कोळवण, ता. २१ : मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, लहान मोठे उद्योजक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
दिवसातून ५ ते ६ वेळा वीज जाणे, कमी दाबाने वीज येणे, वीज वाहक तारा तुटणे, बिलाच्या तक्रारी आणि रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पन्नास वर्षे जुने गंजलेले खांब बदलणे, रोहित्राची क्षमता वाढविणे, नवीन रोहित्र बसविणे ही महत्त्वाची कामे त्वरेने पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळावा या बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत कोळवण खोऱ्यातील नागरिकांची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता.१९) सकाळी कोळवण येथे संपन्न झाली.
पुढील पंधरा दिवसांत कोळवण खोऱ्यातील विजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले, सहाय्यक अभियंता पुष्पक चौधरी, रुपाली शिर्के मॅडम तसेच जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
बबनराव धिडे, माजी संचालक संत तुकाराम साखर कारखाना पोपटराव दुडे, भरत सातपुते, माजी सरपंच प्रवीण साठे, माजी उपसरपंच रामदास पडवळ, माजी सरपंच शंकर खिलारी, सिदू शेजवळ, दत्तात्रेय टेमघरे, कुंडलिक धिडे, भाऊ कुंभार, अमोल धिडे, दीपक घायाळ, लक्ष्मण मोतीबने तसेच नागरिक उपस्थित होते.
या आहेत समस्या
- भात पिकास पाणी पुरवठ्यासाठी वीज नसल्याने भातासह भाजीपाला पिकांचे नुकसान
- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे रात्रीचे अभ्यासाचे तास वाया जात आहेत
- लहान व्यावसायिकांसह दुग्धव्यावसायिक अडचणीत
- विजेअभावी पर्यटन केंद्र चालवणे बनले अवघड
कोळवण खोऱ्यातील बऱ्याच ठिकाणी वीज वाहक यंत्रणा ५० वर्षे जुनी आहे. यामुळे तिची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तुंगी फिडरवरून कोळवण खोऱ्यात पुढील १५ दिवसांत वीज आणू, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने शेतीस व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. महावितरण प्रशासनाने बैठकीत ठरल्यानुसार कामे वेळेत पूर्ण करावीत अन्यथा आम्ही सर्व नागरिक एकत्र येऊन महावितरणच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करू.
- बबनराव धिडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे जिल्हा.
तुंगी फिडरवरून कोळवण खोऱ्यात वीज आणण्यास काही स्थानिक अडचणी आहेत. परंतु त्यावर उपाय काढत ते काम लवकरच पूर्ण करू. कमकुवत वीजवाहक तारा बदलण्याच्या कामास सुरुवात केली आहे. बैठकीत चर्चा झालेली कामे पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत राहील, या दृष्टिकोनातून कामे करण्यात येतील.
- आनंद घुले, उपकार्यकारी अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.