पुणे

कांट आणि ज्ञानेश्‍वर

CD

विश्‍वाचे आर्त
००००००
कांट आणि ज्ञानेश्वर
- डॉ. सदानंद मोरे
००००००
लीड-
भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेत ग्रंथात अभिप्रेत असलेला विचार ज्या शैलीने व्यक्त करता येतो, त्यानुसार एक वर्गीकरण करता येते. त्यातील दोन प्रकार म्हणजे शास्त्रनय आणि काव्यनय. येथे कांट ज्याला logical perfection म्हणतो त्यासाठी शास्त्रनय आणि जे कलात्मक aesthetic perfection म्हणतो त्यासाठी काव्यनय हे शब्दप्रयोग अर्थहानी होऊ न देता करता येतील. स्वतः कांटला या aesthetic geniusची जोड मिळाली असती. त्याच्या प्रतिभेला रसस्पर्श झाला असता म्हणजेच तो प्रतिभावंत कवी असता तर?
००००००

तत्त्वज्ञानाच्या मुख्य प्रवाहातील बहुतेक अभ्यासकांकडून कांटच्या मानवमीमांसाकडे म्हणजेच ‘Anthropology’कडे दुर्लक्ष झाले असल्याने त्या संदर्भात राबेलोची उद्विग्न प्रतिक्रिया समजून घेता येण्यासारखी आहे. मात्र याचा अर्थ असा नाही, की तिकडे कोणीच लक्ष दिले नाही. कांटच्याच क्रिटिकल परंपरेतील मानल्या जाणाऱ्या दोघांची नावे उल्लेखित व्हायलाच हवीत. कांटला अनुसरून Critique of Historical reasonची मांडणी करणारा विल्यम डिल्थी आणि अमेरिकी कांटवादी अर्न्स्ट कॅझिरर ही ती नावे होत. अगदी अलीकडचे नाव सांगायचे झाल्यास, अर्थातच उत्तराधुनिक विचारवंत मानला जाणारा मिशेल फूको. फूकोने पीएच.डी.साठीचे लेखन १०६१मध्येच पूर्ण केले असले, तरी तो प्रबंध प्रत्यक्षात प्रकाशित होण्यासाठी २००८पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान १९६४मध्ये त्यानेच केलेले कांटच्या Anthropology from a pragmatic point of view या पुस्तकाचे फ्रेंच भाषांतर प्रकाशित झाले होते.

कांटची प्राथमिकता जरी सार्वत्रिकता (Universality) आणि अनिवार्यता (अर्थात तार्किक) ही असली, तरी यांचा वाहक जो मानवप्राणी तो बुद्धीव्यतिरिक्त (reason) अन्य आंतरिक घटकांनी घडलेला असतो. शिवाय तो बाह्य भौतिक विश्वात वावरणारा असतो. या दोन्हीही गोष्टी समजून घेतल्याशिवाय माणूस पूर्ण समजला असे होत नाही. शिवाय त्याने काय करावे आणि त्याच्या करण्याच्या म्हणजेच कृतीच्या मर्यादा समजून घेणेही तितकेच आवश्यक असते. आपल्याकडील परिभाषा वापरून सांगायचे झाल्यास, मनुष्य आध्यात्मिक आणि आधिभौतिक आहे. अध्यात्म म्हणजे त्याचे शरीर-मनासह अस्तित्व; स्वभाव आधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतांपैकी युक्त असलेला त्याचा देह; पण त्याचे बाह्य जग हेसुद्धा याच भौतिक घटकांनी सिद्ध झालेले आहे. म्हणजेच त्याच्या देहमनोबुद्धी यांनी सिद्ध झालेल्या अस्तित्वातील स्व-भावातील एक घटक आधिभौतिक (देह) असतो. साहजिकच तो एकाच वेळी दोन प्रकारच्या विश्वांत वावरतो. भौतिक (ज्याला आपण निसर्ग म्हणतो) की जे नियमबद्ध असते व ज्याच्या नियमिततेच्या मुळाशी असलेले वैज्ञानिक नियम न्यूटनने कांटपूर्वी उजेडात आणले होते. जोपर्यंत मानव या भौतिक विश्वाचा हिस्सा आहे, तोपर्यंत त्यालाही निसर्गातील इतर वस्तूंप्रमाणे त्यांच्या आधीन राहावे लागते. या विश्वात वर्चस्व अर्थातच नियमिततेचे (Regularity) असते.

