पुणे

काकासाहेबांचा जीवनपट बोरीपार्धी ते बोरीबंदर प्रवास

CD

काकासाहेबांचा जीवनपट
बोरीपार्धी ते बोरीबंदर प्रवास

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. भाकरीची भ्रांत असणाऱ्या अनेक तरुणांनी या मुंबापुरीत येऊन आपले नशीब आजमावले. पैसा आणि नाव कमवीत आपले संसार थाटले. ज्येष्ठ कामगार नेते काकासाहेब थोरात याला अपवाद होते. त्यांनीही पोटासाठी मुंबईची वाट धरली. आपला प्रपंच सावरता सावरता त्यांनी हजारो कामगारांचे संसार उभे केले. अन्यायपीडित व शोषित कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. त्यांचे कार्य एक मैलाचा दगड बनून राहिले आहे. कामगारांसाठी त्यांनी केलेल्या कार्याला देशात तोड नाही. त्यांचा आज जन्मशताब्दी महोत्सव आहे. त्यानिमित्त त्याच्या कार्याला दिलेला हा उजाळा.

- रमेश वत्रे, केडगाव

कोणालाही हेवा वाटावा, असे चेहऱ्यावरील तेज, बोलण्यातून व्यक्त होणारा आत्मविश्वास, पारखी नजर, स्पष्ट स्वभाव, ठेंगणी मूर्ती, खादीचा पेहराव वर जॅकेट, स्वच्छ चारित्र्यासाठी अनेकांना परिचित असणारे, स्वातंत्र्यसैनिक व माथाडी कामगारांचे नेते माजी आमदार काकासाहेब थोरात यांनी माथाडी कामगारांच्या जीवनात क्रांती घडवली. सहकाराचा महामेरू, गरिबांचा अन्नदाता, समाजकारणाचा दीपस्तंभ, सर्वसामान्यांचा पथदर्शक, कामगारांच्या बाहूतील ताईत, अशा असंख्य गुणांनी युक्त व परिपूर्ण व्यक्तिमत्त्व २९ ऑक्टोबर २००१ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. काकासाहेबांच्या आठवणींनी ऊर भरून येतो आणि असे वाटून जाते की, या सम हाच. हमाली करण्यासाठी गेलेल्या काकासाहेब यांची मुंबई हीच कर्मभूमी व यशोभूमी ठरली.
काकासाहेब थोरात यांनी मुंबईसारख्या भांडवलदार शहरात जाऊन जी कामगिरी करून दाखविली तिला तोड नाही. त्यांचे वडील रामजी थोरात मुंबई गोदीत हमाली करत. चौथी शिकलेले काकासाहेब १९४४ मध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले. वडीलांच्या बरोबर त्यांनीही हमाली सुरू केली. त्यावेळी त्यांच्या गाववाल्यांना नातेवाईकांना स्वप्नातही वाटले नसेल की, काका एवढी मोठी अजब कामगिरी करून दाखवतील. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण बेरोजगारांना मुंबईत गेल्यावर आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागतो. वेळप्रसंगी कमी दर्जाचे कामही करावे लागते. चौथी शिकलेल्या काकासाहेबांकडून समाजाने व कुटुंबाने तरी काय अपेक्षा बाळगावी? मात्र काही माणसांच्या बाबतीत शिक्षण हा मुद्दा गौण ठरतो. कारण, ती जन्मताच असामान्य असतात.

गवळी मास्तरांकडून देशभक्तीचे धडे
अगदी लहानपणापासून काकासाहेब यांचा पिंड देशभक्तीचा. धनगर समाजात जन्म झाला असल्यामुळे लहानपणातील काही वर्षे शेळ्या-मेंढ्या राखण्यात गेले. त्यांच्या बोरीपार्धी (ता. दौंड) गावात गवळी मास्तरांनी दिलेले देशभक्तीचे धडे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मुंबईत गेल्यानंतर त्यांचा काही स्वातंत्र्यसैनिकांशी जवळचा संबंध आला. स्वातंत्र्यसैनिक नाना पाटील, अप्पासाहेब लाड, स. का. पाटील यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. स्वातंत्र्य लढ्यानंतर काकासाहेबांनी कामगार क्षेत्राकडे आपले लक्ष केंद्रित केले. बिडेश कुलकर्णी, स. का. पाटील, पी. डिमेलो, अण्णासाहेब पाटील अशा कामगार नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले. कुलकर्णी यांनी काकांना खूप प्रोत्साहन दिले. कुलकर्णी नंतर राजकारणात गेले. खासदार झाले. मात्र, काकासाहेब यांनी कामगार क्षेत्र सोडले तर नाहीच, परंतु याच क्षेत्रात आपले पाय अधिकाधिक घट्ट रोवले. आमदार झाले तरी कामगारांवरील लक्ष तसूभरही कमी झाले नाही. किंबहुना सरकारमध्ये कामगार हिताचे प्रश्न लावून धरत प्रश्नांची तड लावली.

