खुटबाव, ता. ८ : पारगाव (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा उत्तरेकडील भराव जुलै महिन्यात आलेल्या नदीच्या पुरामुळे वाहून गेला होता. मात्र, आमदार राहुल कुल व नाम फाउंडेशनच्या दातृत्वामुळे अवघ्या महिनाभरातच युद्ध पातळीवर भरावाचे काम पूर्ण झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये भामा आसखेड धरणातून २००० क्युसेक विसर्गाने पाणी भीमा नदीमध्ये सोडले. त्यामुळे पारगाव येथील बंधारा भरला गेला. या दोन निर्णयामुळे ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दौंड व शिरूर तालुक्यातील ५२ हजार एकर जमीन हिरवीगार राहण्यास मदत झाली आहे.
सन २०२५ मध्ये हा बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. त्याची डागडुजी केल्यानंतर चालू वर्षी पुन्हा एकदा बंधाऱ्याचा तोच भराव पुन्हा वाहून गेला. यावेळी कुल व शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर कुल व कटके यांनी बंधाऱ्याचे काम त्वरित व्हावे यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख व अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी बंधाऱ्याला भेट दिली व कार्यवाही सुरू केली. नाम फाउंडेशनच्या वतीने दोन जेसीबी मशिन व तीन हायवा विनामूल्य श्रमदानासाठी दिले.
शेतकरी संतोष बोत्रे म्हणाले की, बंधाऱ्याच्या भरावाचे काम सुरू झालेले पाहताच आमदार राहुल कुल यांचे फोन करून आभार मानले. स्वर्गीय नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनने मदत केल्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त करतो.
बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरडी पडलेली भीमा नदी पाहून भामा आसखेडचे पाणी सोडले. दुष्काळी परिस्थिती असताना दौंड व शिरूर तालुक्यातील हजारो एकर शेती हिरवीगार आहे याचे समाधान आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
04058
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.