मानवाचे दुसरे विश्व, ज्याला आपण आंतरिक विश्व म्हणू या व सोयीसाठी त्याचे मन व बुद्धी असे उपघटक समजू या. (ही मांडणी पूर्णतः कांटला अनुसरून नसेलही; पण मुद्दा समजवण्यासाठी उपयुक्त ठरेल.) यातील बुद्धी उपघटक पूर्णतः स्वतंत्र, स्वावलंबी व स्वायत्त मानता येणे तर मनाचा संबंध ज्या (भौतिक) इंद्रियांमार्फत बाह्य भौतिक विश्वाशी पोहोचतो ते बुद्धीसारखे स्वतंत्र वा स्वायत्त राहू शकत नाही. बुद्धीमधून उदित होणाऱ्या सार्वत्रिक व अनिवार्य अशा काटेकोर मार्गदर्शक नियमांचे व तत्त्वांचे पूर्ण पालन करणे त्याला त्याच्या भौतिक स्पर्शामुळे सहजासहजी शक्य होईल अशी अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. मात्र मानवाचे अंतिम उद्दिष्ट हे शक्य करणे असेच हवे व त्या दिशेनेच त्याचा प्रवास व्हायला हवा. आता कांटचा शब्द वापरून सांगायचे झाल्यास हा मानवजातीच्या ‘Enlightenment’चा प्रवास होय. स्वतः कांट ज्या काळात (अर्थात युरोपमध्ये) जगत होता, त्याला ‘An Age of Enlightenment’ असे म्हटले जाते; पण तरीही ते ‘Enlightenment Age’ नव्हे. ते अजून अस्तित्वात यायचे आहे. सुरू असलेले युग ते अस्तित्वात आणण्याच्या प्रवासाचे आहे असे मात्र म्हणता येईल.

एक मुद्दा शब्दयोजनेच्या समर्पक प्रतिशब्दाचा आहे. कांटच्या जर्मन भाषेतील विचारांशी परिचय इंग्रजीतून झाला. इंग्रजीतील ‘enlightenment’ हा शब्द जर्मन भाषेतील ‘Aufkiarung’ या शब्दाचा समानार्थी प्रतिशब्द आहे. या शब्दाची एक महत्त्वाची छटा उजेडात आणणे, दाखवणे, उजळणे ही आहे. अठराव्या शतकातील जर्मनीत विशेषतः लायब्लिझ, वुल्फ यांच्याकडून या प्रक्रियेची, युगाची सुरुवात झाली असे मानले गेले तरी त्याचा प्रातिनिधिक प्रवक्ता कांटलाच मानले जाते. मुळात या प्रक्रियेला राज्य व्यवहारासारखे मानवी व्यवहार वर्ज्य नव्हतेच. त्यामुळे ते कांटलाही वर्ज्य असायचे कारण नाही. मागील लेखात (तत्त्वज्ञानातील सोवळे, ता. २२ ऑगस्ट) कांटने उपस्थित केलेल्या चार प्रश्नांची व त्याअनुषंगाने होणाऱ्या मानवी (ज्ञानासह) व्यवहारांची चर्चा कांटच्या The Conflict of Faculties या पुस्तकाच्या आधारे केली, तरी चालण्यासारखे आहे.

