जुन्नर, ता. ११ : प्रशासकीय अडचणीमुळे निवडणूक लांबणीवर पडलेल्या जानेवारी २०२६ व फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या जुन्नर तालुक्यातील १४५ पैकी ६३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले आहेत. जुन्नर पंचायत समितीमधील सात विस्तार अधिकाऱ्यांवर ६३ ग्रामपंचायतचे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे काही विस्तार अधिकाऱ्यांवर ११ ते १३ ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे प्रशासक ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत. पंचायत समितीमधील कृषी, शिक्षण, पंचायत, आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावर यांनी दिली.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजू किसन कोंढावळे यांच्यावर वारूळवाडी, आळे, खोडद, आर्वी, उदापूर या मोठ्या ग्रामपंचायतींसह एकूण १३ ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे प्रशासक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, पिण्याचे पाणी, कचरा, आरोग्य,सांडपाणी व्यवस्थापन आदी सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात किती वेळ उपस्थित राहणार? ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे चालणार का? असा प्रश्न वारूळवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेहेर यांनी उपस्थित केला.
जुन्नर पंचायत समितीमध्ये उपलब्ध असणाऱ्या सात विस्तार अधिकाऱ्यांवर ६३ ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. काही विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून जास्त ग्रामपंचायतीचा कारभार पहावा लागणार आहे. त्यांच्या मदतीला ग्रामविकास अधिकारी आहेत. मात्र, योग्य नियोजन करून ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जाईल.
- प्रतीक चन्नेवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.