नेतेमंडळींशी असलेले संबंध कामगार हितासाठी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात अनेक कंपन्या व सरकारी खात्यांमध्ये संपाचे पेव फुटले होते. त्यावेळी काकासाहेब यांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन ज्या ठिकाणी संप चालू होता. तेथील मालकांना सांगितले की, तळागाळातील गरीब कामगार आम्ही तुम्हाला देऊ, परंतु तो कामगार परमनंट झाला पाहिजे व आज संपावर असणाऱ्या कामगारालाही कामावर घेतले पाहिजे. त्यांचे म्हणणे मालकांनी मान्य केल्याने काकासाहेब यांनी सुमारे सात हजार कामगारांना युक्तीने काम मिळवून दिले. सन १९५६मध्ये काकासाहेबांनी गोदीतील काम सोडले. याच दरम्यान द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, नरेंद्र तिडके, बाळासाहेब भारदे आदी नेत्यांकडे काकासाहेब यांचे जाणे-येणे चालू होते. या सर्व नेत्यांच्या सहकार्याने त्यांनी जवळपास ५० हजार कामगारांना साहाय्य केले. सन १९९९ मध्ये बाळासाहेब भारदे एका साप्ताहिकाच्या प्रकाशनासाठी केडगाव (ता. दौंड) येथे आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘हा परिसर पंडिता रमाबाई, नारायण महाराज आणि काकासाहेब यांच्यामुळे मी ओळखतो.’ भारदे यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी असे उद्गार काकासाहेब यांच्या गैरहजेरीत काढावेत, हा काकासाहेब यांचा गौरवच म्हणावा लागेल.

पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नजरेत भरले कार्य
कामगार संघटनेतून कामगारांचे विविध प्रश्न सोडवित असताना त्यांनी कामगारांची सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी पाऊल उचलले. ठेकेदार कामगारांची पिळवणूक करतात. सहकाराच्या माध्यमातून आपण ही पिळवणूक थांबवू शकतो हे त्यांना मनोमन पटले होते. बाळू चांगू पाटील व काही कामगार कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी सन १९६१मध्ये वाडीबंदर कामगार सहकारी सोसायटी स्थापन केली. संस्थेच्या स्थापनेसाठी कामगारांनी प्रत्येकी एक रुपया वर्गणी जमा केली होती. या दरम्यान वेगळ्या क्षेत्रात सहकार चळवळ नेताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कामगार सोसायटीचे सभासद असलेल्या कामगारांना सुखाचे दिवस बघायला मिळाले. कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली. या कामगिरीमुळे त्यांच्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. सन १९६१ ते १९८५ दरम्यान कामगार सोसायटीने भारत बंद, महाराष्ट्र बंद, मुंबई बंद, अशा कुठल्याही बंदमध्ये सहभागी न होता एकही तास काम बंद ठेवले नाही. काकासाहेब व त्यांच्या सोसायटीचे हे राष्ट्रहित तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नजरेत भरले.

