लोगो ः समष्टीतील गणराय
राजश्री मराठे
कोकणातील भोवरे, आरत्या आणि भोवत्या
महाराष्ट्राच्या लोकजीवनात देवपूजा, भक्तिगीते, अभंग, नृत्य आणि सामुदायिक उत्सव यांचे अतूट नाते आहे. कोकणातील ग्रामदैवतांच्या उत्सवांमध्ये या लोकपरंपरेचे मनोहर दर्शन घडते. देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने गाव एकत्र येते. अभंग, आरती, ताल, पदन्यास, नृत्य, भक्तिभाव यांच्या माध्यमातून देवाप्रति श्रद्धा गावकरी व्यक्त करतात. या परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे भोवरे आणि भोवत्या. या उत्सवाची सुरुवात गणपतीच्या गाण्याने होते.
यावेळी म्हटली जाणारी गणपतीची काही गीते
वंदन करू प्रथम
देव गजानन!
गौरीहराचा हा सुकुमार
नाव त्याचे लंबोदर..!
तसेच
नाचत आले गणपती
पायी घागुऱ्या वाजती
अहो तुका म्हणे काही
विठ्ठल गणपती दुजा नाही
अशा गणपतीच्या गीतांनी उत्सवाची सुरुवात मंगलमय वातावरणात होते. गणपतीचे स्मरण करून झाल्यानंतर इतर अभंग गायले जातात. हे अभंग बहुधा पूर्वी गायलेले आणि ध्वनिमुद्रित केलेले असतात. किंवा ही भजने स्थानिक मंडळी म्हणतात. अभंगांच्या ताल-सुरानुसार भोवरे घातले जातात. भोवरा हा देवासमोर मंडपामध्ये सर्व व्यक्तींनी गोलात उभे राहून तालसूरावर केलेला नृत्यप्रकार आहे. एक भोवरा एखाद्या गाण्याच्या ताल-सुरानुसार कितीही वेळ चालू शकतो. यामध्ये देवाच्या गीतावर विविध प्रकारचे पदन्यास केले जातात.
बोला बोला तुकाराम बोला अलबेला
बोला तुकाराम बोला
हे शब्द आले की उभ्याने भोवरा घालणारी सर्व मंडळी खाली उकिडवे बसतात आणि त्याच अवस्थेत भोवरा घालतात. उकिडवे बसून ताल साधणे आणि पुन्हा लगेच वर उठून नेहमीच्या गतीने ठेका धरणे, ही एक प्रकारची कसरत असते. भोवरे आणि भोवत्या हे दोन वेगळे प्रकार आहेत. भोवरे हे देवासमोर मंडपामध्ये सर्व व्यक्ती गोलात उभे राहून घालतात. तर भोवत्या म्हणजे देवाभोवती केली जाणारी प्रदक्षिणा. भोवत्या करताना गावातील ज्येष्ठ व्यक्तीच्या, पुजाऱ्याच्या हातात आरतीचे तबक असते. प्रथम भोवरे त्यानंतर भोवत्या, त्यानंतर आरती. अशा प्रकारे नृत्य, प्रदक्षिणा आणि आरती यांचा सुंदर संगम घडतो.
भोवरे आणि भोवत्या झाल्यानंतर गणपतीच्या पारंपरिक आरत्या करतात.
सुखकर्ता दुःखहर्ता, शेंदूर लाल चढायो म्हणून झाल्यावर,
१) हेरंब शिवकुलदीपका, तुज आरती गणनायका ।।
सिंदुरासुर मर्दुनि, सुरा सोडविले त्रासातूनि
देवगण तुज वंदूनि, स्वस्थानी गेले हर्षूनि ।।१ ।।
दर्शने तव श्रीमंती, मनःकामना सिद्धीस जाती
स्वयंप्रकाशित तू गजवदना, नीरांजन दीप काय तुला ।।२ ।।
२) दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी ।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी ।।
कवण अपराधास्तव म्हणूनी केला रुसवा ।
अहर्निशी मी हृदयी तुझा करीतसे धावा ।।
३) आरती ही तुजला गणराया ।
रुणुझुणु पायी वाजति घुंगरू ।।
गगनी ध्वनी भरला ।। १ ।।
भाद्रपद मासीं शुक्ल चतुर्थिसी ।
पूजिती जन तुजला ।। २ ।।
अशा आरत्या म्हणताना
आरतीच्या वेळी देवासमोर आरतीचे तबक फिरवले जाते आणि उपस्थित मंडळी भक्तिभावाने आरतीत सहभागी होतात. या लोकपरंपरेत गणपतीच्या मंगलस्मरणापासून सुरू झालेला हा प्रवाह संतरचना, तालबद्ध भोवरे, देवाभोवतीच्या भोवत्या आणि त्यानंतरची आरती या सर्वांचा एकत्रित अनुभव कोकणी लोकजीवनातील भक्ती आणि कलात्मकतेचे कल्लोळ दर्शवितो. गणपतीचे स्मरण करत लोकसमूह आरत्या भोवऱ्यात रमतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.