नगराध्यक्षांच्या खांद्यावर ‘लोकशाही’ची बंदूक
विजय वाटेगावकर; महायुतीच्या घटक पक्षालाच गोळ्या घालण्याचे राजकारण
कऱ्हाड, ता. ७ ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकशाही आघाडी नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीतच गोळ्या घालत आहे. महायुतीचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची कामे अडवत असल्याचा आरोप भाजपचे पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी नगरसेवक शिवाजी पवार, अजय पावसकर, आशुतोष डुबल, गणेश पवार, सुमीत जाधव, सुहास जगताप, किशोरी शिंदे, वर्षा वास्के, शहराध्यक्षा सुषमा लोखंडे, एकनाथ बागडी, स्मिता हुलवान, वैभव माने, किरण मुळे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांमध्येच एकमत नसल्याची स्थिती असल्याचे सांगून श्री. वाटेगावकर म्हणाले, ‘‘सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घालायचा आहे, त्याचे खापर आमच्यावर फोडायचे आहे.’’ एकमेकांविरोधात निवडणूक लढवताना महायुतीचा साक्षात्कार झाला नव्हता का? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘एकत्रित आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, नगराध्यक्षपदावरून बिघडले. त्यामुळे सत्ताधारी स्वतःचे अपयश लपविण्यासाठी विरोधकांवर खापर फोडत आहेत. सभागृहात गोंधळ झाला. त्याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. पालिकेत नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जात असताना त्यांना जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही.’’
ते म्हणाले, ‘‘अन्य पालिकांत सहा ते सात सभा झाल्या. मात्र, कऱ्हाडला अवघ्या दोनच सभा झाल्या. सभेत पहिला विषय सुरू होण्यापूर्वीच श्रद्धांजलीचा ठराव घेण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असताना आमच्यावर खापर फोडले जात आहे. शाळा, पाणी, कचरा डेपो, रस्ते, नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न विचारले, की उत्तर देण्याऐवजी गोंधळ घालून विषय दडपण्याचा होणारा प्रयत्न हे योग्य नाही.’’
ते म्हणाले, ‘‘शहराच्या विकासासाठी आमदार डॉ. भोसले यांनी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला. त्याचे श्रेय सत्ताधारीच घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला कोणाच्याही गुडबुकमध्ये जाण्याची गरज नाही. हा भाजप आहे, येथे सर्वजण एकसमान असतात. मंगळवार पेठेतील उद्यानाबाबत अडचण केली जात आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार उद्यान, संरक्षक भिंतीसाठी एक कोटी २० लाखांचा निधी दिला. मात्र, तेथे व्यावसायिक संकुलाची मागणी झाली. हे राजकारण आहे. नेकलेस रोडसाठी सुमारे ६८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेले स्वप्न साकार करण्यासाठी आमदार डॉ. भोसले त्याचा पाठपुरावा करत आहेत. मात्र, विकासाच्या कामात ते राजकारण करत आहेत.’’
............
चौकट
...................
गुंड कोणासोबत असतात?
श्री. वाटेगावकर म्हणाले, ‘‘सोमवार पेठेतील रस्ता व क्रेडाईसंबंधित विषय असल्याने नागरिक सभागृहात येणार होते. प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या सामान्यांना गुंड म्हणणे, दुर्दैवी आहे. तो शब्दप्रयोग लोकशाहीला शोभणारा नाही. गुंड कोणासबोत असतात? ते सगळ्यांना माहिती आहे.’’
...............
यशवंत विचारामुळेच...
भाजपचे नगरसेवक आशुतोष डुबल यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख होता. त्याबद्दल श्री. डुबल म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आमदार होते. त्यावेळी त्यांनी केलेली कामे सगळ्यांना माहिती आहेत. त्याचा उल्लेख आम्ही केला, यालाच तर यशवंत विचार म्हणतात. आम्ही यशवंत विचारानेच वाटचाल करत आहोत.’’
.............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.