सहकारी तत्त्वावर काम
उद्योगातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टील ॲथोरिटी ऑफ इंडिया या संस्थेला एका स्टील यार्डाची गरज होती. हे स्टील यार्ड कोणा खासगी भांडवलदाराच्या मालकीचे असण्याऐवजी सहकारी तत्त्वावर कामगारांचे असावे, हा विचार काकासाहेबांनी मांडला आणि विचार कृतीत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. प्रश्न होता जागेचा. सन १९७५ मध्ये भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी नागरी कमाल जमीन मर्यादा कायदा घोषित केला आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने कामगार सोसायटीला स्टील यार्डासाठी १३ एकर जमीन भाडेपट्ट्याने मिळाली. इंदिरा गांधी यांच्या सहकार्यामुळे ही जागा मिळाल्याने काकासाहेबांनी कृतज्ञता म्हणून वाडीबंदर कर्नाक-बंदर कामगार सहकार सोसायटीचे नामांतर करून ‘इंदिरा राष्ट्रीय कामगार सहकारी सोसायटी मर्यादित’ असे करण्यात आले. याच जागेत काकासाहेब यांनी त्याकाळी दोन कोटी रुपयांचे कर्ज घेत कंटेनर फ्रेट स्टेशनची उभारणी केली.
काकासाहेब यांना सहकारात आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. काकासाहेब यांच्या कामाची हातोटी सहकारातील दिग्गज मंडळींच्या लक्षात आली होती. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबई सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. त्यानंतर काकासाहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्य को.-ऑप. बँकेचे संचालकपद मिळाले.

विधानसभा निवडणुकीतील जय पराजय
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या खास गोटात काकासाहेबांना स्थान होते. सन १९७८ मध्ये काँग्रेसने काकासाहेब यांना दौंड विधानसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी जनता पार्टीकडून राजाराम ताकवणे, काँग्रेसकडून काकासाहेब, तर अपक्ष म्हणून सीताराम उर्फ भाऊसाहेब भागवत निवडणुकीत उभे होते. मतविभागणीमुळे काकासाहेब यांचा पराभव झाला. पराभव झाला तरी त्यांनी मतदारसंघात आभार सभा घेतल्या होत्या. पाटील, शेटे व काकासाहेबांनी मुंबई शहरात काँग्रेसला मोठी ताकद मिळवून दिली. काँग्रेस पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन काकासाहेबांना १९८५ मध्ये नेहरूनगर (मुंबई) येथून विधानसभेची उमेदवारी दिली. कार्याचा पसारा खूप मोठा असल्याने कामगारवर्गातील तळागाळात काकासाहेबांचे नाव झाले असल्यामुळे ते निवडणुकीत सहज विजयी झाले. विधानसभेतही काकासाहेबांनी कामगारहितासाठी पदाचा वापर केला. कोणतेही काम करून घेण्यासाठी काकासाहेबांना कधीही पदाची व शिक्षणाची आवश्यकता वाटली नाही. काकासाहेब यांचे शिक्षण फार नसले तरी त्यांची विचारसरणी अतिशय उच्च होती. व्यवहारी जगतात जणू त्यांनी डॅाक्टरेटच मिळवली होती.

सहकारी तत्त्वावरील पहिले कंटेनर फ्रेट स्टेशन
काकासाहेबांनी सन १९९१मध्ये आणखी धाडसी पाऊल टाकले. जगातील सहकारी तत्त्वावरील पहिले ‘कंटेनर फ्रेट स्टेशन’ची उभारणी केली. भारतातील सर्वात भव्य असे सहकार क्षेत्रातील कामगार बंधूंनी सहकारी तत्त्वावर उभारलेले हे इंदिरा राष्ट्रीय कामगार सोसायटीचे इंदिरा सहकारी एक्सपोर्ट यार्ड ‘कंटेनर फ्रेट स्टेशन’ म्हणजे एक आगळेवेगळे आश्चर्य म्हणावे लागेल. काकासाहेब यांनी सहकार क्षेत्रात एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. कंटेनर फ्रेट स्टेशन म्हणजे देशातील निर्यात करणारी यंत्रणा. देशाला परकीय चलन मिळवून देण्याचे साधन. त्यांच्या कर्तबगारीमुळे पंतप्रधान इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेटी दिल्या. या एक्सपोर्ट यार्डाच्या माध्यमातून काकासाहेबांनी पाच वर्षात ७४०० कोटी रुपयांचे परकीय चलन भारतास मिळवून दिले. काकासाहेबांचे हे असामान्य कर्तृत्व लक्षात घेऊन जुलै १९९३ मध्ये स्व. वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे त्यांना ‘उत्कृष्ट कामगार नेता’ हा पुरस्कार देऊन गौरविले.

