विश्वाचे आर्त
००००००
तत्त्वज्ञानातील सोवळे
- सदानंद मोरे
००००००
लीड-
कांटच्या अभ्यासकांकडून हा प्रमाद घडत आलेला आहे. एकीकडे अनुभवपूर्व/ अनुभवातीत अशी सार्वत्रिक तत्त्वे आणि दुसरीकडे त्यांचे अनुभवविश्वातील कर्मात रूपांतर या दोन्ही स्तरांचे स्वतंत्रपणे विवेचन करून त्यांची सांधेजोड करायची हे काही सोपे काम नाही. कांटला नेमके तेच करायचे आहे. या कार्याची आवश्यकता व रूपरेषा त्याच्या प्रसिद्ध Groundwork for the Metaphysics of Morals या पुस्तकात सूचित झालेली दिसून येते.
००००००
‘विश्वाचे आर्त’ या महाप्रकल्पामधील एका निर्णायक टप्प्यावर असताना काही गोष्टींचा खुलासा करायची आवश्यकता वाटते. तो टप्पा म्हणजे अर्थातच प्रसिद्ध व प्रभावी तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांटचे तत्त्वज्ञान. ‘विश्वाचे आर्त’ स्वभावतःच एक आंतरविद्याशाखीय प्रकल्प आहे, किंबहुना तसे असणे ही त्याची अंगभूत गरज आणि अनिवार्यता आहे हे जसे वेगळे सांगायची गरज आहे. तसेच या विद्यांमध्ये तत्त्वज्ञान या विद्याशाखेला स्थान द्यावे लागणार हेसुद्धा स्पष्ट आहे. या तत्त्वज्ञानात स्थूलमानाने पौर्वात्य आणि पाश्चिमात्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारप्रवाहांना स्थान असणेही तितकेच गरजेचे आहे. आता या विचारप्रवाहांमध्ये विशेषतः पाश्चात्त्यांचा विचार करताना कांट एखाद्या दीपस्तंभासारखा वाटतो. अगदी बोट ठेवूनच सांगायचे झाले, तर जागतिक पातळीवरील शांतीचा विचार व व्यवहार ज्यांनी केला, त्या वूड्रो विल्सन आणि हेन्री किसिंजर यांच्यावरील कांटचा प्रभाव कोणीच नाकारू शकत नाही.
मात्र कांट हा काही सहजासहजी समजू-उमगू शकेल असा तत्त्ववेत्ता नाही. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांच्या मेंदूला झिणझिण्या आणणारा हा तत्त्ववेत्ता आहे. महाराष्ट्राच्या बौद्धिक इतिहासाचा विचार केला, तर माझ्या विद्यार्थी दशेत ‘कांट कोणाला चांगला समजला आहे’ या एका विषयावर अनेकदा चर्चा केंद्रित झाल्याचे आढळते. रेगे, पाध्ये, पाटणकर ही नावे त्यावेळी आघाडीवर होती. या मंडळींची विद्वत्ता आणि व्यासंग यांचा पुरेसा आदर राखूनही असे म्हणावेसे वाटते, की त्यांनी चालवलेली चर्चा ही कांटची ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा आणि सौंदर्यमीमांसा यांच्या परिघातच फिरत असे. डॉ. दीप्ती गंगावने यांनी कांटच्या मानवशास्त्राच्या (Anthropology) अंगाने केलेली कांटच्या स्त्रीविषयक मतांची मांडणी हा अपवाद म्हणावा लागेल.
‘विश्वाचे आर्त’साठी आपल्याला कांटची मानव, राजकारण आणि धर्म यांच्याविषयीची मते विचारात घ्यावी लागतील हे उघड आहे. अर्थात, हा प्रकल्प तत्त्वज्ञानाचा नाही हे लक्षात घेऊन आपल्याला त्याच्या विस्तारमर्यादेची चौकटही सांभाळावी लागणार.
याआधीच्या लेखांतून कांटच्या पूर्वसुरींची चर्चा करताना आपण इंग्रज कवी अलेक्झांडर पोप याचा विशेष उल्लेख केला. त्याच्या प्रभावाची अधिक चर्चा करायला आपल्याला अवसर नाही व आवश्यकताही नाही. अलीकडे या विषयावर क्लाउस डेनेक राबेलो (Klaus Denecke Rabello) या अभ्यासकाने बरेच लेखन केले आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यायला हरकत नाही. त्याचा निष्कर्ष एका ओळीत सांगितला तरी त्याचे महत्त्व लक्षात यावे. एखाद्याला त्यात अतिशयोक्ती वाटली तर त्याला वाटेल तितका घसारा टाकून उर्वरित प्रतिपादन गंभीरपणे घ्यायला हरकत नसावी. ती ओळ म्हणजे ‘Kant had a plan. And it had Pope’s design.’
