केसनंद, ता. ४ : पुणे-नगर महामार्ग, सोलापूर महामार्ग, तसेच वाघोली-राहू मार्गाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांमुळे केसनंद (ता. हवेली) गावातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावाची लोकसंख्या सुमारे एक लाखांच्या आसपास पोहोचली असून, वाढती वाहनसंख्या, शेतीमालाची वाहतूक आणि रस्त्यालगतची अतिक्रमणे यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
केसनंद गावातून पुणे-नगर महामार्ग व सोलापूर महामार्गाला जोडणारा बायपास मार्ग जात असून, वाघोली-राहू मार्गाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुणे महानगरपालिका हद्दीलगत असल्याने गावात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील शेतकरी शेतीमाल शहरात नेण्यासाठी केसनंदमधील रस्त्यांचा वापर करतात. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. परिसरातील शाळांच्या दैनंदिन वाहतुकीसह परीक्षा काळात विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुख्य रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, विजेचे खांब आणि अरुंद रस्त्यांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या समस्येबाबत मागील चार वर्षांपासून विविध विभागांकडे वारंवार निवेदने देऊन उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मुख्य चौकातील दर्ग्याशेजारील जुन्या मोरीचे बॅरिकेड हटवावे, मुख्य चौकातील अतिक्रमणे व विजेचे खांब तातडीने हटवावेत, छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविनंदा बिल्डर्स यांच्या पीएमआरडीए मंजूर साइट मार्जिनपर्यंत रस्ता रुंदीकरण करावे, वाहतूक नियमनासाठी केसनंद येथे कायमस्वरूपी सहा वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करावी, वाघोली-राहू मार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करून खड्डे बुजवावेत, तसेच पीएमआरडीएच्या नवीन व जुन्या आराखड्यानुसार आरपी, डीपी, व्हीआर रस्ते ताब्यात घेऊन विकसित करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या तातडीने मान्य करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही न झाल्यास २७ सप्टेंबर २०२६ रोजी मोठे जनआंदोलन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ८ ऑक्टोबर २०२६पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत व नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
१५ गावांवर परिणाम
केसनंदमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ गावापुरता मर्यादित नसून परिसरातील सुमारे १५ गावांतील नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.