खंडोबा यात्रेसाठी पालनगरी सज्ज
प्रशासनाकडून तयारी पूर्ण; शुक्रवारी मुख्य दिवस
उंब्रज, ता. ३० : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा- म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस दोन जानेवारीला आहे. यावर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
पाल देवस्थान ट्रस्टने काशीळ- हरपळवाडी मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, तर उत्तरेकडील वाळवंटात यात्रेसाठी मेवामिठाईची दुकाने, सिनेमागृहे, पाळणे यासह तंबू उभे राहिले आहेत. त्याचबरोबर यात्रेत चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॅावर उभारण्यात आले आहेत. देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात व लग्न सोहळा मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
काशीळ- पाल या मुख्य रस्तालगत मेवामिठाई, खेळणी व हॅाटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू झाला असून, पालनगरी हळूहळू फुलू लागली आहे. एसटी प्रशासनाने काशीळ- पाल रस्त्यावर आदर्शनगर येथे तात्पुरत्या बसस्थानकाची तयारी केली असून, लांब पल्यावरून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे.
त्याचबरोबर आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, तसेच सर्व शासकीय विभागाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत.
-----------------------------
00723
पाल : यात्रेनिमित्त उत्तरेकडील वाळवंटात सज्ज झालेली मेवामिठाईची दुकाने व पाळणे.
----------------------