कोलकता, ता. ११ (पीटीआय) ः पश्चिम बंगालमधील भाजप सरकार बंगाली भाषेची मोडतोड करून राज्यावर हिंदी लादत असल्याचा आरोप ममता यांच्या तृणमूल काँग्रेसने रविवारी केला. कोलकता महापालिकेने (केएमसी) स्वच्छता मोहिमेसाठी तयार केलेल्या जाहिरात फलकाचा दाखला देत पक्षाने सरकारवर टीका केली.
दुर्गापूजेच्या काळात १० ते २१ ऑक्टोबरदरम्यान शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या फलकावर ‘मायेर कोरबो स्वच्छता से स्वागत’ असे लिहिण्यात आले आहे. बंगाली आणि हिंदी भाषांतील शब्दांची सरमिसळ करून हे वाक्य तयार करण्यात आले आहे. स्वच्छ शहरात देवी दुर्गेचे स्वागत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, शहरातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहनही फलकावर करण्यात आले आहे.
मात्र, बंगाली आणि हिंदी शब्दांच्या सरमिसळीवरून तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. ‘कोलकता महापालिकेच्या समाज माध्यमांवरील पोस्टचे योग्य मुद्रितशोधन केले जात नसल्याचे दिसते. आपल्या सुंदर भाषेची मोडतोड होत असतानाही भाजप सरकार अशा मजकुराला मंजुरी देते. दिल्लीतील आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी बंगालवर हिंदी लादणे थांबवा,’ अशी टीका पक्षाने समाज माध्यमांवरील पोस्टमधून केली.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही या फलकावर उपरोधिक टीका केली. ‘लहानपणी मीच चुकीची बंगाली भाषा शिकलो होतो की कोणालाही न सांगता भाषाच बदलली आहे, असा प्रश्न आता मला पडू लागला आहे,’ असे ते म्हणाले.
या आरोपांवर कोलकता महापालिका किंवा राज्य सरकारकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
सध्या कोलकता महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. राज्यातील या सर्वांत मोठ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक याच वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.