चेन्नई, ता. २६ (पीटीआय) : अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीसाठी तमिळनाडूमध्ये आयोजित सहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शुक्रवारी स्वतः सहभाग घेत सहा किलोमीटर अंतर धावून मॅरेथॉन पूर्ण केली. ५२ वर्षीय विजय यांनी चेन्नईतील मरीना बीचवर सलग सहा किलोमीटर धाव पूर्ण केली. सामाजिक उद्देशासाठी जनतेसोबत एवढ्या अंतराची धाव पूर्ण करणारे तामिळनाडूचे ते पहिलेच विद्यमान मुख्यमंत्री ठरले असल्याचा दावाही करण्यात येत आहे. ही मॅरेथॉन तमिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरणाने (एसडीएटी) आयोजित केली होती.
आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी आणि बेकायदा अमलीपदार्थ तस्करीविरोधी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री विजय यांनी राज्य अमली पदार्थमुक्त, सुरक्षित आणि निरोगी करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. विजय यांनी ‘स्टार्ट रन, स्टॉप ड्रग्स’ या जनजागृती मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करून दिली. त्यानंतर अचानकच विजय व्यासपीठावरून खाली उतरले आणि सहभागींसह धावायला सुरुवात केली. विजय यांच्या या कृत्याचे माजी राज्यपाल आणि भाजप नेत्या डॉ. तमिळिसाई सौंदरराजन यांनी कौतुक केले. या कार्यक्रमात विजय यांनी सहभागींना अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथही दिली.लोकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्येही अमली पदार्थविरोधी धाव आणि मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.