यशवंतराव चव्हाण यांची शाबासकीची थाप
सध्याच्या काळात वारसा, घराणेशाही या शब्दांना फार महत्व प्राप्त झाले आहे, परंतु काकासाहेबांकडे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असा कोणताही वारसा नव्हता. आजकालच्या तरूणपिढीला विशेष करून ग्रामीण भागातील तरूणांना न्यूनगंडाने पछाडले गेल्याचे आपण पाहतो. अशा तरूणांना काकासाहेबांचा जीवनपट आदर्शवत् आहे. सहकार क्षेत्रातील थोर कार्य पाहून महाराष्ट्राचे नेते कै. यशवंतराव चव्हाण एका जाहीर सभेत काकांची प्रशंसा करताना म्हणाले, ''‘भांडवलदार शहरात कामगार सहकारी सोसायटीचे काम चालविणे अत्यंत कठीण आहे, याची मला जाणीव आहे. पण मला वैयक्तिक काकासाहेब यांच्याबद्दल एकच सांगायचे आहे की, सिंहाच्या दाढेत हिरा आहे. हिरा काढायचा आहे आणि हात पण वाचवायचा आहे. हे फक्त काकासाहेब यांनाच जमले.’

कामगार कल्याणाला सलाम
सहकारी संस्थेमुळे कामगारांच्या जीवनात स्थर्य आले. मुंबईत बड्या मस्तवाल भांडवलदार ठेकेदाराच्या जोखडाखाली काम करणारे कामगार देईल त्या पगारावर दिवस रात्र (१२ ते १८ तास काम) खपत असत. मजुरीत वाढ मागितल्यास दुसऱ्या दिवशी काम बंद होत असे. कामाची शाश्र्वती नव्हती. पोर्ट ट्रस्टमध्ये काकासाहेब यांनी कामगारांना काम तसे दाम (पीस रेट) ही पद्धत सुरू केली. मासिक सव्वा रूपया वर्गणी करून कामगार संघटना बांधण्याचे काकासाहेब यांनी ठरविले. त्यासाठी माथाडी कामगारांच्या रात्रीच्यावेळी गुप्त बैठका होत असत. कामगार संघटनेची स्थापना झाली. कामगारांची दयनीय अवस्था शासनापुढे सातत्याने मांडली. शासनाने त्यांच्या विविध मागण्या मान्य केला. त्यामुळे योग्य पगार मिळू लागला. याशिवाय बोनस, १२ टक्के प्रॅाव्हिडंड फंड, सव्हिस ग्रुॅज्युईटी, रजेचा पगार, सानुग्रह अनुदान, भर पगारी रजा, अपघात विमा योजना, प्रवास व वैद्यकीय भत्ता, राष्ट्रीय सणांच्या सुट्या, दरवर्षी मजुरीत वाढ, दिवाळीत जादा मजुरी, मुलांना शैक्षणिक सवलती आदी सुविधा मिळू लागल्या. कामगारांना दहा तारखेच्या पुढे पगार मिळाल्याचे एकही उदाहरण नव्हते. काकासाहेब यांनी कामगारांना बचतीची सवय सुद्धा लावली. कामगारांच्या भल्यासाठी कोणापुढेही हात पसरायला काकासाहेबांना कधी कमीपणा वाटला नाही.

पोटापाण्याबरोबरच हक्काचा निवाराही दिला
काकासाहेब यांनी माथाडी कामगारांना नेहरूनगर कुर्ला येथे १६० घरे दिली. येथे केवळ ३७५ रुपये भरून राहण्यास घर दिले. कळंबोली येथे ९० घरे, ऐरोली येथे सिडकोकडून १०० घरे मिळवून दिली. गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत माथाडी कामगारांना घरे मिळावीत म्हणून काकासाहेब यांनी जवळजवळ एक तप सरकारचे उंबरे झिजवत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. अखेर त्यांना त्यात यश आले. पोटापाण्याबरोबरच हक्काच्या निवाऱ्याची सोय केली. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे हे एक स्वप्न असते. सामान्य कामगारासाठी मुंबईत स्वतःचे घर असणे याची कल्पना करणे म्हणजे दिवास्वप्न म्हणावे लागेल. पण काकासाहेब यांच्यामुळे असंख्य कामगारांचे हे दिवास्वप्न सत्यात उतरले. कामगारांच्या मुलांना मुंबईतच रोजगार उपलब्ध करून दिला. बँकांची कर्जे काढून देऊन त्यांना कंटेनर घ्यायला लावले. या मागे माझ्या माथाडी कामगाराचा मुलगा माथाडी न राहता तो शिकला पाहिजे. त्याने नोकरी, व्यवसायात उतरले पाहिजे ही भावना होती. अनेक कामगारांची मुले डॅाक्टर, इंजिनिअर, वकील आहेत. हे करत असताना त्यांनी कधीही कशाची अपेक्षा ठेवली नाही हे विशेष. कामगारांचे भरलेले संसार हीच आपल्या कामाची पावती आहे असे ते मानत.

