे आश्वासन कुश्नर यांनी महंमद बीन सलमान यांना दिले होते. त्यांना इस्रायलबरोबरील संबंध सुरळीत हवे होते, त्यामुळे व्यापार वाढण्याची शक्यता होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या वृत्तातील आरोपानुसार, एका वेगळ्या बँक खात्यातून अझरबैजानमार्गे इस्रायलला एक अब्ज डॉलरची रक्कम पाठविण्यात आली होती. यातील काही रक्कम सायप्रसमार्गे वळविण्यात आली होती. मात्र, या व्यवहारांचा हेतू स्पष्ट नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘धक्कादायक, बनावट कहाणी’
कुश्नर यांनी ‘एक्स’वर दिलेल्या प्रतिक्रियेत सर्व आरोप फेटाळले आहेत आणि या आरोपांचे पुरावे मागितले आहेत. बँक खात्याचा कोणताही तपशील नाही, बँक खात्याचा क्रमांक नाही, व्यवहारांच्या तारखा नाहीत आणि अन्य कोणताही विश्वासार्ह पुरावा नसताना हा आरोप करण्यात आला आहे, असे त्यांनी या प्रतिक्रियेत म्हटले आहे. या प्रकरणी काँग्रेस समित्यांच्या चौकशा आणि विशेष सरकारी वकिलामार्फत तपास करण्यात आला होता. या चौकशीदरम्यान मी स्वेच्छेने ३० तासांहून अधिक काळ साक्ष दिली होती, असे नमूद करतानाच ही धक्कादायक आणि बनावट कहाणी आहे, असा आरोपही केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.