PNE26W19295
अहिल्यानगर ः पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक घेतली. समवेत आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आदी.
शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास फौजदारी गुन्हे
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ः जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक
अहिल्यानगर, ता. १५ ः बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार आणि विमा नाकारल्यास केवळ परवाने निलंबित न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास गुन्हे दाखल करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. जी. के. ससाणे, डॉ. प्रशांत बोडके, दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करा. जिल्ह्यात खतांचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पारंपरिक युरिया व डीएपीला प्रभावी पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’च्या वापरास प्रोत्साहन द्यावे.
------------
महत्त्वाचे निर्णय
- खत खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खतांच्या पिशव्यांवर ‘क्यूआर’
- इलेक्ट्रॉनिक विक्री यंत्रणा प्रभावीपणे राबवा.
- योजना, हवामान अंदाज व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी गावपातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप
- शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार
- बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने तपासणी नाके उभारणार
------------
केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतलीय. पीएमएफएमई योजनेत सलग दोन वर्षे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला. कृषी यांत्रिकीकरणात एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला. ‘महा-विस्तार’ ॲपवर ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली. जिल्ह्यात १२ हजार ५०० एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू आहेत.
-डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी.
--------------
जिल्ह्यात खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. आतापर्यंत ११ हजार तपासण्या पूर्ण करून १०३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात २ पोलिस केसेस व १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.