कोल्हापुरात जनमताचा नवा अध्याय
-निखिल पंडितराव
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचे लक्ष लागलेल्या आणि तीन मंत्र्यांसह खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीच भारी ठरली. महायुतीने महापालिकेत सत्तांतर घडवत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महायुती म्हणून भाजपसह सर्व सत्तेवर आल्याने जनमताचा नवा अध्याय आता सुरू झाला आहे.
राज्यात, केंद्रात सत्ता, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असे तीन मंत्री, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, धैर्यशील माने, भाजपचे अमल महाडीक यांच्यासह महायुतीच्या सर्व आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी दिग्गजांनी प्रचारात रान उठवले. या वादळातही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी झुंज देत ३४ जागा जिंकल्या आणि आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्यांच्याबरोबर खासदार शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे, आमदार जयंत आसगावर होते. सतेज पाटील यांनी अनेक दिवसांपासून उमेदवारांची निवड करण्यापासून ८१ जागांपैकी ७४ जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार दिले. प्रचारासाठी थेट लोकांच्या जाऊन प्रचाराची धुरा स्वतः सांभाळल्याने लोकांची नस समजावून घेता आली. त्यांनी शेवटपर्यंत विकास, महिला आणि ‘जेन झेड’ यांच्या भोवतीच प्रचार ठेवल्याने महापालिकेत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच पुढे येऊ शकला.
सतेज पाटील यांच्याकडून प्रत्येक वेळी निवडणूक महाडीक विरुद्ध पाटील अशी करण्याचा प्रयत्न असतो. परंतु या वेळी काँग्रेस विरुद्ध महायुती अशी निवडणूक राहील याची काळजी दोन्हींकडून घेतली गेली. जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीसमवेत न जाता स्वतंत्र लढला. त्यांना एक जागा मिळाली. महायुतीतील नाराज लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे महायुतीतील बंडखोरी शांत करण्यात यश आले. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक जागा जिंकली.
विकासालाच महत्त्व
केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत महायुती हा प्रचार केलाच शिवाय महापालिकेत सत्ता नसतानाही विमानतळ विकास, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच असे विविध विकासाचे मुद्दे मांडले. अनेक वेळा कोल्हापुरात केंद्रात, राज्यात आणि स्थानिक निवडणुकीत असा वेगवेगळा कौल देण्याची परंपरा होती, यामुळे विकासाला खीळ बसत होती. ती परंपरा या निकालाने मोडीत काढत लोकांनी विकासालाच अधिक महत्त्व दिल्याचे दिसते. बाकी प्रचारामध्ये ‘लक्ष्मी’ दर्शनापासून अन्य सर्व युक्त्या महायुतीकडून वापरण्यात आल्याच. आता त्यांना दिलेल्या वचननामाच्या पूर्ततेचे आव्हान असणार आहे.
सांगलीत ‘करेक्ट’ कार्यक्रम
राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर २०२१ मध्ये सांगली महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) महापौर करण्याचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांचा महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपनेच ‘करेक्ट’ कार्यक्रम केल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पक्षाला अवघ्या तीन जागांवरच विजय मिळवता आला. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे भाजपने सांगली महापालिका काबीज केली. आमदार जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्या प्रभावापेक्षा भाजप भारी पडल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे सुधीर गाडगीळ आणि सुधीर खाडे हे दोन आमदार, दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचीही मिळालेली ताकद यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर बनला. काही प्रभागातील जातीय समीकरणानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वतंत्र लढल्याचा भाजपला फायदाच झाल्याचे दिसते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू हर्षवर्धन प्रतीक पाटील निवडणुकीमध्ये सहभागी झाले असून त्यांची चौथी पिढी आता राजकारणात आली.
इचलकरंजीत भाजप ‘शतप्रतिशत’
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भाजपने ४३ जागांवर कमळ फुलवत सत्ता प्रस्थापित केली. इचलकंरजीतील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर हे एकत्र आल्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपला ‘शतप्रतिशत’चे स्वप्न साकार करता आले. यावेळी या दोघा नेत्यांनी पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यात यश मिळविल्याने विजयाचा मार्ग अधिक सुकर बनला. बहुतांश जणांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द बंडखोरी रोखण्यास मदत करणार ठरला. आता तो शब्द प्रत्यक्षात येणार का, हे येणारा काळच ठरवेल. दुसरीकडे विरोधकांनी प्रचारात इचलकरंजीच्या पाणी प्रश्नांचा मुद्दा अधिक व्यापकपणे उपस्थित केला; मात्र मतदारांनी हा मुद्दा नाकारल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काही वॉर्डात जातीय समीकरणांमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाल्याचे दिसते. ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा भाजपला झाला. तर शेवटच्या क्षणापर्यंत ‘लक्ष्मी’ दर्शनावरुन ही जोरात वाद, हाणामाऱ्या झाल्या.
कुंटुंबातील तिघेजण विजयी
विरोधकांनी शिव-शाहू विकास आघाडी स्थापन केली. आघाडीत अनेक दिग्गज चेहरे होते; मात्र प्रभावी नेतृत्वाचा अभाव दिसला. प्रचारातही विस्कळितपणा दिसत होता. संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे अशांना मतदारांनी नाकारले. त्यांचा पराभव हा धक्कादायक मानला जातो. शहापूर परिसराने मात्र शिव-शाहू विकास आघाडीला साथ दिली. या सर्व निकालात शिवसेनेने (यूबीटी) आघाडी नाकारत १७ जागांवर उमेदवार दिले होते. पण त्यांना यश मिळाले नाही. माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाजी मारली. त्यांचा मुलगा सुहास जांभळे यांना मात्र पराभव झाला. शिव-शाहू विकास आघाडीकडून चर्चेतील तेलनाडे कुंटुंबातील तिघेजण निवडून आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.