विशेष म्हणजे राबेलोने आपल्या विवेचनात संख्याशास्त्रीय पद्धतीचा यथायोग्य उपयोग करून घेतला आहे. कांटच्या लेखनात पोपचे संदर्भ कोठे आणि किती सापडतात याचा हिशोब त्याने मांडला आहे. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना कदाचित ही पद्धत योग्य वाटणार नाही, परंतु हा त्याच्या मांडणीचा एक हिस्सा आहे. त्याने तात्त्विक मुद्द्यांकडे पाठ फिरवली असे कोणाला म्हणता येणार नाही.
कांटच्या अभ्यासकांनी पोपकडे दुर्लक्ष का केले असावे, याचे एक कारण तर स्पष्ट आहे. तात्त्विक विचार गद्यातूनच व्यक्त होतो, काव्यातून कसा होईल? हा पूर्वग्रह त्यांना आड आला असणार. कवी या नात्याने कांटचे पोपबद्दलचे मत लक्षणीय आहे. त्यात त्याच्या कवितेबद्दलच्या मताचाही समावेश होतो - ‘Poetry, which is the grace of wisdom and where Pope still shines bright done.’
समकालीन तत्त्वज्ञमित्र जोसेफ ग्रीन याच्या पोपविषयीच्या अनास्थेचा उल्लेख करून कांट लिहितो, ‘It was strange with my friend Green that this inability also extended to poetry, the difference which and prose he could never recognize other than that the former was a forced and distorted syllable position, that’s why he enjoyed reading Pope’s Essays on Man, but found it unpleasant that they were written in verse.’
आपल्याकडे हा मुद्दा विशेषतः संत कवींच्या संदर्भात उपस्थित होतो. स्फूट अभंगरचना करणाऱ्यांचे जाऊ द्या; परंतु ज्ञानेश्वरी, अनुभवामृत आणि चांगदेवपासष्टी या सलग व संगतवार दीर्घ रचनांचे कवी ज्ञानेश्वर यांच्या संदर्भात तत्त्वज्ञ म्हणायचे काय? ते नेमके कोण, तत्त्वज्ञ की कवी? किंवा ते आधी तत्त्वज्ञ की कवी, असे बाळबोध प्रश्न उपस्थित करणारे महाभाग होऊन गेले. त्यांचा संदर्भ (नावांची गरज नाही) येथे द्यायला हरकत नसावी.
ज्ञानेश्वरांच्या संदर्भातील अशा शंकांचे निराकरण करणारे माझे प्रतिपादन माझ्या ‘त्रयोदशी’ या सकाळ प्रकाशनाच्या लेखसंग्रहात समाविष्ट आहे. त्याच्या तपशिलात न जाता स्वतः ज्ञानेश्वरांच्याच ओव्या उधृत करतो.
‘त्या उपाधिमाजी गुप्त। असे चैतन्य सर्वगत। ते तत्त्वज्ञ संत स्वीकारीती।।’’
येथे ‘तत्त्वज्ञ’ हे संतांचे विशेषण आहे, त्याचप्रमाणे,
‘ज्ञानाचे बोलणे। तेही येणे रसाळपणे।’
येथे ज्ञानव्यवहार आणि काव्यव्यवहार - म्हणजे आकलन आणि आस्वादन हे व्यवहार यांच्यातील द्वैतावर पडदा पाडला गेला आहे.
कांट पोपला माँटेन, ह्यूम, लॉक आणि होमरस यांच्या बरोबरीने (संख्येने नव्हे, तर समवेत) कोठे उधृत करतो हे निदर्शनास आणून राबेलो आणखी एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आणतो. ही बाब वरकरणी ‘लाइट मूड’मधील वाटली, तरी तिने जे ध्वनित केले आहे, ते महत्त्वाचे मानायला हवे. त्यातून त्याच्या लेखी बुद्धिमान विचारवंत म्हणून पोपचे महत्त्व किती होते, हे लक्षात यावे. ‘All geniuses are small’ - प्रतिभावंत उंचीने कमी असतात या सर्वसाधारण समजुतीचा उल्लेख करताना कांट येथे सॉक्रेटिस आणि ॲरिस्टॉटल यांच्या बरोबरीने पोपचे नाव घेतो. आता प्रतिभावंत उंचीने कमी असतात ही साधारण लोकसमजूत असली, तरी पोपने निर्दिष्ट केलेल्या व्यक्ती हा लोकसमजुतीचा भाग नसून कांटच्या निरीक्षणाचा भाग असणार हे उघड आहे.
