दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीत फेररचनेचा मुद्दा
कोवलम येथे गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत चर्चा
चेन्नई, ता. २० (पीटीआय) : दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीत लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी १९७१च्या जनगणनेला आधार मानण्याची मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नईजवळील कोवलम येथे गुरुवारी दक्षिण विभागीय परिषदेची ३१वी बैठक झाली.या बैठकीत बोलताना शिवकुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांची संख्या पुढील २५ वर्षे कायम ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या स्थिरीकरणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला प्रतिसाद देत यश मिळविले आहे. त्या यशाची शिक्षा त्यांना मतदारसंघांच्या फेररचनेच्या वेळी मिळता कामा नये, असे शिवकुमार म्हणाले. महिलांच्या आरक्षणाची अंमलबजावणीही लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच करावी, असा प्रस्ताव परिषदेने केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रतिनिधित्व केवळ जागांच्या संख्येवर अवलंबून नसून राजकीय वजन आणि आवाजही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत कर्नाटक-तमिळनाडूमधील कावेरी नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न आणि मेकेदाटू प्रकल्पाचाही मुद्दा चर्चेत आला. मेकेदाटू प्रकल्प कर्नाटकपुरता मर्यादित नसून तमिळनाडूसाठीही उपयुक्त ठरू शकतो, असा दावा शिवकुमार यांनी केला. या प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील शेतकऱ्यांना मदत करेल, असे ते म्हणाले. मात्र, कावेरीवर प्रस्तावित जलाशयामुळे तमिळनाडूच्या हिताला बाधा पोहोचेल, अशी तमिळनाडूची भूमिका आहे. बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दक्षिण विभागीय परिषदेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये, तसेच पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश सहभागी आहेत. कावेरीसह तेलंगण-आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू-केरळ यांच्यातील पाणीवाटपाचे प्रश्नही परिषदेत महत्त्वाचे ठरतात.
विजय यांची सदिच्छा भेट
दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विजय यांची शहा यांच्याशी झालेली ही पहिली भेट होती. अधिकाऱ्यांनी ही ‘सदिच्छा भेट’ असल्याचे सांगितले. अमित शहा यांनी विजय यांच्या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमावर शेअर केले. बैठकीच्या पार्श्वभूमीवर विजय आणि केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्यातही संवाद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.