PNE26W28984
सोलापूर : कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या दहाव्या महामेळाव्याच्या समारोप समारंभात काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत कन्नड भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मातृभाषेचा अभिमान बाळगा, भाषिक सौहार्द जपा
काशी जगद्गुरूंचे आवाहन; होरनाडू कन्नड संघ प्रतिनिधींच्या दहाव्या महामेळाव्याचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन भूमीत मराठी, कन्नड, तेलुगूसह विविध भाषांचा सुंदर संगम आहे. सर्वांनी भाषिक सौहार्द जपत आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले. तसेच पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे धारवाडच्या कर्नाटक विद्यावर्धक संघ आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध कन्नड संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय राज्याबाहेरील (होरनाडू) कन्नड संघ प्रतिनिधींच्या दहाव्या महामेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
सीमाभागात कन्नड भाषा व संस्कृती जपण्यासाठी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि बृहन्मठ, होटगी यांसारख्या संस्थांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. कन्नड शाळा चालविणे सध्या आव्हानात्मक बनले असले, तरी भाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भाषिक द्वेष विसरून भारतमातेचे पुत्र म्हणून ज्या प्रदेशात राहतो, त्या भूमीशी आणि मातृभाषेशी नाते जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक रमजान दर्गा यांनी सीमाभागातील कन्नड भाषिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी एन. ए. वाले, गैबिशा मकानदार, बी. बी. हेब्बाळ, के. एन. हुगार आणि अकबर मुल्ला यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महामेळाव्यात विविध ठराव मंजूर करण्यात आले. समारोपानंतर कन्नड भक्तिगीते, वचन नृत्य, अक्कमहादेवी नाटक, योगनृत्य तसेच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमास माजी आमदार विश्वनाथ चाकोते, एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाल जोशी, कर्नाटक विद्यावर्धक संघाचे उपाध्यक्ष संजीव कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
--------------------
चौकट
कन्नड-मराठी संबंधांवर परिसंवाद
महामेळाव्यानिमित्त आयोजित परिसंवादात ‘कन्नड आणि मराठी भाषेतील देवाणघेवाण’ या विषयावर प्राचार्य डॉ. गुरूलिंगप्पा धबाले यांनी मार्गदर्शन केले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती आणि समाजाचा आरसा असल्याचे त्यांनी सांगितले. कन्नड आणि मराठी भाषांमधील परस्पर संबंधांची विविध उदाहरणे त्यांनी मांडली. डॉ. बी. बी. पुजारी यांनी सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे योगदान अधोरेखित केले. कवी संमेलनात विविध राज्यांतील २० कवींनी आपल्या रचना सादर करून भाषिक ऐक्याचा संदेश दिला.
--------------------------
महामेळाव्यातील प्रमुख ठराव
सीमाभाग व परराज्यातील कन्नड शाळांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.
‘होरनाडू’ संज्ञेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण व रोजगाराच्या संधींवर मर्यादा येऊ नयेत.
कर्नाटक शासनाच्या अकादमी, पुरस्कार व सन्मान प्रक्रियेत परराज्यातील कन्नड भाषिकांना प्रतिनिधित्व द्यावे.
परराज्यातील कन्नड विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकमध्ये शिक्षण, रोजगार व इतर संधी वाढवाव्यात.
कन्नड-मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांना दरवर्षी ‘जयदेवीताई लिगाडे पुरस्कार’ प्रदान करावा.
सीमाभाग व परराज्यातील कन्नड भाषिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्नाटक सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.