वडगाव निंबाळकर, ता. २२ : कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कोरडाच राहिल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जुन्या ढाप्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने नवीन ढापे बसविण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून केली जात होती. मात्र, पाटबंधारे विभागाने वेळेत दखल न घेतल्याने पाणी अडविण्यास विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोऱ्हाळे खुर्द व होळ परिसरातील हजारो एकर शेती बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणी साठविण्यासाठी वेळेत उपाययोजना करणे आवश्यक होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जुन्या ढाप्यांमधून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्याने बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतरही ते टिकत नाही. केवळ कागदोपत्री पाणी अडविल्याचे दाखविले जाते; प्रत्यक्षात मात्र पाण्याचा उपयोग होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. नवीन ढापे बसविण्याची मागणी करूनही पाटबंधारे विभागाकडून वेळेत कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आहे.
दोन दिवसांपूर्वी सुमारे ७० प्लेट आल्याचे सांगण्यात येत असले, तरी बंधाऱ्याच्या ७० गाळ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ एका गाळ्यात प्लेट बसविण्यात आली. बंधाऱ्याच्या कडेला असलेले १३ गाळे वरच्या भागात, तर ५३ गाळे मुख्य प्रवाहात आहेत. पाटबंधारे विभागाकडून चार प्लेट बसविल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात केवळ एकच प्लेट आणून ग्रामस्थांची बोळवण करण्यात आली.
पाणी वाहून गेल्यानंतर आता प्लेट बसविण्याची कार्यवाही सुरू असल्याने ‘वरातीमागून घोडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, उर्वरित ढापे तातडीने बसवून पाणी अडविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बंधाऱ्यावर १५ ऑक्टोबरपर्यंत ढापे टाकावे लागतात. पाऊस कमी असल्यामुळे आणि धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे कमी प्रमाणात पाणी अडवले जाईल.
- प्रतीक हातेकर, पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी, वडगाव निंबाळकर
03318
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.