पुणे

कृषिक्षेत्रातील दुर्गा - पुजारी

CD

कृषिक्षेत्रातील दुर्गा
-----------------

देशी भातवाणांची ‘धान्यमाता’
-------
कमला पुजारी यांचा जन्म सुमारे १९४७-४९ च्या दरम्यान ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बोईपारीगुडा भागात झाला. त्या ‘पारजा’ या आदिवासी समाजातील होत्या, ज्या समाजाचे शेतीशी अत्यंत घट्ट नाते आहे. लग्नानंतर त्या पतीच्या पत्रापुट गावी राहायला गेल्या. हे गाव ओडिशातील जयपूरपासून सुमारे पंधरा किलोमीटरवर, बोईपारीगुडाजवळ आहे. पुढे त्या विधवा झाल्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आयुष्य शेतीलाच वाहिले. कमला पुजारी यांना कोणतेही औपचारिक शिक्षण मिळाले नाही; त्या पूर्णतः निरक्षर होत्या. मात्र आदिवासी समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेले शेतीचे पारंपरिक ज्ञान, निरीक्षणशक्ती आणि अनुभव यांच्या जोरावर त्यांनी भाताच्या विविध जातींची वैशिष्ट्ये, लागवडीची पद्धत आणि बीजसंवर्धनाचे तंत्र आत्मसात केले.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी कमला यांच्या लक्षात आले, की त्यांच्या भागात पूर्वी सहज आढळणाऱ्या पंधरा-वीस देशी भाताच्या जाती हळूहळू नाहीशा होत आहेत. पूर्वी प्रत्येक कुटुंब दोन-तीन वेगवेगळ्या जाती लावत असे. हंगामाच्या शेवटी शेतकरी आपापसात बियाणे आणि धान्याची अदलाबदल करत, त्यामुळे गावात विविधता टिकून राहायची. संकरित बियाणे आणि रासायनिक शेतीचा वापर वाढल्याने ही परंपरा मोडकळीस येत असल्याचे पाहून कमला अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी देशी वाणांचे जतन करण्याचा निर्धार केला. याच सुमारास एम. एस. स्वामिनाथन संशोधन प्रतिष्ठानची जयपूर शाखा कोरापुट भागात देशी बियाण्यांच्या संशोधन आणि संवर्धनासाठी काम करत होती. कमला यांनी या संस्थेकडून बीजसंवर्धनाचे मूलभूत प्रशिक्षण घेतले. २००१ साली पत्रापुट गावात संस्थेच्या मदतीने बीज बँक उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

कृषिक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य ः
कमला पुजारी यांनी आपल्या हयातीत भात, नाचणी आणि इतर पिकांचे शंभराहून अधिक देशी वाण जतन केले. यासोबतच हळद, तीळ, काळे जिरे, महाकांता, फुला, घंटिया यांसारख्या दुर्मीळ आणि लुप्तप्राय पिकांच्या बियाण्यांचेही त्यांनी संकलन केले. केवळ बियाणे साठवून त्या थांबल्या नाहीत. रासायनिक खतांचा वापर सोडून सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी त्यांनी गावोगावी महिलांचे गट बनवून जनजागृती केली. त्यामुळे पत्रापुट व आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर सोडून दिला.
पत्रापुट, नुआगुडा आणि झोलागुडा या तीन गावांत उभारलेल्या सामुदायिक बीज बँकांमध्ये आज ९४ भाताच्या आणि १६ नाचणीच्या जाती सुरक्षित आहेत. दरवर्षी या सर्व जाती एका संवर्धन शेतात पुन्हा लावल्या जातात, जेणेकरून त्यांची उगवणक्षमता टिकून राहावी.

पुरस्कार आणि सन्मान ः
२००२ साली दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जागतिक परिषदेत त्यांच्या कार्याचा विशेष गौरव झाला. ओडिशा राज्य नियोजन मंडळावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या.
त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली. २००२ मध्ये त्यांना ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह पुरस्कार’, २००३ मध्ये ‘कृषी विशारद सन्मान’ आणि २००४ मध्ये ओडिशा सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी’ सन्मान मिळाला. पुढे २०१८ मध्ये ओडिशा राज्य नियोजन मंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. या मंडळावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या. देशी बियाण्यांचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने कमला पुजारी यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले.

‘कमला माँ’ चा प्रेरणादायी वारसा ः
वयाच्या ७४व्या वर्षी २० जुलै २०२४ रोजी कटक येथे कमला पुजारी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देशी बियाणे संवर्धन आणि सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा आवाज हरपला. मात्र त्यांनी जपलेली बियाण्यांची विविधता, पारंपरिक शेतीचे ज्ञान आणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण केलेली जागरूकता आजही त्यांचा वारसा पुढे नेत आहे. त्यामुळेच त्या केवळ ओडिशातील शेतकरी महिला न राहता देशी बियाण्यांच्या संवर्धनाची ‘धान्यमाता’ आणि कृषिक्षेत्रातील प्रेरणादायी ‘दुर्गा’ म्हणून स्मरणात राहतात.

-------------------------------
डॉ. रिता शेटीया, ९२७१२१३५४१ (वेळ : दुपारी १२ ते ४)
(लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''जमेल तसे जंतरमंतरवर या, पोलिसांनी अडवल तर...''; आंदोलनाची सूत्रे हाती घेताच अजिंक्य शिंदेची प्रतिक्रिया

Nana Patekar Death: गौरीमुळे मला अटक झाली, नानांनी सोडवून आणलं; शाहरुख खानने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

सरपंच व्हायचंय! निवडणुकीसाठी पैसे नाहीत, लिव्ह इन पार्टनरच्या घरी केली चोरी; २५ वर्षीय तरुणाला अटक

Marathi News Live Updates : अभिजीत दीपकेंना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याची परवानगी

Aashna Choudhary IPS Success Story : कोणतीही कोचिंग नाही, तरीही मारली बाजी! यूपीएससीच्या प्रवासात चुका सुधारत कशी बनली तरुणी आयपीएस अधिकारी?

SCROLL FOR NEXT