KRK26B03990
करकंब ः येथील सिद्धनाथ मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिल्यानंतर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे अन् उपस्थित मान्यवर.
करकंब सिद्धनाथ मंदिरास महिनाभरात ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ
पालकमंत्री गोरे; भाविकांच्या सुविधांसाठी तीन कोटींचा निधी
करकंब, ता. १२ : करकंब (ता. पंढरपूर) येथील सिद्धनाथ मंदिर अन् सद्गुरू बजरंगतात्या पिसे महाराज समाधीस्थानास एका महिन्याच्या आत ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ, अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
करकंब येथील सिद्धनाथ मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अन् ब्रह्मचैतन्य श्रीसद्गुरू बजरंगतात्या महाराज यांच्या चतुर्थ समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहास गोरे यांनी भेट दिली. गेल्या ३९ वर्षांपासून सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा पाहून प्रभावित झालेल्या गोरे यांनी सिद्धनाथ मंदिराचा सध्या असलेला ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा एका महिन्याच्या आत ‘ब’ तीर्थक्षेत्रात करण्याची घोषणा केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सप्ताह काळात दररोज दहा हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहत असल्याने त्यांच्या सोयी-सुविधांसाठी तातडीने तीन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही गोरे यांनी केली.
गोरे म्हणाले, आपणही वारकरी संप्रदायातीलच असून, माझी आई पंढरपूरची वारी करायची. आईसोबत अनेक वेळा माऊलींच्या दर्शनासाठी जात असू. त्यावेळी कधीही पालखीचे दर्शन होऊ शकले नाही. मात्र, आता सोलापूरचा पालकमंत्री म्हणून त्याच माऊलीच्या पालखी सोहळ्याचे नियोजन करण्याची संधी मिळाली.
पंढरीची वारी ३२ लाखांपर्यंत पोहोचूनही योग्य नियोजन करून एकाही भाविकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व भक्तिस्थानांचा विकास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण असून, यापुढे त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही गोरे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, हभप सुदाम पिसे महाराज, संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर, हभप प्रभू माळी महाराज, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, माढा तहसीलदार संजय भोसले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.