कांटने केलेल्या सॉक्रेटिस आणि ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या उल्लेखांचा आधार घेऊन पुढील दुवे जोडण्यापूर्वी पोपकडे झालेल्या दुर्लक्षाच्या संदर्भातील राबेलोने पुढे आणलेल्या आणखी एका कारणाचा उल्लेख करणे गरजेचे वाटते. ते संख्याशास्त्रीय वगैरे नसून गंभीर आहे. ‘Although Kant refers to his own work as a philosophical plan as a whole, the history of the Studia Kantiana shown us that Kant is studied like a corpse, being torn apart in pieces, often having neglected its integrity, paralles and interconnectedness.’
आजवरच्या अभ्यासकांनी केलेल्या कांटच्या अभ्यासाची तुलना राबेलो शवविच्छेदनाच्या प्रक्रियेशी करतात हे धक्कादायकच वाटण्यासारखे आहे. तथापि, यातील वाक्पटुत्व (Rhetoric) बाजूला ठेवून मुद्द्याकडे लक्ष द्यायला हरकत नसावी. कांट हा एक समग्रतालक्ष्यी तत्त्वज्ञ असून, त्याच्यापुढे एक तात्त्विक प्रकल्प होता, योजना होती. त्यामुळे त्याच्या कोणत्याही ज्ञानशाखेमधील विचारांकडे पाहताना समग्रतेच्या संदर्भातच पाहिले पाहिजे. अलग करून स्वतंत्रपणाने पाहता येत नाही, असे येथे सुचवले गेले आहे. पद्धतिशास्त्रीयदृष्ट्या त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. आता हा ‘plan’ काय होता याची चर्चा करायला हवी.
या संदर्भात राबेलो डब्ल्यू.एच. वेकमाइस्टर यांच्या Kant : The Architectonic and Development of his Philosophy या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा हवाला देतो. स्वतः कांटनेच या प्रकारच्या स्थापत्यशास्त्रीय प्रतिमांचा उपयोग केला असल्याने हा दावा योग्यच मानावा लागेल. राबेलोची पसंती जैविक प्रतिमानाला असल्याचे दिसते. त्यामुळेच शवविच्छेदनाची उपमा पुढे आली आहे. वेकमाइस्टरच्या मतानुसार, ‘The unity of problem-determind development in his thinking, not that of a preconceived or static system.’
कांटला ज्या व्यवस्थेची उभारणी किंवा रचना करायची आहे, ती कोणत्या प्रश्नाच्या किंवा तात्त्विक समस्येच्या अनुरोधाने याचा विचार येथे करावाच लागेल. कांटपुढील समस्या एक नसून चार आहेत. त्यांचा उल्लेख त्याच्या Logic या पुस्तकामध्ये सापडतो. ते प्रश्न खालीलप्रमाणे -
1) What can I know? मी काय जाणू शकतो?
2) What should I no? मी काय करावे?
3) What may I hope for?
4) What is human being?
पहिला प्रश्न ज्ञानमीमांसात्मक - Episenologial आहे. दुसरा नैतिकतेशी संबंधित - नीतिशास्त्रीय आहे. येथे shouldचा अर्थ ‘Ought’ - संस्कृतमध्ये जे ‘तव्य’ प्रत्ययाने व्यक्त होते - जसे कर्तव्य. तिसरा प्रश्न धर्माशी निगडित असून, चौथा मानवशास्त्राशी - Anthropology) संबंधित आहे. (राबेलोचे असे निरीक्षण आहे, की हे चार प्रश्न पोपच्या An Essay on Man या काव्याच्या अंतर्गत असलेल्या चार ‘epistoles’शी (अनावृत्त पत्रसदृश) नाते सांगतात.)
