मोदींविषयी बोलताना
खर्गेंची जीभ घसरली
पाटणा, ता २५ (वृत्तसंस्था) ः येथील कार्यक्रमामध्ये मोदींविषयी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा तोल गेला. त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. खर्गे यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांनी केली आहे.
डॉ. कृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात खर्गे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांचे भाषण सुरू असताना श्रोत्यांमधील एका व्यक्तीने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत’ अशा आशयाची टिपणी केली. ती ऐकल्यानंतर खर्गेंचा तोल गेला व त्यांनी मोदींच्या वडिलांचा उल्लेख करत असभ्य भाषेत टीका केली.
त्यानंतर खर्गे म्हणाले, ‘‘काळा पैसा १०० दिवसांत भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. कुठे आहे तो पैसा?’’
खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. ‘‘जातीय तणावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी जबाबदार आहे. जोपर्यंत देशावर तिचा प्रभाव राहील, तोपर्यंत शांतता नांदणार नाही. आजही आरएसएस-भाजपमध्ये अस्पृश्यतेच्या कल्पना बाळगणारे आणि राज्यघटनेच्या विरोधात असणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत.’’
राष्ट्रीय लोकशाही आघाडीममध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार समाविष्ट झाल्याबद्दलही त्यांनी टीका केली. ‘‘संयुक्त जनता दलाचे नेते ज्या समाजवादी विचारधारेसह राजकारणात आले होते, त्या विचारधारेपासून दूर जाणारे पाऊल नितीशकुमार यांनी टाकले आहे. ते भाजप आणि आरएसएसच्या मागे गेल्याचे दुःख आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कमकुवत होऊन आपल्या विचारधारेचा त्याग करते, तेव्हा असेच घडते,’’ असे खर्गे म्हणाले.
मर्यादा ओलांडली
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पंतप्रधानांबद्दलच्या असभ्य टिपणीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवरील पोस्टद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. खर्गे यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत,यापूर्वीही त्यांनी पंतप्रधानांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्ये केली आहेत, असे शहा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
"गेल्या १२ वर्षांपासून होत असलेल्या सततच्या निवडणुकीतील पराभवांमुळे काँग्रेस पक्ष इतका निराश झाला आहे की, त्यांच्याकडे कोणतेही धोरण किंवा मुद्दा उरलेला नाही, केवळ शिवीगाळीचे राजकारण उरले आहे," असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.