पुणे

संवर्धन नकाशावर किरकसाल

CD

तरस गणना करणारे किरकसाल ठरले राज्यातील पहिले गाव

६०६ जैवविविध घटकांची नोंद; कुऱ्हाडबंदी, शिकारबंदीचा यशस्वी प्रयोग

फिरोज तांबोळी : सकाळ वृत्तसेवा
गोंदवले, ता. १ : जैवविविधता संवर्धन सर्वेक्षणात तब्बल ६०६ वन्यजीव व वनस्पती घटकांची नोंद करून किरकसालने नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे वाघ व बिबट्या गणनेच्या धर्तीवर ‘तरसांची गणना’ करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून राज्याच्या संवर्धन नकाशावर किरकसालने स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय नोंदींमुळे शासनाकडून हा परिसर जैवविविधता वारसास्थळ किंवा संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित होणे आवश्यक आहे.

किरकसालचा संवर्धन चळवळीचा अनोखा प्रवास

सुमारे १८ किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या किरकसाल गावाने सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेमाची अनोखी सांगड घातली आहे. परिसरात असलेली माळराने, झुडपी वनक्षेत्रे आणि गवताळ पट्टे यांमध्ये जैवविविधतेची मोठी क्षमता असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या परिसंस्थेचे संरक्षण करण्याचा ध्यास घेत परिसरातील वनस्पती आणि प्राण्यांची ओळख व नोंदणी सुरू केली. संरक्षणाला प्राधान्य देत कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी आणि वणवाबंदी ही त्रिसूत्री अंमलात आणून पर्यावरण संवर्धनाला ग्रामविकासाचा केंद्रबिंदू बनवले.

कोरोना काळात ‘जैवविविधता नोंदवही’ मोहीम सुरू

कोरोना काळात गावाने माजी सरपंच अमोल काटकर यांच्या माध्यमातून पुढाकार घेत जैवविविधता नोंदवही तयार करण्याचे महत्त्वाचे काम सुरू केले. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वन्य अभ्यासक चिन्मय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला गावातील काही युवकांनी ही मोहीम हाती घेतली. त्यानंतर जैवविविधतेचे प्रत्यक्ष शास्त्रीय दस्तावेजीकरण वेगाने सुरू झाले. वन विभागाचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांच्या एकीमुळे या उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळत गेले.

आर्थिक पाठबळामुळे मोहीम झाली अधिक प्रभावी
जैवविविधता नोंदणी आणि वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी वर्ल्ड वाइड फंड ऑफ नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली, तसेच वन विभाग व ग्रामपंचायतीच्या पाठबळामुळे याकामी सुसूत्रता आणण्यात आली. यातूनच जैवविविधतेचे सखोल सर्वेक्षण व माळरानांचा अभ्यास सुरू झाला. वन्यप्राणी, पक्षी व कीटकांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यात आले. दुर्मिळ वनस्पतींच्या नोंदणीबरोबरच व फिल्ड दस्तावेजीकरणासाठी नवी दिशा आणि गती मिळाली.

जैवविविधतेमध्ये ६०६ घटकांची नोंद

दोन वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासात किरकसाल परिसरात १६० विविध वनस्पती प्रजाती, गवताळ प्रदेशातील २१२ पक्षी, ९१ फुलपाखरांच्या प्रजाती, ५६ इतर कीटक, पंधरा प्रकारचे चतुर व टाचणी, कोळ्यांच्या १३ प्रजाती, ३४ सरपटणारे व उभयचर, १८ प्रकारचे सस्तन प्राणी, माशांच्या सात प्रजाती अशा ६०६ जैवविविधता घटकांची प्रमाणित नोंद मिळाली. याशिवाय पट्टेरी तरस, खोकड व लांडग्यांचा प्रजनन अधिवास या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. एकाच गावाने इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकृत जैवविविधता नोंद करणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले आहे. यासाठी किरकसाल संवर्धन प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत, जीवशास्त्रज्ञ नयन उपाध्ये, अर्णव गंधे, आनित बनसोडे, प्रथमेश काटकर, विशाल काटकर, अभिजित माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

तरस गणनेने राज्यभर ओळख
वन्यजीव जतनाच्या दृष्टीने तरस हा अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. किरकसालने वैज्ञानिक पद्धतीने तरसांची गणना करून नवा आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील कोणत्याही गावाने आत्तापर्यंत अशा प्रकारची गणना केलेली नव्हती. यामुळे माणदेशातील गवताळ परिसंस्थांच्या अभ्यासासाठी नवी दिशा मिळाली.

किरकसाल मॉडेल महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी

संवर्धन, लोकसहभाग आणि वैज्ञानिक अभ्यास यांची सांगड घालून किरकसालने महाराष्ट्रातील इतर गावांसाठी एक प्रेरणादायी मॉडेल निर्माण केले आहे. गावकऱ्यांची एकजूट, तरुणांचा व वन्य अभ्यासकांचा सहभाग, वन विभागाचे मार्गदर्शन आणि डब्ल्यूडब्ल्यूएफचे समर्थन यामुळे किरकसाल आज जैवविविधता संरक्षणाच्या क्षेत्रात प्रेरणादायी मॉडेल बनले आहे. किरकसालची ही ऐतिहासिक नोंद माणदेशातील माळरान संवर्धनाला नवी दिशा देणारी ठरत आहे.

अशी झाली तरसांची गणना
सस्तन प्राण्यांच्या नोंदीसाठी बारा कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. यात विविध प्राण्यांची छायाचित्रे टिपली गेली. यामध्ये तरसाची ५३ छायाचित्रे टिपली गेली. तरसाच्या शरीरावर पट्टे असतात. त्यानुसार तरसांची संख्या मोजली असता या परिसरात पाच प्रौढ तरस, तर दोन निमवयस्क तरस आढळले. वाघांप्रमाणेच भारतीय तरसांवर पट्टेरी रचना असते. प्रत्येक तरसाच्या शरीरावर ही रचना भिन्न असते. या रचनेवरून तरसांची संख्या मोजण्यात आली. या तरसांना वेगवेगळे सांकेतिक क्रमांक देण्यात आले. वर्षभर या तरसांची नोंद करण्यात आली.

कोट
किरकसालमध्ये माळरान परिसंस्था संवर्धनाचा झालेला प्रयोग राष्ट्रीय पातळीवर माळरान परिसंस्थेसाठी धोरण आखताना संदर्भबिंदू ठरू शकतो. जैविक संपत्ती, दुर्मिळ प्रजाती आणि तरस व लांडग्यांसारख्या संवेदनशील प्राण्यांच्या अधिवासाचे महत्त्व लक्षात घेता किरकसाल परिसराला संवर्धन राखीव क्षेत्र किंवा जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.
-चिन्मय सावंत, प्रमुख, किरकसाल संवर्धन प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Interim Supreme Leader : अयातुल्ला अराफी बनणार इराणचे सर्वोच्च नेते ! खामेनी यांच्या मृत्युनंतर मोठी जबाबदारी

How Much Prize Money Will Pakistan Get? पाकिस्तानी २७-२८ कोटी जिंकण्याच्या इराद्याने आले होते, बघा किती बक्षीस रक्कमेवर समाधान मानावे लागले...

इराण-अमेरिका युद्धादरम्यान दुबई आणि UAE मध्ये अडकल्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री ; "अत्यंत भीतीदायक वातावरण.."

Sakal Property Mahayatra : नाशिकमध्ये घराचं स्वप्न आता होणार पूर्ण! मालेगावात 'सकाळ प्रॉपर्टी महायात्रा' प्रदर्शनाचा दिमाखदार प्रारंभ

karad Crime: कऱ्हाडमध्ये आणखी एक बांगलादेशी महिला ताब्यात; पाेलिसांचा मलकापुरात छापा, दुसऱ्या नावाचे आधारकार्ड!

SCROLL FOR NEXT