‘किसन वीर’च्या कामगारांचे आंदोलन सुरूच
कामगार-व्यवस्थापन चर्चा निष्फळ; दिवाळी गोड करण्याचे आश्वासन
भुईंज, ता. ५ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या थकीत पगारांसह विविध मागण्यांसाठी कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन सोमवारी कायम राहिले. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मंगळवारीही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.
गेले अनेक महिने रखडलेले पगार व अन्य प्रलंबित देणी मिळावीत, या मागणीसाठी कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सोमवारी सकाळी सर्व कामगार कारखाना परिसरात एकत्र आले. ग्रामदैवताचे दर्शन घेतल्यानंतर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबवून कामगारांच्या शिष्टमंडळाची व्यवस्थापनाशी चर्चा घडवून आणली.
चर्चेदरम्यान कारखान्याच्या वतीने कामगारांना दिवाळी जास्तीतजास्त गोड करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, कामगारांनी पाच पगार देण्याची मागणी कायम ठेवली. त्यामुळे चर्चेत तोडगा निघू शकला नाही. समाधानकारक निर्णय न झाल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले.
दरम्यान, कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधण्यासाठी मंगळवारी पुन्हा चर्चा होणार आहे. चर्चेतून तोडगा निघतो, की आंदोलन अधिक तीव्र होते, याकडे कामगारांसह कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सायंकाळी कामगारांनी आंदोलनस्थळी थांबून मंगळवारीही आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी केली.
...............................................
आंदोलनकर्ते कामगार आमचे आहेत. त्यांनी थोडं संयमाने घ्यावे, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिवाळी जेवढी जास्त गोड करता येईल, तेवढे प्रयत्न चालू आहेत.
- किसन वीर कारखाना व्यवस्थापन
................................................
आम्हा कामगारांना सध्या खूपच आर्थिक समस्या आहेत. दसऱ्यापूर्वी दोन पगार करा व उर्वरित पगार आणि दहा टक्के वाढ कशी व कधी यासह नियमितपणे पगार कधी होणार हे स्पष्टपणे सांगावे. किसन वीर कारखाना आम्हा परिवाराचा आणि भावनिकतेचा विषय असल्याने खूप बोलता येत नाही.
- राजन जाधवराव,
समन्वयक कामगार चळवळ
.............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.