दौंड, ता. १८ : शहरात महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून दुचाकीवरील दोघांनी तिच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला आहे.
शहरातील भोईटेनगर येथे शनिवारी (ता. १७) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रतिभा संजय भंगारे (रा. भोईटेनगर, दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भंगारे या घरासमोरचा परिसर स्वच्छ करीत असताना नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी हिंदीत ‘येथे संजय राऊत नावाचे कोणी राहतात का?’ अशी विचारणा केली. भंगारे यांनी माहिती नसल्याचे सांगून पुढे चौकशी करण्यास सांगितले. त्या पुन्हा कामासाठी खाली वाकताच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावले. दोघे चोरटे राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातजवळील श्री म्हसोबा मंदिराच्या दिशेने पसार झाले. भंगारे यांनी आरडाओरडा करून मुलीला हा प्रकार सांगितला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर त्या कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या, परंतु त्यांना दुपारनंतर येण्यास सांगण्यात आले. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद घेण्यास विलंब
चोरट्यांनी गंठण हिसकावल्यानंतर प्रतिभा भंगारे सकाळी व दुपारी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेल्या होत्या. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणाऱ्या ११२ या क्रमांकावर देखील त्यांनी संपर्क साधून झालेला प्रकार कळविला होता. परंतु अन्य फिर्याद घेण्याचे काम सुरू असल्याचे कारण सांगत त्यांची पोलिस ठाण्यात फिर्याद घेण्यात आली नाही. अखेर रात्री नऊ वाजता त्यांची फिर्याद नोंदविण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.