पाच पंतप्रधानांच्या नजरेत भरणारा अवलिया
कामगार सोसायटीस काम मिळविण्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली होती. सर्व परिस्थितीची माहिती घेऊन पंडित नेहरू यांनी मालाच्या चढ-उताराचे काम सहकारी सोसायटीला मिळावे यासंबंधीचे आदेश संबंधितांना दिले अन् काकासाहेबांचे आणखी एक स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले. त्यांच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सन १९७४ मध्ये देशभर कामगार संप झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कामगारांना संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. विविध संघटनांनी त्यांचे आवाहन धुडकावून लावले. अपवाद फक्त काकासाहेब यांच्या संघटनेचा होता. माथाडी कामगारांमुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. या कार्यामुळे काकासाहेब थेट इंदिरा गांधी यांच्या नजरेत भरले. याशिवाय पंतप्रधान राजीव गांधी व पी. व्ही. नरसिंहराव यांच्याबरोबर संपर्क ठेवत त्यांनी कामगार हितासाठी सातत्याने काम केले. काकासाहेब यांनी अर्थमंत्री मनमोहनसिंग यांच्याशी संबंध ठेवत कामगार हिताची कामे करून घेतली.

१२ मुख्यमंत्र्यांचे काकासाहेबांना बळ
काकासाहेब यांचा स्वभाव मिश्कील व विनोदी होता. त्यामुळे त्यांचे सर्व पक्षातील नेतेमंडळींशी सलोख्याचे संबंध होते. राज्याच्या १२ मुख्यमंत्र्यांचे काकासाहेबांना पाठबळ मिळाले हे विशेष. या पाठबळाचा फायदा काकासाहेब यांनी कधीही स्वतःसाठी केला नाही. डोक्यात सतत कामगार हीत. निरपेक्ष व पारदर्शी काम ही काकासाहेबांची ओळख होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,वसंतरावजी नाईक व वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध. या संबंधांमुळे मंत्र्याकडून कामे करताना त्यांना कधी अडचण आली नाही. मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांना कधी चिठ्ठी किंवा अपॅाईंटमेंटची गरज पडली नाही. ते कोणत्याही मंत्र्यांच्या दालनात बेधडक घुसत असत. तत्कालीन मुख्यमंत्री सर्व श्री यशवंतराव चव्हाण, वसंतरावजी नाईक, वसंतदादा पाटील,शंकररावजी चव्हाण, शरदचंद्रजी पवारसाहेब, बॅ. अ. र. अंतुले, बॅ. बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर पाटील, सुधाकररावजी नाईक, मनोहरजी जोशी, नारायणरावजी राणे, विलासरावजी देशमुख या मुख्यमंत्र्यांशी काकासाहेब यांचे घनिष्ठ संबंध होते. या सर्वांनी काकासाहेबांनी दिलेल्या कामात सहकार्य केले.

काकासाहेब यांच्या पत्नी शांताबाई यांनी आपल्या कुटुंबातील पोषक व खेळीमेळीचे, संस्कारक्षम वातावरण कायम ठेवले. आनंद व सदानंद ही त्यांची मुले. आनंद हे वयाच्या २१ व्या वर्षी १९९२ मध्ये भीमा पाटस साखर कारखान्याचे संचालक झाले. २००१ मध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष झाले होते. सदानंद हे मुंबईतील कामगार सोसायटीचे काम पाहत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT