खानदेशातील जलसाठा घटला; नद्याही आटल्या
प्रकल्पातील जलसाठा ६१ टक्क्यांवर स्थिर; तलाव ३० टक्के
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशातील अनेक मध्यम, लघु प्रकल्प यंदा १०० टक्के भरले नाहीत. फक्त काही प्रकल्प भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्टा, पश्चिम भागातील प्रकल्पांत जलसाठा यंदा मुबलक आहे. पण प्रकल्पांतील जलसाठा मागील दोन महिने उष्णता व उपसा सुरू असल्याने सतत कमी झाला आहे.
तलाव व लघु प्रकल्पांतील एकूण जलसाठा ३० टक्क्यांवर आहे. तर, मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा सुमारे ६१ टक्क्यांवर असल्याची माहिती आहे. मागील हंगामात नोव्हेंबरमध्ये प्रकल्पांतील एकूण जलसाठा ८५ टक्क्यांवर होता.
खानदेशातील एकूण जलसाठा ६१ टक्क्यांवर स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अग्नावती, हिवरा, पारोळ्यातील बोरी, चाळीसगावातील मन्याड, एरंडोलातील अंजनी आदी या मध्यम, लघु प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. पण या भागातील लघु तलाव कोरडे आहेत.
पावसाळा संपून अर्धा महिना पूर्ण झाला आहे. परंतु खानदेशातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांत सप्टेंबरपासूनच प्रवाह बंद झाला आहे. त्यात गिरणा, तापी, पांझरा, गोमाई, उदय, वाघूर, पांझरा या नद्यांत पाण्याचा प्रवाह बंद आहे.
गिरणा धरणातील जलसाठा यंदा १०० टक्के आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. पण त्यातूनही पाणीवापर सुरूच आहे. यंदा त्यातून रब्बीला फक्त एकच आवर्तन दिले जाणार आहे. तर बिगर सिंचनासंबंधी तीन आवर्तने दिली जातील.
---- चौकट ---
पश्चिम भागात पुढे अडचणी वाढणार
पाचोऱ्यातील हिवरा, अग्नावती, बहुळा प्रकल्पातही जलसाठा कमी झाला आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्पात कमी जलसाठा आहे. एरंडोलातील अंजनी प्रकल्पात यंदा १०० टक्के जलसाठा होता. पण त्यातून पाणीवापर सुरू आहे. धुळ्यात साक्रीमधील बुराई प्रकल्प भरला नाही. अमरावती, मालनगाव, पांझरा, सोनवद या प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. पण, पांझरा व अनेर या अनुक्रमे साकी व शिरपूर तालुक्यातील नद्या आता कोरड्या झाल्या आहेत. अनेर प्रकल्पातून रब्बीला तीन आवर्तने दिली जाणार आहेत.
--- चौकट ----
तापी नदीला प्रवाही पाणीच नाही
खानदेशात २०२३ च्या पावसाळ्यात गिरणा नदीला काही दिवस प्रवाही पाणी आले होते. पण मागील वर्षी व यंदाही तापी, गिरणा, वाघूर, पांझरा आदी नद्या डिसेंबरमध्येही प्रवाही होत्या. यंदा तापी नदीचा प्रवाह ऑक्टोबरमध्येच बंद झाला आहे.
--- चौकट ---
सातपुड्यालगतचे प्रकल्पही कोरडे
खानदेशात सातपुडा पर्वतालगतच्या प्रकल्पांत जलसाठा काही भागात बरा तर काही भागात अल्प आहे. त्यात नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सुसरी, चिरडे, दरा या लघु प्रकल्पातही जलसाठा अल्प आहे. धुळे जिल्ह्यात शिरपुरातील अनेर, जळगाव जिल्ह्यात चोपड्यातील गूळ, यावलमधील मोर, रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलमधील सुकीमध्ये १०० टक्के जलसाठा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.