PNE26W55908
सोलापूर : बसवकल्याण येथील बसवमूर्तीच्या दर्शनप्रसंगी मंगळवेढा ते बसवकल्याण ज्योती यात्रेत सहभागी नागरिक.
मंगळवेढा ते बसवकल्याण ‘ज्योती यात्रा’ उत्साहात
शरण बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि दासोहाच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ७ ः संतभूमी मंगळवेढा ते क्रांतिभूमी बसवकल्याण आयोजित ‘ज्योती यात्रा’ शरण बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागात भक्तीमय व वैचारिक वातावरणात नुकतीच पार पडली. महात्मा बसवेश्वरांचे समता, बंधुता, कायक-दासोह आणि मानवतेचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवेढ्यातील शरण रेवणसिद्धेश्वर मंदिरात सामूहिक दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर संत चोखोबा, छत्रपती शिवाजी महाराज, संत दामाजी यांचे दर्शन घेऊन सोलापूर येथे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. बसवकल्याण येथे १०८ फूट उंच बसव महामने स्मारक परिसरात पूज्य सिद्धेश्वर अप्पा यांच्या सान्निध्यात मुख्य कार्यक्रम झाला. शरणी महिलांच्या हस्ते इष्टलिंग पूजन करण्यात आले.
पूज्य सिद्धेश्वर अप्पा यांनी लिंगायत धर्माच्या विचारधारेसह लिंगानंद स्वामी व माता महादेवी यांच्या कार्याची माहिती दिली. आगामी २४, २५ व २६ ऑक्टोबरला होणाऱ्या ‘कल्याण पर्वा’त विविध राज्यांतील शरण बांधव सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रवी बिराजदार, श्रीकांत खडके, सागर पाटील, अमोल म्हमाणे, ॲड. भारत पवार व चंद्रकांत बुगडे यांनी मार्गदर्शन केले. मंगळवेढ्यातील मासिक अनुभव मंटपाची वाटचाल, वचन साहित्याचा प्रचार आणि ‘वचन साहित्य ग्रंथालय’ सुरू करण्याबाबत अमोल म्हमाणे यांनी मागणी केली. वचन चिंतन व अनुभव मंटपातून महात्मा बसवेश्वर व शिवशरणांच्या वचनांवर चर्चा झाली. त्यानंतर महाप्रसाद-दासोहाचा लाभ घेऊन शरणी अक्कमहादेवी गुहा व अनुभव मंटप संकुलाची पाहणी करण्यात आली.
यात्रेत विनोद प्रभाकर पाटील, सिद्धेश्वर कनुरे, जवाहर चनशेट्टी, संजय पाटील, दत्तात्रय घोडके, हनमंत कोष्टी, चिमराया धुमाळे, महादेव जिरगे, दिलीप मेहत्रे, सोमनाथ पाटील, दत्तात्रय जुंदळे, माणिक पाटील, पद्ममाकर बनसोडे, अशोक मगदूम यांचे सहकार्य लाभले. मंगळवेढा व परिसरातील शरण बांधव व शरणी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.