जे प्रश्न कांट उपस्थित करतो व अर्थात ज्यांची उत्तरे शोधतो, ते साधारणपणे तत्त्वज्ञान विषयात अंतर्भूत केले जाणारे प्रश्न मानले जातात. (खरेतर तत्त्वज्ञानाची व्याप्तीच एवढी होती, की न्यूटनच्या विचारव्यूहाला Natural Philosophy म्हटले जायचे; Science क्वचितच...) तत्त्वज्ञान या ज्ञानशाखेचा इतिहास थेट प्राचीन ग्रीक काळापर्यंत भिडवावा लागतो, पण त्या तरीही तेव्हा केव्हा enlightenment हे घटित निष्पन्न झाले होते असे कोणी म्हणत नाही. स्वतः कांटही म्हणत नाही. खरेतर त्याने उपरोक्त The Conflict of Facultiesमध्ये तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त इतिहासच मांडला आहे. त्यातून आणि अर्थातच स्वतंत्रपणेही त्याची तत्त्वज्ञानाची संकल्पनाही स्पष्ट होते.

कांट तत्त्वज्ञानाच्या दोन संकल्पना सांगतो -
1) ‘Philosophy is the system of Philosophical cognitions or of cognitions of reason from concepts.’ अर्थात ही संकल्पना ‘Scholastic concept’ असल्याचेही तो तेथेच नमूद करतो. आता येथे ‘scholastic’ शब्दाचा अगदीच निंदाव्यंजक असा शुष्क पांडित्य, पढिक विद्वत्ता हा अर्थ घ्यायचे कारण नसले तरी कांटला ‘तत्त्वज्ञान’ संकल्पनेतून यापेक्षा काही वेगळे अभिप्रेत असल्याचे निश्चितपणे म्हणता येते. कारण लगेचच -
2) ‘According to the worldly concept it is the science of the final ends of human reason. This high concept gives philosophy dignity i.e. an absolute worth.’
आणखी स्पष्ट करायचे झाल्यास ‘In this scholastic sense of the word philosophy has to do only with skill, but in relation to the worldly concepts on the other hand with usefulness. In the former respect it is thus a doctrine of skill in the latter, doctrine of wisdom. The legislator of reason and philopher to this extents is not an artist of reason, but rather legislation.`
अत्यंत महत्त्वाचा भेद कांटने सांगितला आहे. मानवी बुद्धीचे म्हणजे बुद्धीमधून निष्पन्न झालेले काही एक अंतिम उद्दिष्ट, प्रयोजन असते.
तत्त्वज्ञान म्हणजे एखाद्या कारागिराचे कौशल्य नसून, त्या प्रयोजनाकडे नेणारे शहाणपण (wisdom) असते. ‘The practical philosopher the teacher of wisdom through doctrine and example is the real philosopher. For philosophy is the idea of a perfect wisdom which shows us the final ends of human reason.’
या दृष्टिकोनातून विचार केला तर तत्त्वज्ञानाचा संबंध संकल्पनांच्या ज्ञानाशी अर्थातच पोहोचतो. पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे - ‘Philosophy is in fact the science of the relation of all cognition and of all use of reason to the ultimate end of human reason to which as the highest all ends are subortinated and in which they must unite to form a unity.`
नकारात्मक पद्धतीने सांगायचे झाल्यास, ‘Without cognitions one will never become a philosopher but cognitions alone will never constitute the philosopher either unless there is in addition a purposive combination of all cognitions and skills in a unity and an insight into their agreement with the highest ends of human reason.’

तत्त्वज्ञानाच्या पहिल्या प्रकारात या पद्धतीला कांट सॉक्रेटिसला अनुसरत ‘सोफिस्ट्री’ म्हणतात व अशा तत्त्ववेत्त्यांना सोफिस्ट, सोफिस्टांचे तत्त्वज्ञान हे ‘thoroughly incompatible with the dignity of the philosopher.’
तत्त्वज्ञानाच्या या संकल्पनेचे स्पष्टीकरण केल्यावर कांट The conflict of Facultiesमध्ये तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे एक संक्षिप्त चित्र सादर करतो. त्यातील विशेषतः भारतीय आणि चिनी तत्त्वज्ञानाचे विवेचन अतिसंक्षिप्त व शेरेबाजीवजा असल्याने त्याची येथे दखल घ्यायची गरज नाही. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मांडणी मात्र लक्षणीय आहे.

