कण्हेर धरणाचे पाणी जावळीसाठी राखीव ठेवण्याची मागणी
कास, ता. ६ ः जावळी तालुक्यात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे भातासह अन्य पिकांवर परिणाम झाला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शासनाच्या दुष्काळी ट्रिगर-१च्या यादीत जावळी तालुका समाविष्ट न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोयना आणि कण्हेर धरणांच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी दिल्या. अनेक कुटुंबांना आपली घरे-दारे, शेती आणि गावे सोडून स्थलांतरित व्हावे लागले. यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता कण्हेर धरणातील पाणी इतर तालुके व जिल्ह्यांना सोडण्याऐवजी जावळी तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशी मागणी ‘आम्ही जावळीकर चळवळी’च्या वतीने विलासबाबा जवळ यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की जावळीतील शेतकरी आजही मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. पावसाने दडी मारल्याने त्यांच्या हातातील खरीप हंगाम धोक्यात आलाच आहे; पण रब्बीवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कण्हेर धरणातील पाणी जावळी तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी राखीव ठेवावे.‘त्याग जावळीचा, लाभ इतरांचा’ ही परिस्थिती बदलावी. कोयना-कण्हेर प्रकल्पांसाठी जावळीतील जनतेने केलेला त्याग लक्षात घेऊन शासनाने आता जावळीच्या शेतकऱ्यांच्या हिताचा गांभीर्याने विचार करावा. दुष्काळी परिस्थितीत जावळीला पाण्यापासून वंचित ठेवू नये. कण्हेर धरणातील पाणी जावळीतील जनतेसाठी प्राधान्याने राखून ठेवावे, अशी भूमिका विलासबाबा जवळ यांनी व्यक्त केली. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन कण्हेर धरणातील पाण्याचे नियोजन जावळीच्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून करावे, अशी मागणीही केली आहे.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.