वास्तव वेध
कोळा जिल्हा परिषद गट
---
डाळिंब उत्पादकांसाठी संशोधन केंद्र उभारण्याची अपेक्षा
टेंभूचे पाणी आले, पण विकासकामांची प्रतीक्षा अद्याप कायम; बसस्थानक आवश्यक
विनोद देशमुख : सकाळ वृत्तसेवा
कोळा, ता. २५ : सांगोला तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा कोळा जिल्हा परिषद गट डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंब लागवड केली जाते. अनेक शेतकरी डाळिंबाची निर्यात परदेशात करतात, तर काही शेतकरी तेल्या, मररोग आणि खोडअळी यांसारख्या रोगांवर विविध प्रयोग करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी या भागात डाळिंब संशोधन केंद्राची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने कोळा जिल्हा परिषद गटातील मोठे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने नियमित आणि दर्जेदार वीजपुरवठा होणे गरजेचे आहे.
या भागातील कोळा- जुनोनी मार्गाचे रुंदीकरण, कोळा- शेटफळ रस्त्याचे डांबरीकरण तसेच कोळा- बानूरगड मार्गाची दुरुस्ती व सुधारणा करणे आवश्यक आहे. कोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर आणि दोन परिचारिकांची पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्याची गरज आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून, त्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे नवीन कर्मचारी निवासस्थाने उभारण्याची मागणी होत आहे.
कोळा हे सांगोला तालुक्यातील सर्वांत मोठ्या गावांपैकी एक आहे. येथून सांगोला, विटा, आटपाडी, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ या मार्गांवरील एसटी बससेवा सुरू असली तरी गावात बसस्थानक नाही. परिणामी, विविध मार्गांवरील बस वेगवेगळ्या ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोळा येथे स्वतंत्र एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गाव म्हणून कोळ्याची ओळख आहे. येथे असलेले पोलिस औटपोस्ट जीर्ण अवस्थेत असून, इमारत धोकादायक बनली आहे. नवीन जागा उपलब्ध असूनही अद्याप नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम सुरू झालेले नाही. तसेच नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांनी मुक्कामी राहणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोळा-जुनोनी मार्गावरील तसेच गावठाण हद्दीतील बंद पडलेले हायमास्ट दिवे सुरू करणे आवश्यक आहे. याचबरोबर गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे, भाजी मंडई आणि वाहनतळाची व्यवस्था उभारण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
---
कोट
PNE26W29836
आमच्या भागात ज्या काही मूलभूत प्रश्न व समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- अमृत पाटील, सदस्य, हातीद पंचायत समिती गण
---
कोट
PNE26W29837
कोळा जिल्हा परिषद गटामधील अनेक प्रश्न मी जवळून पाहिले आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- किरण पांढरे, जि. प. सदस्य, कोळा गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.