फुलेनगरमध्ये काळूबाईच्या नावाचा जयघोष
बगाड मिरवणूक उत्साहात; वाद्यांच्या निनादात यात्रेचा उत्सव
वाई, ता. ५ : फुलेनगर येथील काळूबाई यात्रेच्या निमित्ताने निघालेली बगाड मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने व वाद्यांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
सकाळी वाकेश्वर येथील नाथ म्हस्कोबा मंदिराकडे बगाड रथ नेण्यात आला. तेथून दहा वाजता बगाड मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यापूर्वी बगाड्यास कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. बगाड म्हणजे दगडी चाके व विशिष्ट रचना असलेला गाडा असतो. त्यावर १२ फूट उंचीच्या खांबावर सुमारे ३० फूट उंचीचे शीड उभारण्यात आलेले असते. हे शीड गोलाकार फिरण्याची व्यवस्था केलेली असते. शिडाच्या टोकाला झोपाळ्याच्या मदतीने बगाड्यास टांगण्यात येते. बैलाच्या तसेच तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने हा गाडा ओढण्यात आला. बगाड्याच्या मागे देवीची पालखी ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आली होती. भाविक श्रद्धेने देवीचे दर्शन घेत होते.
गुलालाची उधळण करीत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बगाड वाई- सुरूर रस्त्यावर आले. यावेळी काही वेळासाठी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती. शेतातून व कच्च्या पायवाटेने तीन किलोमीटर अंतर पार करीत सायंकाळी साडेसहा वाजता बगाड सुखरूपपणे काळेश्वरी मंदिराजवळ पोहोचले. यावेळी मिठाई, खाद्यपदार्थ, थंडपेय व आइस्क्रीम, खेळणी, फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती. पंचायत समिती आरोग्य विभागाने दोन रुग्णवाहिका तैनात ठेवल्या होत्या. बगाड पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामस्थ, त्यांचे पै-पाहुणे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावर्षी बगाड घेण्याचा मान सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक कैलास जमदाडे यांना मिळाला होता. फुलेनगरमधील तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. बगाड मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अजित सुर्वे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला.
-----
07664
फुलेनगर : काळूबाई यात्रेनिमित्त काढण्यात आलेली बगाड मिरवणूक. (भद्रेश भाटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.