काळेवाडी ता.९ : काळेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढला असून, डिलिव्हरी बॉय वाढीव दराने विक्री करत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती वापरासाठी शासकीय दरात मिळणारे गॅस सिलिंडर काही ठिकाणी जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
अमेरिका व इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे कारण देत दर वाढवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रशासन इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे सांगत आहे. या गोंधळाच्या परिस्थितीचाच फायदा घेत व ऑनलाइन गॅस बुकिंग संदर्भात ही सिलिंडर मिळाल्यानंतर २४ दिवसांनी ऑनलाइन बुकिंग होत असल्यामुळे चढ्या दराने व काळ्या बाजाराच्या दराने सिलिंडर विकले जात आहे. त्याचप्रमाणे लग्नसराई तसेच वाढलेली गॅसची मागणी यामुळे काही वितरक व एजंटांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित दरापेक्षा जवळपास दुप्पट ते चौपट पैसे घेऊन सिलिंडर पुरवले जात आहेत. काही ठिकाणी ‘‘गॅस उपलब्ध नाही’’ असे सांगून नंतर जादा पैसे देणाऱ्यांनाच सिलिंडर दिले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
दुसऱ्या बाजूला घरगुती सिलिंडरचा वापर हॉटेल, फास्ट फूड सेंटर आणि व्यावसायिक ठिकाणी सर्रास होत असल्याने सामान्य ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तसेच तेल कंपन्यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासन या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देणार का? आणि नागरिकांना गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवून दिलासा मिळणार का? हा प्रश्न सामान्य नागरिकांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलिंडर मिळत नाही. डिलिव्हरी बॉय अतिरिक्त पैसे मागतात. गरीब नागरिकांनी जायचे कुठे?
- कविता ढगे, गृहिणी
घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर उघडपणे सुरू आहे. प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवावी. तसेच नियमित गॅस पुरवठा केल्यास काळाबाजार थांबेल.
- सचिन शिंदे, रहाटणी
नागरिकांच्या समस्या
घरगुती गॅस सिलिंडर जादा दराने विक्री होत असल्याचा आरोप
डिलिव्हरीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याची तक्रार
व्यावसायिक वापरामुळे सामान्य ग्राहकांना तुटवडा
काही एजन्सीकडून वेळेत पुरवठा होत नसल्याची नाराजी
प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नाही
गॅस वितरण एजन्सी व डिलिव्हरी करणाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
सामान्य पद्धतीने उपलब्ध न होणारा गॅस सिलिंडर न बुक करता कसा मिळतो?
सिलिंडर दर (रुपये)
घरगुती वापराचा : ९१६
व्यावसायिक वापराचा : ३,०८४
काळ्याबाजारातील भाव (रुपये)
घरगुती वापराचा : २,५०० ते ३,५००
व्यावसायिक वापराचा ५,००० ते ६,०००
आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा बऱ्यापैकी सुरळीत होत असून नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास पुरवठा विभागाकडे द्याव्यात. त्यावर कारवाई केली जाईल.
- विजयकुमार क्षीरसागर, पुरवठा अधिकारी, पिंपरी चिंचवड
PNE26W17609
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.