कऱ्हाडचे विकासनायक ः राजेंद्रसिंह यादव
कऱ्हाड शहराचा कायापालट करणाऱ्या दुसऱ्या टप्प्याचे नेतृत्व करणारे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव सध्या शहराचे विकासक ठरत आहेत. कऱ्हाडकरांच्या पुढील तीन पिढ्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी तब्बल ३२५ कोटींचा निधी खेचून आणणाऱ्या ‘किंगमेकर’ नेतृत्वाच्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा घेतलेला वेध....
सत्ता मिळवण्यासाठी अनेकजण राजकारण करतात; पण त्या सत्तेचा वापर माणसांचे जिणे सोपे करण्यासाठी कसा करावा, त्याचा वस्तुपाठ नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी घालून दिला. त्यांना त्यांचे बंधू विजयसिंह यादव यांची समर्थ साथ आहे. यादव बंधू जिकडे, तिकडे विजय निश्चित असे समीकरण बनलेले आहे. त्यामागे कऱ्हाडच्या जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा ठरत आहे. कऱ्हाडकरांच्या सुरक्षित आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी दुसरे पर्व साकारण्याचा निर्धार केला आहे. कऱ्हाडच्या राजकारण आणि समाजकारणात तीन दशकांपासून आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना नेहमीच गुरुस्थानी ठेवले. ते नेहमीच पक्षीय सीमा ओलांडून उदयनराजे यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसते. नगरसेवक ते नगराध्यक्ष असा प्रदीर्घ प्रवास करताना त्यांनी राजकीय विरोध कधीही विकासाच्या आड येऊ दिला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले आपुलकीचे आणि विश्वासाचे संबंध त्यांनी कऱ्हाडच्या प्रगतीसाठी पणाला लावले.
सुमारे ५० वर्षांपूर्वी दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी कऱ्हाड शहराच्या विकासाचा पाया (फेज वन) रचला होता. मात्र, बदलता काळ, वाढती लोकसंख्या आणि शहराची झालेली हद्दवाढ पाहता कऱ्हाडला नव्या संकल्पांची गरज होती. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी ही गरज ओळखली आणि ‘कऱ्हाड फेज टू’ (विकास पर्व २) ही ध्येयधोरणात्मक संकल्पना मांडली. त्यांच्या अहोरात्र पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत कऱ्हाडच्या विकासासाठी सुमारे ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात त्यांनी ९६ कोटी २८ लाखांची अद्ययावत भुयारी गटार योजना दिली आहे. हद्दवाढ झालेल्या भागात ५२ किलोमीटरची नवी पाइपलाइन टाकली जाणार आहे. दुसरी १६० कोटींची आधुनिक पाणीपुरवठा योजना आहे. त्यात नगरोत्थान महाभियानातून सन २०५६ पर्यंतच्या कऱ्हाडच्या लोकसंख्येची तहान भागवणारी योजना. त्यात सोलर सिस्टीम आणि अद्ययावत एसडीआर ओझोनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कऱ्हाडकरांना थेट ‘मिनरल वॉटर’ दर्जाचे शुद्ध पाणी मिळणार आहे. रस्त्यांसाठी १९४ कोटींचा निधी दिला आहे. त्यात शहरासह नव्याने समाविष्ट झालेल्या वाढीव भागातील रस्ते गुळगुळीत आणि भक्कम करण्यासाठीचा महत्त्वाकांक्षी आराखडा आहे.
संकटकाळात नेहमीच पाठीशी
विजयसिंह व राजेंद्रसिंह यादव बंधूंचे राजकीय यश जेवढे मोठे आहे, त्याहून मोठा आहे त्यांचा संवेदनशील आणि हळवा स्वभाव. कऱ्हाडकर जेव्हा जेव्हा संकटात सापडले, तेव्हा यादव बंधूंनी आपली तिजोरी आणि हृदय दोन्ही उघडे ठेवले.
कोरोना काळातील आपुलकीचा हात
जेव्हा जग घरात बंद होते, तेव्हा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता यादव बंधू आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर होते. पाच हजार गरजू कुटुंबांना धान्याची किट आणि तब्बल दहा हजार भाजीपाल्याची पाकिटे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी करून मोफत नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचवली.
२४ तास विनामूल्य रुग्णवाहिका
कोरोनाच्या भीतीने लोक लांब पळत असताना (कै.) शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठानची रुग्णवाहिका सलग दोन वर्षे २४ तास पालिकेच्या सेवेत विनामूल्य रुजू केली होती.
सामाजिक सलोख्याचा धागा
रमजान ईदच्या काळात गरीब मुस्लिम बांधवांच्या घरात सणाचा आनंद टिकावा म्हणून शिरखुर्मा आणि दुधाच्या साहित्याचे किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
महापुरात धावून जाणारे देवदूत
कऱ्हाडला महापुराचा वेढा पडतो, तेव्हा राजेंद्रसिंह प्रशासकीय पातळीवर नागरिकांचे स्थलांतर सुखरूप करतात, तर विजयसिंह यादव पूरग्रस्तांच्या निवासाची, आरोग्य शिबिरांची आणि जेवणाची व्यवस्था करतात. एवढेच नव्हे, तर पूररेषेच्या जाचक नियमांमुळे सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत लढा दिला आहे.
कोट
कऱ्हाड शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. पाणीपुरवठा, भुयारी गटार आणि रस्ते विकासातून कऱ्हाडचा कायापालट करायचा आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना या शहराचा अभिमान वाटेल.
राजेंद्रसिंह यादव,
नगराध्यक्ष, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.