जेजुरी, ता. ५ : येथील रेल्वे स्थानकावर दोन अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवासी आणि भाविकांच्या पंधरा वर्षांपासूनच्या मागणीची दखल घेत, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दोन गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाकडे पाठवला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी एका अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार, गाडी क्रमांक ११०४९/११०५० आणि १७३१७/१७३१८ यांना जेजुरी येथे थांबा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या जेजुरी स्थानकावर मेल/एक्स्प्रेसच्या पाच जोड्या, डेमूच्या दोन जोड्या आणि एका विशेष गाडीला थांबा आहे. याव्यतिरिक्त, कोल्हापूर-मुंबई सीएसएमटी फेस्टिव्हल स्पेशल (०१४१७/०१४१८) गाडीही येथे थांबते.
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी देशभरातून, विशेषतः कर्नाटक, मुंबई आणि पुणे येथून, वर्षभर लाखो भाविक जेजुरीला येतात, तसेच परिसरातील औद्योगिक विकासामुळे नोकरदार, व्यावसायिक आणि सामान्य प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. मात्र, अपुऱ्या रेल्वे थांब्यांमुळे सर्वांनाच गैरसोयीचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामस्थ, देवस्थान समिती, विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. यामध्ये गणेश आबनावे, अमोल शेळे, विजय खोमणे, सचिन पेशवे, जयदीप बारभाई, अलका शिंदे, विठ्ठल सोनवणे, जालिंदर खोमणे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, डॉ. सुधीर ताम्हाणे, डॉ. नितीन केंजळे यांच्यासह मुंबई व पनवेल येथील भाविक संघटनांचा सक्रिय सहभाग आहे.
रेल्वे थांब्यांसोबतच, स्थानकावर प्रवासी सुविधा वाढवणे आणि एखाद्या गाडीला ‘खंडोबा’, ‘मल्हार’ किंवा ‘जयाद्री’ असे नाव देण्याची मागणीही केली आहे. प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाकडे असल्याने, आता जेजुरीकरांचे लक्ष मुख्यालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.