पारंपरिक समजुतीनुसार (पाश्चात्त्य) तत्त्वज्ञानाची सुरुवात ग्रीक तत्त्वज्ञानापासून होते. हे कांटला अर्थातच मान्य आहे. रूढ समजुतीनुसार त्याचे सॉक्रेटिसपूर्व व सॉक्रेटिसोत्तर असे कालखंड होतात हेही त्याला मान्यच आहे. सॉक्रेटिसनंतर प्लेटो, ॲरिस्टॉटल, एलिक्युरिझन पंथ, स्टोइक पंथ, पिऱ्होचा संशयवाद याचे विवेचन येते.

यानंतर तत्त्वज्ञानाचा इतिहास सांभाळायची जबाबदारी रोमन लोकांकडे आली, तथापि त्यांची ग्रीकांइतकी पात्रता नसल्याने त्यांच्या हातून तत्त्वज्ञानाचा विकास होऊ शकला नाही. ते ग्रीक तत्त्ववेत्त्यांचे अनुयायीच राहिले. रोमन राज्याचा नाश हूणांसारख्या रानटी टोळ्यांनी केला. नंतर सत्ताधारी होऊ शकलेल्या अरबांनी तत्त्वज्ञानाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विशेषतः ॲरिस्टॉटलच्या विचारांचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर आले ते (ख्रिस्ती) स्कोलॅस्टिक तत्त्ववेत्ते. त्यांनीही ॲरिस्टॉटल प्रमाण मानले आणि त्याच्या विचारांमधील सूक्ष्मतांना कळसापर्यंत वर नेले.

आधुनिक काळात मात्र निसर्गविज्ञान आणि गणित यांच्या एकत्रीकरणामुळे तत्त्वज्ञानाचा पुढील विकास होऊ शकला असे कांटचे निरीक्षण आहे. त्यासाठी जबाबदार असलेल्या रॉजर बेकनचा उल्लेख करून कांट थेट डेकार्टपर्यंत येतो. लायब्लिझ, लॉक, वुल्फ हा त्यापुढचा प्रवास होय. त्यातील लायब्लिझ आणि वुल्फ हे कांटचे निकटपूर्ववर्ती. त्यांच्यावर आक्षेप घेत कांट त्याच्या स्वतःची तत्त्वज्ञानाची संकल्पना मैदानात आणतो. उपरोक्त दोघांची तत्त्वविचाराची पद्धती चुकीची असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ‘There is also much in it that it is deceptive that it is in fact necessary to suspend the whole procedure and instead to set in motion another method of critical philosophizing.’
ज्या जुन्या पद्धतीचा तत्त्वज्ञानाने त्याग करून नव्या पद्धतीचा अंगीकार करावा असे कांट सांगतो, ती म्हणजे त्याची स्वतःची ‘The method of critical philosophizing.’ या नव्या पद्धतीचे स्वरूप काय, तर ‘(Which) consists in investingating the procedure of reason itself in analyzing the whole faculty of cognition and examining how far its limits may go.’
पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणाचा समारोप करताना कांट लिहितो, ‘Our age is the age of critique.’ कांटच्या युगासंबंधीच्या दुसऱ्या एका विधानाची जोड देऊन असे म्हणता येईल का, की त्याच्यात मतानुसार ‘age of critique’ म्हणजेच ‘age of enlightenment?’

‘What is enlightenment?’ या शीर्षकाचा कांटचा एक प्रसिद्ध लेखच आहे. त्यातील काही मुद्द्यांचा विचार या संदर्भात करावा लागेल हे उघड आहे; परंतु परत एकदा मागे वळून त्याचे चिंतन आणि कवी पोप यांच्या संदर्भात तत्त्वज्ञानामधील शास्त्रीय तार्किक विचार आणि काव्य यांच्यातील संबंधाबद्दलचा मुद्दा The Conflict of Facultiesमध्ये अवतीर्ण झाला आहे, त्याचा निर्देश करायला हरकत नसावी.