प्रश्नांची उत्तरे देणारे कांटचे तीन समीक्षाग्रंथ (Critiques) म्हणजे The Critique Of Pure Reason, The Critique of Practical Reason आणि The Critique of Judgement. हे तीन ज्या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा करतात, त्या प्रश्नांचे स्वरूप माणूस काय अपेक्षू शकतो (श्रेय/प्रेम स्वरूपात) आणि मुळात माणूस ही काय चीज आहे, या प्रश्नांच्या स्वरूपापेक्षा वेगळे आहे. त्यात उपस्थित प्रश्नांची सार्वत्रिक साधारण, सर्वसामान्य - Universal उत्तरे संभवतात. त्यात लौकिक, अनुभवसंबंध किंवा Cosmopolitian छटांचा अभाव अपेक्षिता येतो. तसे मानवाच्या स्वभाव-स्वरूपासंबंधीच्या, त्याच्या आशावादाच्या बाबतीत होत नाही, तेथे आपण केवळ बुद्धीशी (reason) संबद्ध नसून, हाडामांसाच्या माणसांशी व्यवहार करीत असतो. जेथे बुद्धीशिवाय संवेदना, भावना, इच्छा असे काही मानसिक, शारीरिक घटक असतात. बुद्धीच्या माध्यमातून उचित-अनुचित, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यांचा निवाडा (की जो निरपवादपणे सार्वत्रिक असेल) करता आला, तरी त्याची कृतीच्या, कर्माच्या पातळीवर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना भौतिक व लौकिक स्तरावर अडथळे येऊ शकतात. त्यांच्यावर मात करणे सहजसाध्य नसते. मानवी व्यक्ती ही अशा शारीरिक- मानसिक- बौद्धिक घटकांचा एक संघात असतो. त्यातील बुद्धीला तिचे अमूर्तीकरण (Abstraction) करून अलग करता येत असले, तरी हे अमूर्तीकरण व अलगीकरण परत बुद्धीच्याच पातळीवर होत असते. ते करायला हरकत असायचे कारण नाही. किंबहुना करायलाच हवे. तथापि, जेव्हा प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवरील अंमलबजावणीचा मुद्दा येतो, तेव्हा खरी कसोटी लागते. तिला उतरायचे असेल तर या सर्व घटकांसह माणसाला समजून घ्यायला हवे. हे आकलन कांटच्या महाप्रकल्पाचाच, योजनेचाच, व्यवस्थेच्या बांधकामाचाच भाग आहे. त्यासाठीच त्याच्या मानवशास्त्र आणि धर्म यांच्याविषयीच्या ग्रंथांचा प्रपंच.
आता हे असे घटक वा मुद्दे केवळ किंवा शुद्ध बुद्धीच्या (Pure reason किंवा pure practical reason) प्रांताच्या पलीकडचे असल्यामुळे त्यांच्याविषयीच्या विवेचनात काटेकोरपणा, सार्वत्रिकता अपेक्षिणे बरोबर होणार नाही, खरेतर ते अन्यायकारक ठरेल; त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे तेथे ती नाही म्हणून त्या भागाला अतात्त्विक किंवा कमतात्त्विक मानणे किंवा हा विरोधाभास (Contradition) आहे, म्हणून त्यासाठी कांटला जबाबदार धरणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही होय. कांटच्या अभ्यासकांकडून हा प्रमाद घडत आलेला आहे. एकीकडे अनुभवपूर्व/ अनुभवातीत अशी सार्वत्रिक तत्त्वे आणि दुसरीकडे त्यांचे अनुभवविश्वातील कर्मात रूपांतर या दोन्ही स्तरांचे स्वतंत्रपणे विवेचन करून त्यांची सांधेजोड करायची हे काही सोपे काम नाही. कांटला नेमके तेच करायचे आहे. या कार्याची आवश्यकता व रूपरेषा त्याच्या प्रसिद्ध Groundwork for the Metaphysics of Morals या पुस्तकात सूचित झालेली दिसून येते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो लिहितो, ‘Thus not only are moral laws together with their principles essentially different from all practical knowledge involving anything empirical but all moral philosophy rests solely on its pure or non-empirical part. Its application to human beings does not depend on knowledge of any facts about them (anthropology); it gives them as rational beings a prior laws - ones that are valid for whatever the empirical circumstances may be.’
आता ही झाली शुद्ध तात्त्विक व सैद्धांतिक भूमिका; पण अशा सिद्धांतांचे व्यवहारात रूपांतर करायचे असेल तर सिद्धांतात नाकारल्या गेलेल्या वा दुर्लक्ष केलेल्या घटकांची दखल घ्यावीच लागेल. ही दखल घेणे आवश्यक वाटल्याने Groundwork for the Metaphysics of Moralsचे संपादक जोनाथन बेनेट यांनी कंसात घेण्याची दक्षता दाखविली आह, ती अशी -
(Admittedly, experience comes into power of judgement that has been sharpened by experience - partly to distinguish in which cases where the laws apply and partly to let the laws get into the person’s will and to stress that they are to be acted on. For a human being has so many preferences working on him, that though he is quite capable of the idea of a practical pure reason, he can’t so bring it to bear on the details of how he lives his life.’)
माझ्या मते कंसात टाकलेला मजकूर काही कमी महत्त्वाचा नाही आणि त्याला अतात्त्विक मानून बाजूला ठेवण्याचीही गरज नाही. असे करणे म्हणजे तत्त्वज्ञानातील सोवळे होय!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.