खोडद, ता. ३ : खोडद, हिवरे, मांजरवाडी, भोरवाडी परिसरातील शेतकरी शनिवारी (ता.३१) व रविवारी (ता.१) झालेल्या पावसामुळे सुखावले. या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने फळपिके, भाजीपाला, ऊस आदी पिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील काही महिन्यांपासून पावसाअभावी आणि वाढत्या तापमानामुळे अडचणीत सापडलेल्या शेतीला या पावसामुळे नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
खरीप हंगाम २०२६ मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणात अनियमितता राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जून व जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला. मात्र, त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याने फळबागा, भाजीपाला, ऊस व इतर शेतीपिकांना पाण्याच्या ताणाचा मोठा फटका बसला. त्यामुळे जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः फळबागा, ऊस व भाजीपाला पिकांच्या वाढीस आणि उत्पादन वाढीस या पावसाचा फायदा होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच वातावरणातील तापमान कमी होऊन गारवा निर्माण झाल्याने पिकांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतीला उभारी मिळण्याची आशा
अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली असली, तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरीवर्गासाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. पावसामुळे शेतीला पुन्हा उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.