तत्त्वज्ञानाची शैली नीरस गद्यप्राय असायला हवी आणि म्हणून काव्याला दूर ठेवू पाहणाऱ्यांचा उल्लेख केला गेलेला आहेच. या समजुतीचा फटका स्वतः पोपला बसला हेही निदर्शनास आणले गेले आहे. मात्र स्वतः कांटचा विचार कोता नसल्याने त्याला काव्यागत तात्त्विक मुद्द्यांचा स्वीकार करण्यात काही अडचण नव्हती. मुख्य म्हणजे संकल्पना सार्वत्रिक व अनिवार्य आहेत एवढे सांगून त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नसतात, त्यासाठी योग्य ती शैली विकसित करावी लागते; ती पोपकडे आहे अशी कांटची समजूत असल्यामुळेच त्याने मित्रवर्य ग्रीनला धारेवर धरले असणार. ते असो. याविषयीचे कांटचे अंतिम मत काय होते हे The Conflict of Facultiesमधील उद्धरणावरून ठरवता येते -
‘It is in the greatest possible unification of logical with aesthetic perfection in general in respect to those cognitions that are both to instruct and to entertain, that the character and the art of genius actually shows itself.’

भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेत ग्रंथात अभिप्रेत असलेला विचार ज्या शैलीने व्यक्त करता येतो, त्यानुसार एक वर्गीकरण करता येते. त्यातील दोन प्रकार म्हणजे शास्त्रनय आणि काव्यनय. येथे कांट ज्याला logical perfection म्हणतो त्यासाठी शास्त्रनय आणि जे कलात्मक aesthetic perfection म्हणतो त्यासाठी काव्यनय हे शब्दप्रयोग अर्थहानी होऊ न देता करता येतील. स्वतः कांटला या aesthetic geniusची जोड मिळाली असती. त्याच्या प्रतिभेला रसस्पर्श झाला असता म्हणजेच तो प्रतिभावंत कवी असता तर? कदाचित ग्रीनसारख्याने त्याच्या विचारांकडे दुर्लक्षही केले असते व मुख्य प्रवाहातील अनेक तत्त्वज्ञान अभ्यासकही त्या वाटेकडे गेले नसते!

कांटला अपेक्षित असलेले प्रतिभावंत व्‍यक्तिमत्त्व सुदैवाने आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला आणि त्याने मराठीत रचना केली ‘to instruct and to ententain’, त्या प्रतिभावंतांचे नाव ज्ञानेश्वर आणि त्यांच्या रचनेचे नाव ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांच्या या रचनेला (कवित्व) रसस्पर्श (कवित्वी बरवे रसिकत्व) झाला आहे हे सर्वश्रुत आहे. पण त्याला आणखीही एका स्पर्शाची जोड आहे, तो म्हणजे परतत्त्वाचा स्पर्श (रसिकत्वी परतत्त्व/ स्पर्श). कांटच्या रचनांना रसस्पर्श झाला नाही हे कांटसह कोणीही मान्य करेल. पण परतत्त्वाचा स्पर्श? त्याचे काय? मला वाटते होय. तो आहे.
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात प्रा. गोविंद चिमणाजी भाटे यांनी कांट व शंकराचार्य हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर उत्तरार्धात प्राचार्य शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर यांनी ‘ज्ञानदेव आणि प्लेटो’ या विषयावर कौशिक व्याख्यानमालेत काही व्याख्याने दिली. त्यांचेही पुस्तकात रूपांतर झाले. शंकराचार्यांच्या संदर्भात ते (आणि प्लेटोच्या संदर्भातही) कवी नसल्याने रसस्पर्शाचा मुद्दा उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्‍भवत नव्हता. येथे मात्र कांट कवी नसला तरी उद्‍भवतो, कारण तो कांटनेच उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Ramdas Athawale: अभिजित दीपके यांना रामदास आठवलेंचे RPIत येण्याचे निमंत्रण; ‘सुशिक्षित युवा नेतृत्वाची गरज’

SCROLL FOR NEXT