फोटो - 19905
कोल्हापूर : येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी झालेल्या ऊसदर बैठकीत सहभागी (डावीकडून) राजू शेट्टी, संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर.
पहिली उचल विनाकपात ४५०० वर ठाम
राजू शेट्टी : निर्णयाअभावी दोन दिवसांनी पुन्हा बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘कर्नाटक सरकार उसाला चांगला दर देऊन गळीत हंगाम सुरू करत आहेत. महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्ह्यातील उसाला प्रतिटन विनाकपात पहिली उचल ४५०० रुपये मिळालीच पाहिजे,’ अशी ठाम भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथील बैठकीत मांडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीस विश्रामगृहात दराची कोंडी फोडण्यासाठी पहिली बैठक झाली.
संघटनांच्या ठाम भूमिकेमुळे बैठकीत कोणताच ठोस निर्णय झाला नाही. परिणामी बैठक निष्फळ ठरली. सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांत दुसरी बैठक घेऊ, असे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले. दराबाबत सकारात्मक तोडगा काढून कारखाने तत्काळ सुरू करावेत, असे आवाहन आबिटकर यांनी केले.
शेट्टी म्हणाले, ‘‘साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करावे, यासाठी शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. केंद्र सरकारकडून साखरेची नवी एमएसपी आणि सध्या बाजारातील साखरेचे दर या गोष्टीस अधीन राहून कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घ्यावा. पुढील वर्षभरात साखरेला मिळणारे तेजीतले भाव अन् गतवर्षीची सरासरी विक्री याचा विचारही झाला पाहिजे. गत हंगामापेक्षा यंदा ऊस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच उताऱ्यातील अन् वजनातील घट यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कारखानदारांनी ‘स्वाभिमानी’ने केलेल्या मागणीप्रमाणे उसाची पहिली उचल अत्यंत घसघशीत जाहीर करावी,’’
‘‘कर्नाटकात सोमवारी (ता. २६) मुख्यमंत्री, साखर कारखानदार आणि तेथील शेतकरी संघटना यांची बैठक आहे. त्यातील निर्णयाचा प्रभाव सीमाभागातील ऊसदरावर पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पंपांना उपसाबंदी लागू केली आहे. धरणांमधून नदीत पाणी सोडणे बंद केल्याने पात्रे कोरडी पडली आहेत. ऊसदराचा प्रश्न सुटलेला नसताना, शेतीसाठी पाणीही मिळेनासे झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे,’’असेही शेट्टी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.