UPR26B09004
पंढरपूर ः कार्तिकच्या पार्श्वभूमी वरती ६५ एकर परिसराची पाहणी करताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन, नगराध्यक्ष प्रणिता भालके व इतर अधिकारी.
स्वच्छता, पाणीपुरवठा कामांना गती देण्याचे निर्देश
कार्तिकी यात्रेच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १८ : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी (ता. १८) वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा वाळवंट आणि भक्तीसागर परिसराची पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित विभागांकडून तयारीचा आढावा घेतला. यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कार्तिकी शुद्ध एकादशी २१ नोव्हेंबर रोजी असून, यात्रेचा कालावधी १० ते २४ नोव्हेंबर असा आहे. या काळात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून विविध ठिकाणच्या व्यवस्थेची माहिती घेतली.
चंद्रभागा नदीपात्र आणि घाट परिसरात स्वच्छता कायम राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत. नदीकाठावरील काटेरी झाडे-झुडपे काढावीत, घाटांवरील माती हटवून घाट स्वच्छ धुऊन घ्यावेत, तसेच घाटांच्या कोपऱ्यांमध्ये साचलेला कचरा तातडीने हटवावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नदीपात्रात वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वाळवंटात खाद्यपदार्थ आणि माळा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
भक्तीसागर परिसरात दिंड्यांसोबत येणारे वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने वास्तव्यास असतात. त्यांच्या सोयीसाठी नदीपात्रात ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या घाटाचे मुरुमीकरण आणि सपाटीकरण तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वाखरी पालखी तळावर कार्तिकी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो. या ठिकाणी जनावरे आणि पशुपालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जनावरांवरील उपचारांसाठी २४ तास पशुवैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सरगम चौक येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाययोजना करून वाहतूक सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनी चंद्रभागा वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूमची संख्या वाढविणे आणि परिसरात वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याची सूचना केली.
या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी सीताराम डुबल, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.