रोपवेवरून कोयना खोऱ्यात स्थानिकांत संभ्रम
मुनावळे ते वासोटा किल्ल्यादरम्यान प्रकल्प; बोट व्यवसायावर परिणाम होण्याची भीती
कास, ता. १० : राज्याच्या अर्थसंकल्पात कोयना जलाशय परिसराच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाल्याने या दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. मात्र, वासोटा किल्ल्यावर प्रस्तावित रोपवे प्रकल्पामुळे स्थानिक बोट व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने विकासासोबतच संभ्रमाचे वातावरणही निर्माण झाले आहे.
कोयना खोरे हे बामणोली, तापोळा, कांदाटी या परिसरात विस्तारलेले असून, येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वासोटा किल्ला, मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्र, ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेले तापोळा, बामणोली येथील बोटींग, चकदेव, पर्वत, उतेश्वर ही प्राचीन शिवमंदिरे तसेच कांदाटी खोऱ्यातील मधुमकरंदगड व जावळीच्या मोरेंच्या वाड्याचे अवशेष अशी समृद्ध ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. घनदाट जंगल आणि छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या विस्तीर्ण पात्रामुळे या परिसराला अमेरिकेतील ॲमेझॉन खोऱ्याची उपमा दिली जाते.
पर्यटनाच्या या मोठ्या क्षमतेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागासाठी विविध प्रकल्पांना गती दिली आहे. नव्या महाबळेश्वर प्रकल्पासह तापोळा ते दरेदरम्यान केबल स्टे ब्रिज उभारला जात असून, या पुलावरून प्रेक्षागॅलरीतून कोयना जलाशयाचा विहंगम नजारा पाहता येणार आहे. याशिवाय तापोळा-आपटी आणि सावरी-सोनाडी या दोन मोठ्या पुलांचे कामही सुरू असून, त्यामुळे अनेक दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडली जाणार आहेत. पाचवड-मेढा ते कोकणाला जोडणारा महामार्ग या भागातून जाणार असल्याने दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
या विकासकामांसोबतच मुनावळे ते वासोटा किल्ला असा रोपवे आणि दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्याच्या घोषणेमुळे पर्यटनस्थळांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात कोयना खोऱ्यातील पर्यटनाला नवा आयाम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या बामणोली, तापोळा व मुनावळे येथील बोट क्लबच्या माध्यमातून पर्यटकांची वाहतूक केली जाते. या बोट व्यवसायावर अनेक स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. जर रोपवे जलाशयाच्या अलीकडील भागातून उभारला गेला तर बोट व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे रोपवे प्रकल्प वासोट्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंतच उभारावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. एकीकडे विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत असतानाच स्थानिक रोजगारावर त्याचा परिणाम होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे मत या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकट
पर्यटनाला चालना
प्रस्तावित रोपवे प्रकल्पामुळे पर्यटकांना काही मिनिटांतच वासोटा किल्ला गाठता येणार आहे. उंचावरून सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट जंगल आणि कोयना जलाशयाचा विहंगम नजारा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वृद्ध व लहान मुलांनाही सहजपणे हा ऐतिहासिक किल्ला पाहता येणार असल्याने पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
04691
बामणोली : कोयनेच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाचा विहंगम नजारा. (अर्चना पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.